वाचताना वेचलेले
☆ ‘सौभाग्यकांक्षिणी‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
पोष्टमन ऽऽऽऽऽ….
ही हाळी ऐकून रावसाहेब धोतराचा सोगा सावरत लगबगीने बाहेर आले …
सरकारकडून पत्र होतं ..
ते त्यांनी लगबगीनं फोडलं आणि एका दमात वाचून सरळ उभे राहिले. लगबगीने आत गेले व त्यांच्या कपाटातल्या एका खणात ते पत्र ठेवून त्यास कुलूप लावले व चावी कनवटीस लावली.
एक दीर्घ सुस्कारा सोडला.
तिथून निघाले. सरळ बाहेर आले.आत डोकावून त्यांनी मोठ्या आवाजात आवाज दिला.
‘जरा माळावर जाऊन येतो बरं.’
आणि परतीच्या प्रत्युत्तराची वाट न पाहता कसलीशी खूणगाठ मनाशी बांधली व आलेला हुंदका गिळला .बराच वेळ ते शून्यात नजर लावून बसले होते.
दिवस ढळायची वेळ झाली, तसे ते सावकाश निघाले वाड्याकडे.
ते जरा गप्पच दिसत होते. ते पाहून सारजाबाईंनी विचारलेही, ‘काय झालं’ म्हणून.
पण ते ‘काही नाही’ म्हणून दुस-या विषयावर बोलू लागले.
‘सुनबाईंना कोण घेऊन येणार ? कधी येणार ? की आपण धाडू या मनोहरला ? (रावसाहेबांचा कारभारी) पण २/३ दिवस असा विचार चालला असता सुनबाईंना घेऊन तिचे भाऊ आले .
जुळी मुले अगदी जयंतसारखी दिसत आहेत. सारजाबाईंनी बाळंतिणीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला.घर कसं भरून गेल्यासारखं दिसत होतं.
वाड्यावर बाळांच्या आगमनाने चैतन्य आलं होतं.
दिवस कसे भराभर जात होते.अजय सुजय आता चालू लागले होते.थोडेथोडे बोलायचेदेखील.
सुनबाई आनंदी होत्या आता लवकरच मुलांचे बाबा येणार होते घरी.
‘मुलांना पाहून किती खूश होतील!’ह्या जाणिवेने ती पुलकित झाली..
पण मुलांच्या देखभालीत ती मामंजींना विचारायचे विसरून जायची की जयंत कधी येणार? काही पत्र आले का? रोज रात्री ती ठरवायची की उद्या विचारीन पण राहूनच जायचे.
आज मात्र तिने पदराची गाठच मारून ठेवली की सकाळी मामंजींना विचारायचेच.
सकाळी संधी साधून तिने ‘जयंत कधी येणार,याबद्दल काही कळले का?’ हा विषय काढला. तेव्हा रावसाहेब उत्तरले,
‘अग कालच त्याच्या ऑफिसवरून संदेश आला होता. त्याची ड्यूटी वाढली असल्याने त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त परदेशी पाठवलेय व ते मिशन गुप्त असल्याने तो पत्रव्यवहार नाही करू शकणार, असं सांगितलं त्याच्याऑफिसमधून. कधी नव्हे तो तुला जरा विसावा मिळाला. तू दुपारी झोपली होतीस, म्हणून तुला सांगायचे राहून गेले .बरं झालं, तू आठवण काढलीस.’
ती जरा हिरमुसलीच.
आता काम संपणार कधी आणि जयंत येणार कधी ? मुलांना कधी भेटतील त्यांचे बाबा ? बाबांना कधी भेटतील त्यांची मुलं ?
ती विचार करू लागली.
तितक्यात सुजयच्या आवाजानं तिची विचारशृंखला तुटली व ती मुलांच्यात गुंग झाली.
एक वर्ष उलटलं.
तिचं रोज वाट पाहणं सुरूच होतं.
मग रावसाहेबांनी भर दुपारी बातमी आणली की ‘टपाल कार्यालयात संदेश आलाय की जयंताला शत्रूच्या लोकांनी पकडलेय. तो कधी सुटेल काही सांगता येत नाही.’आणि सुनबाईच्या डोळ्यातून खळकन दोन टीपे गळली.
ती निर्धाराने म्हणाली, ‘मामंजी, ते येणारच सुटून. मी सावित्रीसारखी देवाला आळवेन. माझा विश्वास आहे देवावर. हे येतीलच.तुम्ही काळजी करू नका.’
दिवसांमागून दिवस गेले.
वर्षांमागून वर्ष.
सुजय, अजय आता कॉलेजला जाऊ लागले.
ते आपल्या आईला म्हणत,
‘आई, तुला वाटतं का की बाबा परत येतील?’
तशी ती चवताळायची व म्हणायची,’ते येणारच!
युद्धकैदी सोडतात ना त्यात तेही सुटतील!’
सासुबाईंनीही डोळे मिटले, जयंताची वाट पाहत. मामंजी घरात फारसे राहत नसत .
पण सगळे सणवार, हळदी कुंकू साग्रसंगीत होत असे.
मुलांची लग्नेही जमली.
सगळे यथोचित पार पडले.
पण सुनबाईंचे वाट पाहणे मात्र थांबले नव्हते.
हल्ली मामंजी फारसे कोणाबरोबर बोलत नसत .एकटेच बसून रहायचे.
आणि एके दिवशी तेही गेले.
महिनाभराने मामंजींची खोली साफ करायला सुनबाई त्या खोलीत गेल्या.
त्यांना जयंताची सगळी पुस्तके,लहानपणीचे कपडे एका कपाटात व्यवस्थित ठेवलेले दिसले.
त्या एकेक वस्तू प्रेमाने हाताळत होत्या .जणू त्या वस्तूंमधून जयंत त्यांना दिसत होते .आतल्या खणात काय असावे बरं, इतके किल्ली कुलपात .?
मामंजी तर सगळे व्यवहार माझ्यावर सोपवून निवृत्त झाले होते .सासुबाईही कशात लक्ष घालत नसत.
मग काय असावे बरे आत ?
त्यांनी तो खण उघडला.आत सरकारचे पत्र होते.
त्या मटकन खाली बसल्या
आणि वाचू लागल्या…
‘जयंत रावसाहेब भोसले सीमेवरील बॉंबहल्ल्यात शहीद!’
दुसरे पत्र मामंजीचे. सुनबाईस.
‘चि.सौ.कां.सुनिता,
हो. मी तुला सौ.म्हणतोय कारण मला तुझ्या सौभाग्यलंकारात जयंतास पाहायचे होते .तुला विधवेचे आयुष्य जगू द्यायचे नव्हते .म्हणून मी जयंताची बातमी सर्वांपासून गुप्तच ठेवली होती. मला आणखी एक गोष्ट सिद्ध करायची होती की विधवेने कुलाचार केला तरी देव कोपत नाही. तू माझी स्नुषा नसून सुकन्याच आहेस. तुझ्या मंगळसूत्राने, तुझ्या कुंकवाने, तुझ्या हिरव्या बांगड्यांनी, तुझ्या जोडव्यांनी, तुझ्या किणकिण वाजणा-या पैंजणांनी मला घरात लक्ष्मीचा निवास असल्याचे जाणवायचे .
तू अशीच सौभाग्यलंकार लेऊन रहा .व अखंड सौभाग्यवती म्हणूनच तुझे या जगातून जाणे होऊ दे.
ही या बापाची इच्छा पुरी कर.
-तुझा पित्यासमान मामंजी.’
तिने पत्राची घडी घातली .
अगदी गदगदून पोटभर रडली.
शांतपणे आपले अश्रू पुसले.
कोणी नसताना दोन्ही पत्रे जाळली.
दिवाबत्ती केली.व सुनांच्या हळदीकुंकवाच्या तयारीला लागली.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈