श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ चारचौघातला नवरोबा… लेखक : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
नातेवाईक जमलेले असतात. गप्पाटप्पा , खेचाखेची करता करता कोणीतरी बहिणाबाई ‘काडी टाकते’. आपल्या बंधुराजांबाबत म्हणते,
“सुनील आमचा साधा आहे बिचारा.” हेच स्टेटमेंट मित्रमंडळी जमलेली असली तर त्या सुनीलच्या मित्राने केलेले असते.
हे किंवा याच टाईपची इतर केली जातात जी स्टेटमेंटस्, ती म्हणजे..
आमचा सुनील कसा शांत आहे,
न चिडणारा आहे,
कसल्याही खोड्या नसलेला आहे.
वगैरे वगैरे.
झालं. हे अस जर कोणी बोललं की सुनीलची बायको सरसावून बसते.
अन सुरू करते अटॅक-
“काय म्हणालात? आमचे हे अन साधे बिचारे? एकदा या घरी चार दिवस राहायला. मग कळेल.”
अन मग वहिनी पाढा वाचतात. त्यांच्या ह्यांचा.
हे आमचे कसे साधे बिचारे नाहीत,पक्के ‘हे’ आहेत,
त्यांच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नका,
लांबून तसं वाटत असेल. मी रोज सोबत असते. खरं काय ते माझं मलाच माहीत,न बोलून शहाणे आहेत, आपल्याला हवं तेच करतात,जेवणाच्या बाबतीत पक्के खोड्याळ आहेत,जरा म्हणून चालवून घेणार नाहीत, हे असं हवं..म्हणजे तस्संच हवं”….अन काय काय.
वहिनी हा पाढा वाचत असतात, तेव्हा त्या नवरोबाचा चेहेरा अगदी पाहाण्यासारखा असतो, बरं का. गालातल्या गालात हसून तो बायकोच्या बोलण्याला जणू मूक संमतीच देत असतो. दुसरा पर्यायच नसतो त्याच्यापुढे. ‘बायकोदाक्षिण्य’. ते दाखवायलाच लागते.
एकूणच, “हे आमचे कसे साधेसुधे नाहीत. मी म्हणून कशी चालवून घेते”, असा टोन असतो. म्हणजे …’पहा, माझ्यावर कसे अत्याचार, जबरदस्ती,… हालाची परिस्थिती आहे’ असले काही गंभीर सांगायचं नसतं बरं का.
घरात दोघांचं छान चाललेलं असतं . खरंतर ‘तिचंच’ घरात चालत असतं . हे सगळं लटक्या रागात चालू असतं. गमतीत. अन हे युनिव्हर्सल असतं बरं का.
पण…‘नवरोबा’ म्हटला की तो असाच हवा, चारचौघांसमोर त्याचं रूप असंच ‘कडक’ असायला हवं, असंच सगळ्या बायकांना वाटत असतं. त्यासाठी ही धडपड. हे सारं ‘तिचं’ ‘त्याला’ बोलणं हे काणेकर म्हणतात त्या प्रमाणे ‘थापा’ या शब्दात मोडणारं. निरुपद्रवी. गमतीगमतीतलं.
पण हे स्वातंत्र्य नवरोबांना मात्र नसते बरं का. तो म्हणू शकतो का चारचौघात, अगदी गंमत म्हणून देखील? “ही? साधी बिचारी? चांगली पक्की आहे. घरी पहा येऊन कधी!”
चुकून म्हटलं त्याने, तर त्याचं घरी गेल्यावर काही खरं नसतं!
लेखक : श्री अनंत गद्रे
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com