सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

साठीची सॉलिड ताकद असते. कसे ते सांगतो तुम्हाला!

कालचीच गोष्ट सांगतो.

मी, आमचा मुलगा, आणि बायको रस्त्याने जात असताना समोरून एक समवयीन जोडपे येताना दिसले.

मी त्यातल्या बाईकडे बिनधास्त एकटक बघत होतो. बायकोच्या देखत. ही आहे साठीची खरी ताकद.

जोडपे जवळ आले.

मी त्या बाईकडे बोट दाखवत तिला तिच्या नवऱ्याच्या देखत थांबविले.

ही आहे साठीची ताकद.

“संगीता ना तू?संगीता शेवडे?” इति मी.ही आहे साठीची ताकद.

ती थोडी थबकली.

आणि तिच्या नवऱ्याच्या देखत मानेला झटका देऊन केसांचा शेपटा पाठीवर झटकून, “अय्या… Sss… भाट्या ना तू?” असे किंचाळतच म्हणाली. भाट्या माझे शाळेतले टोपण नाव.तिची साठीची ताकद.

“कित्ती वर्षांनी दिसतोयस रे! काहीच फरक नाही तुझ्यात”.

मी ढेरी आत घेऊन हसलो.

“पण आता संगीता शेवडे नाही बरं का, मी संगीता फडके… हे माझे मिस्टर.” ती बाजूच्या, तिचा काका वगैरे वाटणाऱ्या माणसाकडे बोट दाखवते.

(“काय पण  टकल्या म्हातारा निवडलाय!” हे बोलण्याची छाती साठीत अजूनही होत नाही. हे मी मनातल्या मनातच म्हणालो.)

मी आपला तोंडदेखलेपणाने देखल्या देवा दंडवत करतो. “नमस्कार.”

त्याच्या कपाळाला मात्र आठ्या! फडकेचा शेजारी किंवा आजोळ बहुधा नेने किंवा लेले असावे.

मग एकमेकांच्या अर्धांगाची सविस्तर ओळख होते.

त्यात मी बायकोला “मी नाही का खूप वेळा सांगत तुला, ती खोपोलीच्या ट्रीप मध्ये,”सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला” गायलो होतो?

तीच ही संगीता!”

ही आहे माझी साठीची ताकद.

“अय्या तुला आठवतं आहे अजून ?” संगीता लाजत म्हणते.

तिची साठीची ताकद…

मी “हो, कसं विसरणार गं?” म्हणतो… परत एकदा माझी साठीची ताकद.

“मला इतकी वर्ष वाटत होते की मी तुला नाही म्हटल्यावर तू त्या सायली बरोबर लग्न केलेस.” परत तिचीही ही साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या कपाळावर आठ्या वाढतात.

पण तो हताशपणे बघत असतो.

माझ्या शेजारी निद्रिस्त ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत चुळबुळ करताना जाणवतो.

“नाही गं, माझं लग्न उशीरा झालं, सायली लग्न करून कधीच अमेरिकेत गेली होती.”… मी बायकोच्या देखत म्हणतो.आता परत माझी साठीची ताकद.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला हळूच विचारतो “येतेस का Starbucks मध्ये कॉफी प्यायला ?” माझी साठीची ताकद.

माझी बायको भुवया उंचावून बघते.

३५ वर्षांच्या संसारात तिला खात्री आहे,

मी काही Starbucksला जाण्याच्या भानगडीत पडणार नाही.

फार फार तर समोरच्या उडप्याकडेच बसणार… तिची साठीची ताकद.

नुकताच ३० वर्षाचा झालेला आपला पोरगा… “च्यामारी बाप या वयात सगळ्यांसमोर उघड उघड लाईन मारतोय!” असा आश्चर्यचकित चेहरा करून माझ्याकडे बघत होता.

मीही  पोराकडे बघून डोळे मिचकावत म्हणालो “अरे आम्ही पूर्वी पण कॉफीच प्यायचो.नाही का गं संगीता ?” माझी साठीची ताकद.

ती नवऱ्याला सांगते, “मी जरा ह्याच्या बरोबर तास भर गप्पा मारून येते.तू घरी जा आणि टॉमीला खायला घाल.”तिची साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर, “तास दोन तास तरी टळली ब्याद” चा आनंद स्पष्ट दिसतोय मला. पण तो लपवण्याचा क्षीण आणि निष्फळ प्रयत्न करतोय बापडा, “अगं, काही हरकत नाही.ये आरामात.” असं म्हणतो. त्याची साठीची ताकद.

“अरे पण तुझ्या बायकोची परवानगी आहे का ?” माझ्या पोटात बोट खुपसून संगीता.

“मला काय दगडाचा फरक पडतोय ?  या कधीही… नाहीतरी घरी येऊन काय दिवे लावणार आहेत कोलंबस ?”आता बायकोची  साठीची ताकद.

“फक्त येताना अर्धा किलो रवा आणि १ किलो साखर आण.” हुकुमी आणि जरबेच्या आवाजात मला.परत एकदा बायकोची साठीची ताकद.

संगीताचा नवरा कधीच गायब झाला.

माझ्या बायकोने दोन पावलं जायला म्हणून पुढे टाकली आणि वळली. “अरे हो.तुझा गोदरेजचा डाय संपलाय वाटतं. हल्ली जरा लवकरच संपतो. तो ही आण! खरे तर केसच कुठं आहेत रंगवायला? मला नेहमी आश्चर्य वाटते कुठे लावतोस कलप? आणि तुझ्या गॅससाठीच्या चघळायच्या गोळ्याही आणि कायम चूर्ण आणायला विसरू नकोस! नाहीतर सकाळी चिंतनघरात बसशील तासाच्या ऐवजी दीड तास आणि हात हलवत बाहेर येशील!” असं संगीताकडे जळजळीत नजरेने बघत तिने सांगितले… परत बायकोची साठीची ताकद.

बायकोचे माहेर कोकणात अडीवऱ्यातले आहे, म्हणजे सदाशिव पेठेतील “सौजन्याची” मर्यादा जिथे संपते तेथे तिथली सुरू होते.

संगीता त्यावर फिदीफिदी हसते.तिची पण साठीची ताकद.

मित्रांनो, अशी सगळी साठी भलतीच ताकदवान असते.

अनुभवलात की कळेलच!

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments