सुश्री सुलू साबणे जोशी
वाचताना वेचलेले
☆ नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
☆
वेगवेगळ्या कपड्यांसाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच खरी भाषेची श्रीमंती. पण नवख्या माणसाची त्याने थोडी अडचण होऊ शकते. कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच साडी घालणे वगैरे गोंधळ होतात.
एक युक्ती सांगते. ती लक्षात ठेवा. म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती ? पाहू.
एक लक्षात ठेवा. शिवलेलाच कपडा घालायचा. म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, हाप्पँट या सगळ्या गोष्टी घालायच्या. पण बिनशिवलेला कपडा चुकूनसुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही.
असा बिनशिवलेला कपडा जर कंबरेखाली परिधान करणार असू तर तो नेसायचा. म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी नेसा.
हेच जर बिनशिवलेला कपडा कंबरेवर परिधान करणार असू तर तो घ्यायचा. म्हणून ओढणी, उपरणं घ्या. अगदी पदरसुद्धा घ्या.
आता जर अशा बिनशिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो पांघरायचा. म्हणून शेला, शाल पांघरा.
तोच बिनशिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो बांधायचा. म्हणून मुंडासं, पागोटं, फेटा बांधा.
आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही मोजक्याच ठिकाणी वापरतात. तीदेखील पाहू.
म्हणजे मफलर गुंडाळतात. कधीकधी घाईघाईत साडीदेखील गुंडाळतात ! निऱ्या काढतात आणि खोचतात. कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर खोचतात. नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा मारतात. असो.
हा लेख संपला आणि अनेकांच्या मनातला गोंधळ देखील ! आता बिनधास्त शर्ट अडकवा, पँट चढवा आणि कुठे बाहेर जायचं ते जा!
☆
कवी : अज्ञात.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈