श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

उसाला झाली दोन दोन पोरं,

मोठा मुलगा ‘गूळ’  अन्

धाकटी मुलगी ‘साखर’

 

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,

गूळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर

 

साखर तशी स्वभावाला गोड,

तिच्यात उणेपणा शोधणं अवघड

 

गुळ मात्र स्वभावाला चिकट,

समोर दिसला की इतरांना वाटे संकट

 

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळून जाई,

गूळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही

 

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,

गूळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ओबडधोबड

 

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,

बापाने लगेच दोघांचे लग्नच लावून टाकले

 

तिला झाला एक मुलगा

दिसायला होता तो गोरागोरा,

यथावकाश बारसे झाले, नाव ठेवले ‘शिरा’

 

उसाला आता काळजी वाटू लागली गुळाची,

त्याच्यासाठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची?

 

उसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रूप ना रंग,

सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग

 

बर्‍याच मुली पाहिल्या, कोणी त्याला पसंत करीना,

काळजी वाटे उसाला

रात्री झोप येईना

 

उसाला मित्र एक होता, नाव त्याचे तूप

त्याने प्रयत्न केले खूप,

अन् उसाला आला हुरूप

 

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,

जी दिसायला होती बेताची

 

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,

होते उसाच्या तोलामोलाचे,

ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे

 

अंगाने ती होती लठ्ठ नि जाडजूड,

रूपाला साजेसे, नांंव होते तिचे ‘भरड’

 

गव्हाला मुलीच्या रूपाची होती कल्पना,

तो कशाला करतो नसत्या वल्गना ?

 

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,

लग्न जमले अन् सारे तयारीला लागले

 

किचन ओटा झाला,

लग्नासाठी बुक,

स्वयंपाकघर पण सजविले खूप

 

‘भरड’ला तूप कढईत घेऊन गेले,

तेथेच तिचे खरपूस मेकअप पण केले

 

भरपूर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी,

गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’

 

लग्नाची तयारी पहायला आलेले दूधसुद्धा कढईत शिरले,

अन् हळूच त्याने गुळाला कढईत पाचारीले

 

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश

 

मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला,

‘भरडी’ चे रुप पाहून, वेळ नाही लागला पाघळायला

 

काजू बदाम किसमिसच्या पडल्या अक्षता,

कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता

 

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,

थाटामाटात बारसे झाले,

नाव ठेवले ‘लापशी’

 

आवडली ना

   शिरा आणि लापशी?

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments