सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘रामधान्य…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आता रामाचे आवडते धान्य कुठले? याचं उत्तर दडलंय एका भांडणात.

चला तर मग बघूया काय आहे हे भांडण.

भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि  सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले.

राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते, त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, “या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे.”

हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली, “म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ आहे! आहे काय त्या नाचणीत ? ना रंग ना रूप. छोटे छोटे दाणे आणि काळासावळा रंग. कशी वेडीबिद्री दिसते! मी हंसासारखा पांढराशुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो. आणि म्हणून लग्नात, इतर मंगलकार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच. म्हणून मीच धान्यांत श्रेष्ठ.”

हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. “मी नसेन दिसण्यात सुंदर. पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते.”

शब्दाने शब्द वाढत गेला. शेवटी या दोघांत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडली. राम म्हणाले, “मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन  आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे.”

राम अयोध्येला निघून गेले आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात झाली . सहा महिन्यांनी जेव्हा राम परत आले,तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढलं. तांदूळ खराब झालेला होता.त्याला कीड लागलेली होती . नाचणी मात्र जशी गेली तशीच बाहेर आली .

हे बघून प्रभुराम म्हणाले, “तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली.” म्हणून त्यांनी आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकले .

या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग (प्रेम) आहे, ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं.

मित्रांनो, तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या ‘रामधान्यचरित्र’ या काव्यात सांगितलेली आहे.

माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंगरूपावरुन न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून त्याची पारख केली पाहिजे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments