वाचताना वेचलेले
☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.
दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
‘साहेब, जरा काम होतं.’
‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’
‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’
‘अरे व्वा ! या. आत या.’
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी ‘नको नको’ म्हणाला. आग्रह केला, तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
‘किती मार्क मिळाले मुलाला ?’
‘बासट टक्के.’
‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूश दिसत होता.
‘साहेब, मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’
‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,
‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हां, काय चुकीचं बोललो असेन तर.
माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा,
‘आनंद एकट्याने खाऊ
नको सगल्य्यांना वाट !’
हे नुसते पेढे नाय साहेब
हा माझा आनंद आहे !’
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय ?’
‘विशाल.’ बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं – ‘प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात राहा – तुझ्या बाबांसारखा !’
‘शिवराम हे घ्या.’
‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्टं बोल्लात, यात आलं सगलं.’
‘हे विशालसाठी आहे ! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.’
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
‘चहा वगैरे घेणार का ?’
‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल ? मला वाचता येत नाही. म्हनून…’
‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.
माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद, पंच्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.
आपल्या मुलाला / मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसूया. कारण आपण सगळेच असे झालोय- आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !
माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे. मस्त चिंब भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?
माणूस जन्म घेतो, त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं.
आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून… आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !
इतरांशी तुलना करत आणखीपैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के…!
या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !
लेखक – श्री एकनाथ वाघ
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈