श्री कमलाकर नाईक
वाचताना वेचलेले
☆ माझे माझेचे गाठोडे… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
☆
माझे माझेचे गाठोडे
तुझ्या चरणाशी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
किती मोकळी मी झाले
*
माझे माझे गणगोत
चिंता सर्वांची वाहिली
तुझे तुझे म्हणताना
गुंतागुंत ती सुटली
*
माझा माझा रे संसार
करिता आयुष्य हे गेले
तुझे तुझे म्हणताना
मुक्त मनोमनी झाले.
*
माझी माझी मुलेबाळे
मोह सुटता सुटेना
तुझे तुझे म्हणताना
चिंता काहीच वाटेना
*
माझे माझे हे वैभव
हाच ध्यास जीवनात
तुझे तुझे म्हणताना
मन झाले हे निवांत
*
माझे माझे हे चातुर्य
करी सदा रे विवाद
तुझे तुझे म्हणताना
ऐकू येई अंतर्नाद
*
माझे माझे म्हणताना
मोह माया ताप जाळी
तुझे तुझे म्हणताना
लागे ब्रह्मानंदी टाळी
*
माझे माझे मीपण
तुझ्या चरणी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
तुझ्यातच विलोपले
☆
कवी :अज्ञात
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈