वाचताना वेचलेले
☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।
देहांते तव सान्निध्यम् , देहि मे परमेश्वर:।।
माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.
त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.
पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.
त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.
शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,
अनायासेन मरणं :
मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.
विनादैन्येन जीवनं :
जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.
देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:
मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.
पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले
गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा
काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?
परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.
हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”
मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.
आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.
संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘
माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.
आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.
देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती.
आपल्या जीवनाची ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.
अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।
देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈