वाचताना वेचलेले
☆ फुटलेला थर्मामिटर आणि वारी… लेखक : श्री राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री मंगेश जांबोटकर ☆
आज आमच्याकडे असलेला पाऱ्याचा थर्मामीटर चुकून फुटला. आणि त्यातला पारा जमिनीवर बारीक बारीक थेंब होऊन पसरला. थर्मामीटरच्या काचांचे तुकडे नीट व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर माझा मोर्चा मी पाऱ्याकडे वळवला. मी हळू हळू एकेक थेंब एकत्र करायला लागलो. पाऱ्याची एक विशेषता असते. पाऱ्याचा एक थेंब दुसऱ्याजवळ नेला की क्षणार्धात ते दोन थेंब एकत्र येऊन त्याचा एक मोठा थेंब बनतो. या पद्धतीने मी एकेक थेंब करून सगळा पारा एकत्र केला आणि शेवटी एका कागदाच्या पुडीत हळुवारपणे ठेऊन दिला.
पाऱ्याचा संदर्भात निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पाऱ्याचा एक थेंब दुसया थेंबाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पदार्थाला चिकटत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन थेंब जेव्हा क्षणार्धात एकत्र येतात त्यानंतर त्यांचं वेगळं अस्तित्वच राहात नाही. दोन थेंब मिळून एक मोठा थेंब तयार होतो, पुन्हा त्याच गुणधर्माचा. तिसरी गोष्टअशी की पुन्हा त्या थेंबावर अगदी हलका प्रहार केला तरी त्याचे अनंत थेंब होऊन ते पुन्हा सगळीकडे पसरतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक पसरलेल्या थेंबाचे गुणधर्म पुन्हा तेच असतात.
मला हा पाऱ्याचा खेळ बघताना पंढरीच्या वारीचं आणि वारकरी मंडळींचं कोड थोडं सुटलं आणि काही गोष्टी लक्षात आल्या.
१. पाऱ्याचा त्या विखुरलेल्या थेंबांसारखे सगळे वारकरी सगळीकडे पसरलेले असतात. छोटे छोटे थेंब असले तरी त्यांचा गुणधर्म सारखा असतो तो म्हणजे विठ्ठलप्रेम.
२. वारीची वेळ झाली की इतर कुठल्याही गोष्टीला न चिकटता ते पंढरीच्या वाटेवर निघतात आणि दुसरा थेंब म्हणजेच दुसरा वारकरी दिसला की क्षणार्धात एक होऊन विठ्ठलभक्तीचा एक मोठा थेंब तयार होतो. वारीच्या वाटेवर असे एकेक थेंब मिळत जाऊन विठ्ठलभक्तांचा इतर कुठेच न लिप्तळणारा एक मोठा थेंब शेवटी पंढरपुरात निर्माण होतो.
३. त्या मोठ्या थेंबात प्रत्येक छोट्या छोट्या थेंबाचे गुणधर्म वेगळे दिसतच नाहीत. तिथे ना जात ना पात. तिथे असतो विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म.
४. वारी नंतर विठ्ठलभक्तीच्या त्या मोठ्या थेंबातून पुन्हा बारीक बारीक थेंब निर्माण होऊन आपापल्या गावी परतत असले, तरी ते पसरतात त्या विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म घेऊन.
वारीचं हे कोडं उलगडल्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली की वारकरी होणं सोपं नाही. कारण त्यासाठी विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा गुणधर्म अंगी बाणायला लागेल आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे पाऱ्यासारखं विठ्ठलनामाव्यतिरिक्त इतर सगळ्या सांसारिक कचऱ्यापासून पूर्ण अलिप्त व्हावं लागेल. जमेल ते मला?
लेखक :श्री. राजेंद्र वैशंपायन
प्रस्तुती :श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈