सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ ‘वाळवी‘ – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
एकदा एका ग्रंथालयाला लागली वाळवी..
ती ” ती ” होती म्हणून तिला खायची खूप सवय, दिसेल ते खाsss त सुटली.
कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता संग्रह, स्फुट लेखन, इथं पासून ते महाकाव्या पर्यंत सगळं तिने खाल्लं. व. पु. , पु. ल. , ना. धो. , चिं. त्र्यं. , अहो तिने सगळं खाल्लं, मग मात्र तिचं पोट लागलं दुखायला.
मग ती मेडिकल ची पुस्तकं खायला लागली.
तिला त्याच्यात पोटदुखीवरचे इलाज सापडायला लागले.
” ए, तू कुठं आहेस आत्ता ? ” वाळवीने विचारलं, वाळवा म्हणाला, “वस्त्रहरण”
” बरोबर, मला वाटलंच होत कि, तू आधी वस्त्रहरण च खाणार ” वाळवी उत्तरली, ” पुरुष सगळे सारखेच, महाभारतात पुरुषांच्या दृष्टीने महत्वाचं फक्त वस्त्रहरण, ”
” अग बाई, पण वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णानेच साड्या पुरवल्या ना ? बरं तू काय खातेस ? ”
” मी आत्ता कर्णाची कवच कुंडलं ! ” ” वा !म्हणजे तू आता अजरामर व्हायचा विचार करतेस कि काय ? ” ” अरे बाबा, कर्ण कवच कुंडलामुळे अजरामर होणार असता, तर कवच कुंडलं व्यासांनी आपल्या जवळच नसती का ठेवली ? “
आत्ता मात्र वाळव्याच्या एक गोष्ट लक्षात आली कि ह्या वाळवीने, गुन्हेगारी कथा आधीच हजम केलेल्या आहेत.
महाभारत खाता खाता दोघांनाही थोडी झोप लागली, आणि अचानक एका पुस्तकातून आवाज यायला लागला. वाळवा म्हणाला, ” ए काही घाबरायचं कारण नाहीये ते पुस्तक धारपांचं आहे, थोडी भुतं असतील अजून जिवंत तीच बडबडत असतील ! बराच वेळ महाभारत खाऊन सुस्तावलेले दोघं विचार करत होते, की महाभारतात लिहिलंय तेच आत्ता सगळीकडं घडतंय – का जे घडणार आहे ते महाभारतात लिहिलंय ? स्त्रियांची विटंबना आजही होतेच आहे की !
” ए, तू विनोदी खाल्लंयस कधी ? “वाळव्यानं विचारलं, ” अरे बाबा हल्ली विनोदी कुठं मिळतंय खायला, त्यालाच जास्त डिमांड आहे. त्रासलेले सगळे लोक विनोदी वाचूनच आपलं आयुष्य सुखी बनवताहेत. सामाजिक साहित्य हल्ली कुणी वाचतच नाही, त्यामुळे ते खूप मिळतं खायला, पण चव नाहीरे त्याला. ” ते तुझं खरंय ग, पण मला सध्या डॉक्टरांनी विनोदी काही खाऊ नका म्हणून सांगितलंय. ” रोमॅंटिक, विनोदी, गुन्हेगारी, मला सगळं वर्ज्य आहे.
” ए, बाय द वे, तुला खरंच मनापासून कुणाला खायला आवडतं ? ” वाळवा, वाळविला विचारत होता. पण वाळवीचं लक्षच नव्हतं ती आपली मस्त, व. पु. मध्ये दंग होती. बहुतेक वपुर्झा असावं. ” काय रे सारखं सारखं डिस्टर्ब करतोस, छान चव लागली होती मला आत्ता, ” वाळवी ओरडली.
व. पु. वाचणाऱ्यांचं पण असंच होत असेल नाही ? कुणी डिस्टर्ब केलं कि लगेच राग येत असेल ? तो पर्यंत वाळवा भाऊंच्या पुस्तकात घुसला होता.
तो लगेचच वॅक वॅक करत उलट्या करतच बाहेर आला. ” अरे अरे कुठल्याही पुस्तकात घुसताना जरा , प्रस्तावना तरी वाचत जा !” वाळवी ओरडली. तुला हे असलं पचणाऱ नाही बाबा ! वाळवी ओरडली.
एक दिवस वाळवा सकाळपासूनच हातात, झेंडा घेऊन ओरडत फिरत होता, तेंव्हा वाळवीच्या लक्षात आलं, ती मनातल्या मनात पुटपुटली. बहुतेक विद्रोही साहित्य संमेलनातील पुस्तकांचा स्टॉक आलाय…
इकडे वाळवीला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या आणि तिने ते वाळव्याला सांगितलं, तसा तो हसत हसत म्हणाला ” म्हणून मी तुला सांगत होतो, ती पक्वान्न रेसिपिची पुस्तकं खाऊ नको, ऐकलं नाहीस माझं, आता जा तिकडे शेवटच्या कपाटात आणि ” कुठलाही आजार दोन मिनिटात पळवा ” ह्या पुस्तकाची दोन पानं खाऊन ये, बरं वाटेल तुला !”
पण वाळवी लाजत लाजत त्याला म्हणाली, अहो वाळवेश्वरराव तुम्ही आता बाप होणार आहात !
आणि वाळवा उडाला, तो मनात विचार करायला लागला ” मी तर नियमितपणे संतती नियमनाच्या पुस्तकाची रोज दोन पानं खातो तरी असं कसं काय झालं ? “
पण नंतर त्याच्याच लक्षात आलं आपण परवा, ” डे ” काकूंच्या गार्डनची थोडी चव घेतली होती आणि नंतर वाळवी कडे गेलो होतो.
नंतर वाळविला यथावकाश दिवस गेले, एक दिवशी ती हटूनच बसली ” मला वैभव आणि संदीपच्या कविता पाहिजेत ” वाळवा म्हणाला ” अगं बाई, ते दोघं सध्या आघाडीचे कवी आहेत, त्यांच्या कवितांच्या पुस्तकांच्या इतक्या आवृत्त्या खपाखप खपताहेत त्या कशा तुला मिळतील, त्या अजून लोकांनाच मिळत नाहीत, अजून आपल्या लायब्ररीमधे ती पुस्तकं आलेलीच नाहीत “
तुला नवकवींची पुस्तकं देऊ का ? ती बरी असतात, चविष्ट नसतात पण हल्ली आपल्याला फार चमचमीत परवडत पण नाही.
” त्यापेक्षा तु एक काम कर, सरळ राजकारण्यांची आत्मचरित्र वाचत जा, म्हणजे आपली पोरं सगळं काही शिकतील, कारण हल्ली एकमेकाच्या तोंडावर, न बोलता थेट आत्मचरित्रात कथन करण्याची चढाओढ सुरू आहे.
” शि ssss काय हो, तसली पुस्तकं खाऊन पोरांना कशाला बिघडवायचं ? त्यापेक्षा ” वृत्तपत्र ” बरी, आता या यू ट्यूबच्या जमान्यात, पुस्तकांची आवक जरा कमीच झालीय, जो तो येतो आणि ” नमस्कार ! मी….. बोलतोय, तुम्ही बघत आहात….. असं म्हणून सुरू करतो. आपल्याला पुढे अन्नाचा तुटवडा भासणार आहे बरं का ! आपल्या पोरांना सुद्धा फार फालतु आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य खावं लागणार आहे.
पुढे कालांतराने मेडिकलच्या पुस्तकात वाळवीची डिलिव्हरी झाली आणि त्यांची पुढची पिढी अजस्त्र संख्येने बाहेर पडली, पण त्यांना हे साहित्य फारच बेचव वाटायला लागलं, आणि ती पिढी ह्या आपल्या आई बापाना जुन्याच साहित्याच्या वृद्धाश्रमात सोडून, संगणकाच्या मागे लागली. तिथे त्यांना गुगल बाबाच्या आश्रमात ” बग्ज ” नावाने प्रसिद्धी मिळाली, ते मोठे मोठे ” हॅकर ” म्हणून प्रसिद्ध झाले. पूर्वीची वाळवी आता व्हायरस झाली आणि लाखोच्या संख्येने त्यांनी ॲटॅक सुरू केले.
आज जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने पुस्तकांच्या विषयावर लिहावं असं वाटलं आणि डोक्यातल्या वाळवीने माझं डोकं खात खात, बोटांच्या माध्यमाने ते मोबाईलवर उतरवलं, तेच तुमच्या समोर ठेऊन जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो – – खास जागतिक पुस्तक दिनानिमित्त !
धन्यवाद !
लेखक : श्री सतीश वैद्य
(खास जागतिक पुस्तक दिना निमित्त !)
मो 9373109646
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈