सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी शाळेत गेलो — त्यांनी माझी जात नोंदवून घेतली.

मग आम्ही सर्वांनी….

“सारे भारतीय माझे बांधव आहेत…!” – ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली..!

 

त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी पण मागितली…

तर ते म्हणाले, — “तो गरीब आहे.”

“मी पण गरीबच आहे.”

“तू गरीब आहेस मान्य, पण तुझी जात वेगळी आहे.”

 

…. दोन गरीबांची पण जात वेगवेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.

 

त्याला शासनाच्या…. फी माफी आणि अन्य सर्व सुविधा मिळत होत्या,

आणि …. माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती…!

 

आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली.

(इथे स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही का वाटत..?)

तो सिलेक्ट झाला…

मी नव्हतो झालो…!

 

मी मार्कलिस्ट बघितली तर…

त्याला 150 पैकी…. 108 मार्क होते

आणि मला 145…!

नंतर कळलं,

त्याने फॉर्मसोबत स्वतःचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.

स्पर्धेतही जातीची परीक्षा असते…… हे मला त्या दिवशी कळलं !

 

पुढे तो सेटल झाला… चांगला पैसा ही आला.

घर, गाडी सर्व आलं…. त्याचं आयुष्य मजेत चालू झालं…!

 

अधूनमधून कुठे कुठे व्याख्यानंही द्यायचा….

सामाजिक समानतेवर तो भरभरुन बोलायचा….!!

 

एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली….

आणि बघताच त्याला ती खूप आवडली…!

तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत,

तिच्यावर मात्र याची जडली होती प्रित…!

काहीही करुन हवी होती ती त्याला…

तिला मिळवण्याचा खटाटोप त्याने सुरु केला.

एके दिवशी मात्र तो गारच पडला,

तिची जात दुसरी…. हे माहीत झालं त्याला..!

प्रचंड संतापला ….. अन् पारा त्याचा चढ़ला,

जातीच्या ठेकेदारांवर …. जोराने ओरडला..!

….. हा जातिभेद काही मूर्खांनी तयार केला,

माणूस सर्व एकच असतो कोण सांगेल यांना…?

 

नंतर मग,

त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा….

‘ जात गाडून टाका ‘

भरसभेत सांगायचा…!

 

आत्तापर्यन्त साथ देणारी ” जात “च बाधक झाली होती….

त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती…!

 

काय करावे सुचेना त्याला…

आपली जात आडवी येतेय…

सर्व आहे पण एका गोष्टीमुळे मन बैचैन होतेय…!

 

एके दिवशी तो असाच… स्वतःची फाईल चाळत होता,

रागारागाने तो आपल्याच ” जात ” प्रमाणपत्राकडे पाहत होता !

 

त्याच्याकडे बघून … ते प्रमाणपत्र ही हसले….

” चुकतोयस बेटा तू,.. जरा विचार कर “ म्हणाले…!

 

ज्या जातीने जगवलं तिचाच तुला आता राग येतोय….

फायदा बघून स्वतःचा….. तूच आज स्वार्थी होतोयस…!

 

तो बघ… तुझ्या सोबतचा “तो” गुणी मुलगा,

खाजगी कंपनीत जातोय….माझ्यामुळे बेट्या,

तू मात्र…. सुखाची रोटी खातोयस…!

 

जातिभेद वाईट…. हे कुणीही मान्य करेल,

पण तुला तेव्हाच हे खटंकतय …. 

जेव्हा ते तुझ्या हिताआड येतंय…!!

 

याआधी तूही तुझी जात अभिमानाने मिरवायचास…

जातीमुळे मिळणारे सर्व फायदे…तोऱ्यात उचलायचास…!

 

हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला….

मनाशी काही विचार करता झाला….!

 

त्या दिवशी “तो” माझ्या लग्नात आगंतुक पाहुणा म्हणून आला….

“जिंकलास गड्या तूच…” .. मजपाशी येऊन म्हणाला…!

 

रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता….

त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात,

मी हार घातलेला होता…!

 

तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती,

कारण तिची न् माझी … जात एकच होती…!

 

कसं आहे ना भावा…

जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं…

कुठे न कुठे प्रत्येकाला नमतं घ्यावंच लागतं…!

 

तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मलाही…!!

कशाला तत्वज्ञान सांगतोयस भावा….

फायद्यासाठी काहीही..?

 

खरंच दूर करायचेत का जातिभेद?

चल मग दोघे मिळून करु…

जातीवर नको,

जो आर्थिक गरीब त्यालाच स्कॉलरशिप,सवलती मिळवून देऊ…!

 

जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची…

आपण फक्त भारतीय होऊ….

तू अन् मी एकच .. हीच शिकवण सर्वांना देऊ…!

 

ज्याच्यात असेल गुणवत्ता .. त्याचंच सिलेक्शन होईल…

त्या दिवशी माझा देश .. खऱ्या अर्थाने महान होईल….!

 

तू ही माणूस मी ही माणूस, मग कसला आपल्यात भेद?

जातीत विखुरला माणूस..  त्याचाच वाटतो खेद..!

 

जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो…

दरवेळी तुमचा उमेदवार इलेक्शन त्यावरच जिंकतो…!

 

तुझे अन् माझे लालच रक्त,

माणूस आपली जात…

स्वार्थ नको.. आणू थोडी उदात्तता हृदयात…!

 

माहीत मजला रुचणार नाही, हे कधीही सर्वांना अजिबात ….

कारण,

प्रत्येकाला हवीय येथे….आपल्या सोईची “जात”……!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments