📖 वाचताना वेचलेले 📖

पॉझिटिव्ह थॉट्समूळ इंग्रजी लेखक : श्री मायकल क्रॉसलँड — मराठी अनुवाद : अज्ञात ☆ प्रस्तुती:श्रीमती प्रफुल्ला शेणॉय 

मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले, “या मुलाला घरी घेऊन जा. स्पेन्ड टाइम विथ हिम. आम्ही आता काहीही करू शकत नाही.”

ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. पण जो आपलं, आपल्या माणसांचं अन् या जगाचं भवितव्य बदलू शकतो, असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात.

असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, “माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत?”

डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यूच होईल असे सांगितले.

माझ्या आईने त्या ९६% कडे न पाहता उरलेल्या ४% कडे पाहिले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली.

त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे, असे सांगितले. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न घालवता आईने डॉक्टरांना तत्काळ होकार दिला.

पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली. काही दिवसात अजून ४ गेली. मी एकटा उरलो होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांची बॅग उघडून औषध काढून देत असत.

इंग्लिश डिक्शनरीतल्या Love या शब्दापेक्षा Hope हा शब्द जास्त पॉवरफुल आहे, असे मला नेहमी वाटते.

लोकांना वाटते, मी वाचलो कारण मी लकी होतो. पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले.

ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाहीत, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती.

मग तो दिवस उजाडला आणि डॉक्टरांनी मला, मी बरा झालोय अशी बातमी दिली.

पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, “हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही. याने आपले टीन एज पाहिले तरी तो एक चमत्कार असेल.”

पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच.

मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकायचो. हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले.

मग एक दिवस मी आईला म्हणालो, “आई माझे एक स्वप्न आहे, मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार!”

मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही. पण तुम्ही काय करू शकणार नाही, हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा.मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्टअटॅक आला, तेव्हा मी फक्त १२ वर्षांचा होतो.

लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो.

वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो.

एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते. क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटतं .

ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत ‘अनफेअर’ वागते आहे, असे मला वाटायला लागले.

मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून घे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता आणि मला मृत्यू येत नव्हता.

पण परत एकदा मला माझा परमेश्वर इथेच भेटला आईच्या रुपात. तिने मला या नैराश्यातून बाहेर काढले.

नंतर मी बँकेची नोकरी जॉईन केली.

एक दिवस एक उंचापुरा माणूस, जो आमच्या बँकेचा सीइओ होता, त्याचे मला बोलावणे आले. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, “डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील?”

मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले. दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला, तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, “तुमच्या खुर्चीत!”

मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये, कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली. तो मला त्रास द्यायला लागला.

पण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रासच माझ्या महत्त्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो.

वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो.

वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० ब्रांचेस सांभाळत होतो.

माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सचे घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती.

पण हे यश मटेरियलास्टिक होते. आपण ज्या जगात राहतो त्या जगाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण त्या जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का?

हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल, याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे.

मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला.

जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अशा qमाझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी ७ वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते, ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अशा आविर्भावात मी आईला विचारले होते, ” आई डॉक्टर काय म्हणाले?” त्यावर आई म्हणाली होती, “काही नाही, सर्व ठीक होईल.”

मला पहिला हार्टअटॅक आला, तेव्हाही आई म्हणाली होती,” सर्व ठीक होईल”. “सर्व काही ठीक होईल” हे तिचं वाक्य माझ्यावर ऋण होते. पण दैव बघा, यावर्षी मला तिचे हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली.

आईच्या घश्यात ४ ट्युमर डिटेक्ट झाले. आईने विचारले, “डॉक्टर काय म्हणाले?” मी म्हणालो, “सर्व काही ठीक होईल.”

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगलात, याला महत्व नाही.इथे असताना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे.

तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्त्वाचे आहे.

आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे. आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे.

आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

Michael Crossland is an Author of the best seller book, everything will be Ok: A story of Hope, Love and Perspective.

मूळ इंग्रजी लेखक :श्री. मायकल क्रॉसलँड

संग्राहिका : श्रीमती प्रफुल्ला  शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments