? वाचताना वेचलेले ?

☆ “राग वगैरे…” – कवी : बा.भ. बोरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

सहज एकदा फेरफटका मारताना

वाटेत  “राग” भेटला

मला पाहून म्हणाला…

काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

 

मी म्हणालो अरे नुकताच

 “संयम” पाळलाय घरात

आणि “माया” पण माहेरपणाला

आली आहे..

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!

 

पुढे बाजारात  “चिडचिड”

उभी दिसली गर्दीत,

खरं तर

ही माझी बालमैत्रीण

पण पुढे कॉलेजात  “अक्कल” नावाचा

मित्र मिळाला आणि हिच्याशी

संपर्क तुटला..!

 

आज मला पाहून म्हणाली, अरे,

 “कटकट” आणि  “वैताग” ची काय खबरबात ?

 

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा.. 

हल्ली मी  “भक्ती” बरोबर

सख्य केलंय त्यामुळे

*”आनंदा”*त आहे अगदी..!

 

पुढे जवळच्याच बागेत

कंटाळा” झोपा काढताना दिसला

माझं अन त्याचं हाडवैर….

अगदी 36 चा आकडा म्हणाना….

त्यामुळे मला साधी ओळख

दाखवायचाही त्याने चक्क “आळस” केला..!

मीही मग मुद्दाम “गडबडी” कडे

लिफ्ट मागितली आणि

तिथून सटकलो..!

 

पुढे एका वळणावर  “दुःख”

भेटलं, मला पाहताच म्हणालं

अरे ये, तुझीच वाट पहात होतो”

 

मी म्हणालो, “अरे वाट पहात होतास की

वाट लावायच्या

तयारीत होतास? आणि माझ्या

बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस की रे माझी

तसं  “लाजून” ते म्हणालं,

अरे मी पाचवीलाच पडलो

(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. 

कसे काय सर्व ? घरचे मजेत ना?” 

 

मी म्हणालो, “छान” चाललंय सगळं…* “श्रद्धा” आणि “विश्वास”

असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात

त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.

तू नको “काळजी” करूस.

हे ऐकल्यावर “ओशाळलं”

आणि निघून गेलं..!

 

थोडं पुढे गेलो तोच

सुख” लांब उभं दिसलं

तिथूनच मला खुणावत होतं,

धावत ये, नाहीतर मी चाललो

मला उशीर होतोय..

 

मी म्हणालो, अरे, कळायला

लागल्यापासून

तुझ्याच तर मागे धावतोय

ऊर फुटेपर्यंत,

आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय…

 एकदा दोनदा भेटलास

पण ‘दुःख’ आणि ‘तू’ साटंलोटं

करून मला एकटं पाडलंत..

दर वेळी.

आता तूच काय तुझी

अपेक्षा” पण नकोय मला.

मी शोधलीय माझी “शांती”

आणि घराचं  नावच

समाधान” ठेवलंय..!

कवी: बा. भ. बोरकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments