सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ सावली दिवाळीची… -सौ.अरुणा प्रकाश गोखले ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(दिवाळी संपली, की एक वेगळीच हुरहुर वाटते. ती व्यक्त केली आहे ,सावली दिवाळीची ..या कवितेतून..)
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी,
कोणी काही खट्दिशी,
आकाशकंदील काढत नाही,
संपलेली दिवाळी काही,
त्यामुळे वाढत नाही !
दोन दिवस अंगणातही ,
रेंगाळत राहतात पणत्या,
स्नेहाच्या गोलांसह,
संध्येच्या दीपरागांसह.
पुसटलेल्या रांगोळ्याही,
मंदपणे विस्कटतात,
संपलेल्या दिवाळीचे रंग,
आणखी गडद करतात !
हवेतला फटाक्यांचा गंध,
चुकार फटाक्यांचे फाटके अंग,
कण्हत कण्हत सांगतात,
“संपला दिवाळीचा संग !”
कँलेंडरमधली चार दिवसांची,
दिवाळी खरं तर संपली,..
पण अजून रेंगाळतेच ना मनात,
तिचीच पुसट सावली !!
-सौ.अरुणा प्रकाश गोखले.
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈