वाचताना वेचलेले
☆ “स्वभाव राशींचे आणि पदार्थांचे.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात. तसेच पदार्थांचे असते.
इडली– ( जगन्मित्र कर्क)
ही मवाळ प्रवृत्तीची. अगदी लहान बाळापासून वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी.
तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं. तुपाबरोबर नि दूध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते.
कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही.
_पण एक नंबरची लहरी बरं का ही!
कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल.
मिसळ — (जहाल मेषरास)
मिसळीचं अगदी उलटं. ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही. फक्त तरुणांची सोबत हिला आवडते. बालके नि वृद्ध हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत.
रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना केवळ दर्शनाने नि गंधाने लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!
भेळ (चटकदार मिथुन रास)
नटरंगी…. चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा, कांदा-कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपणा, मिरची ठसका लेवून पातेल्यात नाचली की पब्लिकने शिट्ट्या मारत भोवती पिंगा घातलाच पाहिजे.
उप्पीट नि पोहे (जगावेगळी कुंभरास)
हे दोघे “सामान्य जनता” या वर्गाचे वाटणारे पण सर्वार्थाने असामान्य. कारण यांच्या वाट्याला कौतुक येते पण टीका मात्र कधीही येत नाही. तसेच ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. महत्त्वाचे म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही.
पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.
गोडाचा शिरा (नशीबवान वृषभ)
हे मात्र जरा खास व्यक्तिमत्त्व… खास प्रसंगांना उपस्थित राहणारं!
सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी नशीबवान.. आणि बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा “शिरा”.
महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ “कडा प्रशाद” नावाचं. तर कुठे “सुजी हलवा” नावानं मिरवणारं…
वडा, भजी— (व्यवहारचतुर तूळरास)
हे पदार्थांमधले हिरो व लोकप्रिय…
पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे. हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल!
पावाशी लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!
पावभाजी – ठसा आणि ठसका म्हणजे धनुरास)
सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव! बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात गुण्या-गोविंदाने नांदवून आपल्या स्वत:च्या चवीचा ठसा उमटवणारी, खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!
गोड पदार्थांची स्वभाव विशेष दुनियाही अशीच रंगरसीली! प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर!* ( सोज्वळ मीनरास)
अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी.
कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली!
शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच…
“मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी” म्हणत बालपणीच परिचित झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही….. पण नसली तर मात्र नाडवते.
लाडू– ( खानदानी सिंहरास)
हा चराचरातून तयार होणारा दिमाखदार. तूप आणि साखर हे खानदानी याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा.
▪︎बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा.
▪︎रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि लक्षात येण्याआधी संपून जाणारा..
▪︎साध्या पोळीपासून ते राजेशाही डिंकापर्यंत कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे!
हा बच्चेकंपनीचा लाडका!
पुरणपोळी– (नाजुक-साजुक कन्यारास)
ही पक्वान्नांची राणी!
नाजुक-साजुक स्वभावाची..
महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!
जिलेबी — (कुर्रेबाज, गूढ वृश्चिक)
नटरंगी…. पण बिनभरवशाची… कधी आंबट तर कधी गोड..
आज कुऱ्यात असणारी कुरकुरीत,
पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस…
गुलाबजाम (जिगरबाज मकर)
वर्ण विविधा असला तरी अंगी गुण असले की साऱ्यांचे आपण लाडके होतो… हे शिकवणारा! दैवायत्तं कुले जन्म:, मदायत्तं तु पौरुषं चा जिगरबाज महामंत्र देणारा.
असे स्वभाव राशींचे.
चला पटकन तुमची रास सांगा.
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈