सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ १, चैत्र – – – लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
कित्येक लक्ष योजनं दाटून आलेला गच्च अंध:कार, जिकडे पाहावं तिकडे निर्वात पोकळी आणि त्यात स्वतःच्या गतीनं परिवलन आणि परिभ्रमण करणारे कोट्यवधी ग्रह, तारे, धूमकेतू, उपग्रह…. प्रत्येकाची गती वेगळी, प्रत्येकाचा मार्ग वेगळा… अफाट विश्वाच्या या निबिड साम्राज्यात साक्षीभावानं बसलेला तो निराकार कालपुरुष… +
असंख्य ग्रहताऱ्यांची गती, स्थिती, उत्पत्ती,लय यांचा हिशोब करता करता किती काळ लोटून गेला, याची गणना करणं अवघडच… या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात फिरत असलेल्या प्रत्येक वस्तुमात्राच्या कालगणनेचा हिशोब ठेवण्याचं काम या कालपुरुषाचं.
निराकार, निर्गुण, निर्विकार, निर्विकल्प अवस्थेत हे काम युगानुयुगं करणाऱ्या त्या कालपुरुषाच्या समोर अचानक एक नीलमणी चमकून गेला…
किंचित् उत्सुकतेनं त्यानं नजर उचलून चित्त एकाग्र केलं.
“विश्वकर्म्याची नवीन निर्मिती दिसते आहे!”
त्याचं कुतूहल किंचित् चाळवलं. तो निळसर हिरवट गोलाकार ग्रह आपल्याच गतीनं डौलदारपणे तिरक्या चालीनं स्वतःभोवती आणि त्याच्या कर्त्याभोवती आपल्याच तंद्रीत गिरक्या घेत होता. एरवी निर्विकार असलेला कालपुरुष या लोभस दर्शनानं किंचित् सुखावला. कितीही साक्षीभावानं काम करायचं म्हटलं, तरी काही गोष्टी मनाला कुठेतरी स्पर्शून जायच्याच!
आपोआप त्याच्या तोंडी शब्द आले, “वसुंधरा… मी वसुंधरा म्हणेन हिला..”
आणि ब्रह्मांडात तो शब्द रेंगाळला… “वसुंधरा”!
विश्वकर्म्याच्या या नव्या निर्मितीला नाव मिळालं, ओळख मिळाली… “वसुंधरा”!
तिच्या या जन्मदिवसाची कालपुरुषानं नोंद करून ठेवली: ‘१, चैत्र !’
आपल्या गतीनं भ्रमण करत करत कालपुरुषाच्या नजरेसमोरून वसुंधरा पुढे निघून गेली.
अनंतकोटि ब्रम्हांडामधल्या असंख्य ग्रहताऱ्यांचा हिशोब ठेवता-ठेवता, या नीलहरित वसुंधरेची आठवण त्याला अधूनमधून किंचित गारवा देत असे.
या गतिमान विश्वाच्या आवर्तात पुन्हा कधी येईल बरं ती माझ्या डोळ्यांसमोर?
तिच्या भ्रमणाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तोच नीलमणी लख्खकन् चमकला… तिच्या सूर्यसख्याच्या तेजामुळे तिचा मूळचा निळसर हिरवा रंग अधिकच झळाळून उठत होता. कालपुरुषाचं कुतूहल चाळवलं.
त्यानं नजर आणि अंत:चक्षु अधिक एकाग्र करून वसुंधरेच्या सान्निध्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
असंख्य प्राणिमात्र, वनस्पती, मनुष्यमात्र यांना अंगा-खांद्यावर खेळवणारी ही वसुंधरा बघून, त्या विश्वकर्म्याच्या कर्तृत्वाचं कालपुरुषाला फारच कौतुक वाटलं. शिवाय या प्रत्येक जीवमात्राचं आयुष्य,नशीब, भविष्य यांचीही ठराविक योजना त्या जगन्नियंत्याने आधीच करून ठेवली होती.
अधिकाधिक एकाग्रतेनं तिथल्या घडामोडींकडे बघत असताना अचानक त्याचे डोळे दिपले.
वसुंधरेवर ‘सत्ययुग’ चालू होतं. कुणी ‘श्रीराम’नामक राजा महायुद्धात विजय मिळवून स्वगृही येत असताना त्याला दिसला. त्याचे प्रजाजन त्याचा जयजयकार करीत होते.. घडून गेलेल्या अशुभाची आणि अतर्क्य घटनांची उजळणी करत होते. परंतु दुष्टावर सुष्ट प्रवृत्तींनी मिळवलेला विजय, म्हणून सगळीकडे विजयपताका, ब्रह्मध्वजा लावून रामराजाचं स्वागत करत होते.
कालपुरुषानं पुन्हा एकदा नोंद केली: १, चैत्र !
बघता बघता आपल्या परिभ्रमणाच्या गतीनं वसुंधरा कालपुरुषाच्या डोळ्यांसमोरून पुन्हा एकदा विश्वाच्या अफाट पसारात निघून गेली.
आणखी काही युगं लोटली… कालगणनेतल्या ठराविक वेळी कालपुरुष या वसुंधरेच्या आगमनाची वाट पाहत असे : १, चैत्र…
तीही त्या ठराविक काळात दर्शन देऊन पुढे जात असे. दरवेळी आपल्या अंत:चक्षूंनी तिचं अंतरंग जाणून घेण्याचा कालपुरुषाला छंदच जडला होता.
या छंदापोटी मग महाभारतकालीन युद्ध, जय-पराजय, आणखीही अनेक साम्राज्यांचे उदयास्त आणि प्रत्येक वेळी विजयाच्या वेळी उभारलेले ब्रह्मध्वज यांचा तो साक्षीदार होत गेला.
प्रत्येक वेळी ती समोर आली, की काहीतरी नवीन घडामोडी त्याला बघायला मिळत.
वसुंधरेची सर्व अपत्यं तिचा जन्मदिवस अतिशय जल्लोषात साजरा करीत असत. सूर्यसख्याची किरणं, वनस्पतींची कोवळी पालवी आणि वृक्षांनी भरभरून दिलेलं फळांफुलांचं दान, यांमुळे मनुष्यांच्या चित्तवृत्ती अधिकच उल्हसित होत असत.
युगांमागून युगं गेली. वसुंधरेवरचे प्राणिमात्र बदलले, वनस्पती संक्रमित झाल्या. त्यांच्या अधिकाधिक प्रगत पिढ्या निर्माण झाल्या. विश्वाच्या पसा-यात एका कोपऱ्यात बसलेल्या कालपुरुषाचं सर्व घडामोडींवर ठराविक काळानं लक्ष जात असे.
अलिकडे मात्र तो जरा चक्रावून जाऊ लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वसुंधरेचं नवीन रूप आल्यानंतर, जुन्या खुणा त्याला कुठेच दिसेनाशा झाल्या होत्या. .. त्याला न समजणाऱ्या अनेक गोष्टी तिथे घडत होत्या.
वसुंधरेचा जन्मदिवस हा ठिकठिकाणी व्यापाऱ्यांचे मेळे, प्रचंड धनाची उलाढाल, खरेदी-विक्रीचे अफाट आणि अचाट व्यवहार यांच्या योगानंच साजरा करण्याची प्रथा आजकाल पडली होती. आकाशी उंच लहरणाऱ्या ब्रम्हध्वजांना खुजं स्वरूप देऊन त्यांचं आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. वृक्ष-वेली, लता-पल्लव यांच्या सहवासात साजरा करण्याचा हा जन्मदिवस! पण मूळ गाभा भलतीकडेच जाऊन कडुलिंबाची पानं आणि आंब्याचे डहाळेदेखील विकत घेऊन तोंडदेखलं ‘शास्त्र’ करण्याची मनुष्यमात्रांची प्रवृत्ती झाली होती. ‘दुष्टांवर सुष्ट प्रवृत्तीनं मिळवलेला विजय’ ही कल्पना पारच मोडीत निघाली होती. त्याऐवजी भरभरून खरेदी करा, मुहूर्तावर गाड्या घ्या, कोट्यवधींची घरं विकत घ्या, अशांसारख्या धनदा़ंडग्या उन्मादानं धुमाकूळ घातला होता…
कर्कश गोंगाटात निघणाऱ्या शोभायात्रा, आणि धर्मांधर्मांमधला कट्टरतावाद जोपासण्यासाठी सुरू झालेली चढाओढ ह्याच जन्मदिनाच्या साक्षीनं सुरू होत होती.
‘अधिक, अजून अधिक, अजून अधिक’, या हव्यासापोटी मनुष्यांनी निर्माण केलेल्या कचऱ्याच्या महाप्रचंड दबावाखाली वसुंधरा दिवसेंदिवस दबून चालली होती.
कालपुरुषाला उमज पडेनासा झाला. ‘विश्वकर्म्यानं मेहनत घेऊन घडवलेली कलाकृती’ असलेली वसुंधरा आज कुठे नेऊन ठेवली होती तिच्याच लेकरा-बाळांनी?
कालाय तस्मै नमः!
विचार करता करता पुन्हा ती त्याच्या नजरेसमोरून दिसेनाशी झाली- तिच्या पुढच्या भ्रमणकक्षेत.
केवळ साक्षीभावाचा धनी असलेला कालपुरुष मात्र उद्विग्न मनानं तिच्याकरिता मनोमन प्रार्थना करत राहिला…
हे वसुंधरे, भविष्यकाळात तुझ्या अंगा-खांद्यावर तीच ती प्राचीन पिंपळाची कोवळीलूस पालवी दिसू दे…त्या पिंपळपानावर विसावलेल्या, पायाचा अंगठा चोखत पडलेल्या गोजिरवाण्या बालकापासून एक नवं हिरवंगार आणि निरागस विश्व पुन्हा निर्माण होऊ दे…
आणि हे वसुंधरे, त्या जुन्या नवतरुण नीलहरित स्वरूपातल्या तुला शुभेच्छा देण्याची संधी मला पुन्हा पुन्हा येऊ दे. प्राचीन काळापासून, तुझ्या कक्षेत भ्रमण करत असताना ज्या वेळेस तू माझ्यासमोर येत गेलीस, त्या तुझ्या जन्मदिवसाची नोंद मी कायमस्वरूपी करून ठेवली आहे: १, चैत्र !!
.. .. .. शुभास्ते पंथान: सन्तु !!
लेखिका : सुश्री दीपा झानपुरे
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈