सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आजी उदास आहे हे आजोबांच्या लक्षात आलं.

“काय झालं गं ?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाली, “अहो, आता थकवा येतो. आधी सारखं राहिलं नाही. आता गडबड गोंगाट सहन होत नाही. कुठे जायचं म्हटलं तर जास्त चालवत नाही. कधी भाजीत मीठ टाकायला विसरते, तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलंय माहीत नाही!”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही. आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळही करू शकत नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात जे काही आहे, त्याचा विचार करावा.अग, वयानुसार हे सर्व होणारच.आधीचे दिवस आठव ना. किती कामं करायचीस तू. पूर्ण घर तू खूप छान सांभाळलंस.मला कशाचीच काळजी नव्हती कधी.आता वयोमानानुसार हे सारं होणारच. पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणं आपल्या हातात आहे.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर थोडे शारीरिक बदल होतातच. थोडे आपल्यालाही करायचे असतात. आपली आयुष्याची घडी परिस्थितीनुसार बदलायची असते. चल. आज सायंकाळी बाहेर जाऊ या आपण. तू छान ती नारंगी साडी नेस. रात्री आपण बाहेरच जेवू.”

आजोबा संध्याकाळी आजीला घेऊन बाहेर पडले व जवळच असलेल्या बसस्टाॕपवर जाऊन बसले.दोघे बराच वेळ तेथेच भूतकाळात रमत गप्पा मारत बसले. आजोबा म्हणाले, “अगं, पाय दुखत असतील तर मांडी घालून बस छानपैकी.नंतर पाणीपुरी शेवपुरी खाऊनच घरी जाऊ.” अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे दोघांचे फिरणे झाले.

आजीची उदासी मात्र कुठे पळाली, हे तिला कळलंच नाही. ती अगदी ताजीतवानी झाली.

 मोबाईल पकडून आजीचा खांदा दुखतो, म्हणून आजोबांनी आजीसाठी मोबाईल स्टॅन्ड मागवला.आज आजीने आजोबांना सकाळीच सांगून टाकलं की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला घेऊन या.आजोबांनी आनंदाने आणलेले समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या पाहुन आजी म्हणाली,”अहो.. एवढं का आणलंत?” आजोबा म्हणाले,”अगं, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आजी आजोबांची पार्टी छान  झाली.

आजोबा बऱ्याच वेळा पासून एका बाटलीचं झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून नातू म्हणाला,” द्या आजोबा मी उघडून देतो.” आजोबा म्हणाले, “अरे, नको, बाळा.मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच रे. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचं हे मी ठरवलंय. रोज फिरायला जाणं, भाजी आणणं , भाजी चिरणं , साफसफाई करणं , धुतलेले कपडे वाळत घालणं , वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं अशा कामांची जबाबदारी मी घेतली आहे.तुझ्या आजीला मदतपण होते आणि माझा वेळही जातो.”

वाहतं पाणी ‘धारा’ म्हणजे पुढे पुढे वाहत जाणारी उर्जा. तेच साचलेलं पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. आयुष्याचं पण असंच आहे. शक्य तेवढं सक्रिय राहणं ही आवश्यकता असते. जे जमेल, जसं जमेल, जे आवडेल, जे झेपेल ते करत रहाणं गरजेचं आहे. चलतीका नामही जिंदगी है! वयाच्या ह्या वळणावर

एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने,विश्वासाने हातात घेणं ही उर्वरित आयुष्याची गरज आहे.

म्हणूनच  

प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments