सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “थोरात म्हणजे मराठा का ?” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

(हसून हसून रडायचे की रडून रडून हसायचे? हे तुमचं तुम्हीच ठरवा..) 

मित्राच्या गावच्या जत्रे साठी त्याच्या बरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो. जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली.

साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या ऊसाच्या बांदावर ऊन खात थांबलेला. मित्राकडे पाव्हणे कोण कुठले चौकशी झाली.  पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्या बद्दल आदर वाटला असावा. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच….. 

जातीचा प्रश्न म्हणजे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न…. 

” थोरात म्हंजे म्हाराठाच न्हव ?” म्हाताऱ्याने विचारले.

तसा मी हसत हसत  म्हणालो, ‘नाय मराठा नाय आमी’

 तशा त्याच्या पांढऱ्या भुवया आकड्यात फिरल्या… म्हणाला, 

‘मग काय खालचेहेत का तुमी ?’ 

गालातल्या गालात हसत म्हणालो, 

‘हा, खालचे म्हणजे वडिल मांगाचे अन् आई मराठ्याची.’

 तशी त्यानी टोपी नीट केली. अन् विचार करत म्हणाला,

 ‘म्हंजी तुमी मांगाचेच झाले की. पण, दिसायला तर भामणासारखे दिसता.’ 

मी मान डुलवत म्हणालो, 

‘हा… माझी आज्जी भामणाची होती.’ 

तसा तो म्हातारा दोन सेकंदासाठी फ्रीज झाला. त्यानं तोंडात बोट घालत तंबाखुची गुळी बाहेर काढून फेकली. अन् म्हणाला, 

‘आज्जी बामणाची, बाप मांगाचा अन् आई मराठ्याची ? असं कसं ?’ 

तसं मी म्हणालो,

 ‘आजोबांनी पळवून नेऊन आज्जीशी लग्न केलं होतं’.

 तशी डोक्यावरची सरकलेली टोपी नीट करत तो म्हणाला,

 ‘मग आजोबा मांग होते का मराठा ?”

 मी म्हणालो,

 “नाय नाय आजोबा तर रामोशी होते. दरोडे टाकायचे.” 

तसा वैतागत तो म्हणाला,

 “आरं बाबा, तुझे आजोबा जर रामोशी होते तर तुझे वडील मांग कशे झाले ?” 

मी म्हणालो, 

“अहो आजोबा म्हणजे आईचे वडील रामोशी होते. माझ्या वडलांचे वडील तर लव्हार होते.” 

तसा त्याचा पारा सटकला. वैतागत म्हणाला, 

“आरं गयबाण्या तुझा आजोबा लव्हार होता तर तुझा बाप मांगाचा कसा झाला ?”

 हसू लपवत म्हणालो, 

“अहो म्हणजे आजोबानी दोन लग्न केलती. त्यांची एक बायको माळयाची अन् दुसरी बायको मांगाची होती. माझे वडील मांगाच्या बाईच्या पोटी जन्माला आलते ना.” 

तसा डोकं खाजवत तो म्हणाला,

 “आय घातली, कसला गुतूडा करुन ठेवलाय रं ? पण मला एक सांग, तुझ्या आईची आई बामण अन् तिचा बाप रामोशी होता तर तुझी आई मराठ्याची कशी झाली ?”

मी म्हणालो, 

“माझ्या आज्जीला लेकरु होत नव्हतं म्हणून आईला मराठ्याच्या घरातून दत्तक घेतलं होतं.”

म्हाताऱ्याने कसं कोण जाणे शांतपणे ऐकलं अन् म्हणाला,

 “का ? त्या मराठ्यांनी दत्तक कसकाय दिलं पोरीला ?”

 तसं मी दीर्घ उसासा घेत म्हणालो,

 “आवं माझ्या आईची खरी आई धनगराची होती.”

तसं ते म्हातारं रागानं पाहत खेकसलं,

 “अय निघ हितून भाडकाव. डोक्याची पार आयमाय करुन टाकली यड्या …..नी. कशाचा कशाला मेळ लागाना.  कुणाच्या घरात कोण गेलंय अन् कोण कोणाचा बायला अन् कोण कोणाची बायली कायबी समजना.” 

हसलात, की रडलात, का हसून हसून रडलात.

संकल्पना नाही संकल्प करा.  जाती विरहीत भारतीय समाज निर्मिती हीच काळाची गरज! 

जातीपाती विसरून जाऊ…

भारतीय म्हणून एक होऊ !!

*आज देशाला कॅशलेस बरोबरच, “कास्टलेस” इंडिया ची गरज आहे.. 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments