सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ शुभ्र नभासम….स्वप्नाली देशपांडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
शुभ्र नभासम कोरा कागद
नवी लेखणी हळवी मोहक
कसे न ठावे कातरवेळी
भेट तयांची घडे अचानक
झाल ओढूनि तीही सजली
शब्दझुला ती गुंफित गेली
लेवून शेला तोही सजला
शब्दझुल्यावर पुरता रमला
स्पर्श पहिला तिचा कोवळा
निळा-जांभळा किंचित ओला
स्पर्शाने त्या उत्कट पहिल्या
कागद भिजला जरा लाजला
आरस्पानी शब्दफुलांनी
कवितेचा अंकुर बहरला
अद्वैताच्या अनुभूतीने
कागद सर्वांगी मोहरला.
शेवट येता त्या कवितेचा
नीलघनासम कागद ओला
झुलून किंचित शब्द झुल्यावर
आत स्वत:च्या दुमडून गेला
–स्वप्नाली अतुल देशपांडे (मुंबई)
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈