वाचताना वेचलेले
☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
☆
सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट. आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9. 30 ला सुरुवात केलेली केस, अखेर संध्याकाळी 5. 45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. ह्या कोविड प्रकरणामुळे ऑपरेशन थिएटरच्या मजल्यावर असलेले कॉफी शॉप बंद होते.
सेकंड शिफ्टच्या मावशी आलेल्या दिसल्या. त्यांना बिनधास्त विचारलं- ” मावशी, डब्यात काय आणलंय?”
मावशीनं प्रेमाने उत्तर दिलं- “सर, आज कांद्याची भाजी आणि चटणी भाकर हाय डब्यात. भाज्या लयी महाग झाल्यात. ”
मी तिला “सर्जनस रूममध्ये डबा घेऊन ये, ” म्हणालो. भूक अनावर झाली होती.
तिने एक छोटासा स्टीलचा डबा आणि कागदाची वळकटी तिच्या पिशवीतून काढून माझ्या पुढ्यात दोन्ही मांडले.
त्या कागदाच्या वळकटीत 4 घट्ट रोल केलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या होत्या. स्टीलचा डबा उघडला, तर तिखट तांबड्या रंगाची तेलात परतलेली कांद्याची भाजी आणि एका कोपऱ्यात हिरव्या मिरचीचा ठेचा होता. त्या अन्नावर मी अक्षरशः तुटून पडलो. ती भाजी भाकरी, ठेचा अमृताहूनी गोड लागत होता. बघता बघता दीड भाकरी डीचकली, आणि मावशीने आणलेल्या गार पाण्याचा ग्लास गटागटा प्यायलो. तेव्हा कुठे पोट शांत झाले.
भाकरी!काय ताकद आहे ह्या अन्नात!
भाकरीला न तुपाचे, तेलाचे लाड. बनवताना तिला धपाटे घालुन, डायरेक्ट विस्तवावर भाजणे. कुठे पोळपाटाची शय्या नाही, की लाटण्याचे गोंजरणे नाही की तव्याचे संरक्षण नाही. भाजीचा आगाऊ हट्ट न करणारी, चटणीलासुद्धा तेवढ्याच प्रेमाने कुशीत घेऊन पोट भरणारी ही माऊली. कित्येक चुलींवर ही भाकरीच फक्त पोट भरण्याचे काम करते.
काय सामर्थ्य आहे ह्या भाकरीचे!
कष्ट करणाऱ्या मंडळींचे साधे, कष्टाळू अन्न.
कुठेतरी, रस्त्याच्या कडेला, तान्हे मूल कापडी पाळण्यात बांधून, कित्येक माऊलींच्या ममतेची ही भाकरीच पोशिंदी. ह्या भाकरीच्याच जीवावर, रस्ते, बिल्डिंगस, सोसायट्या, बंगले उभे आहेत. त्या भाकरीच्या प्रत्येक घासात, कष्टाचा सुगंध आणि गोडवा जाणवतो.
ती कांद्याची भाजी म्हणजे भुकेने व्याकुळ झालेल्या जिवाला पर्वणीच.
त्या माउलीला पोटभर आशीर्वाद दिले.
त्या भाकरीमध्ये कष्ट करणाऱ्याचेच पोट भरण्याची क्षमता असते. कष्ट करणाऱ्या हातांनाच त्या भाकरीचा घास तोडण्याची ताकद असते. त्या माउलीला तिचा डबा पुढे करण्याची उदारता त्या भाकरीनेच बहाल केली असावी. त्या भाकरीमध्ये केवळ पोट भरण्याचे सामर्थ्य नसून, कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये कणखरता, चिकाटी, आत्मबळ आणि सोशिकता निर्माण करण्याचे अद्भुत रसायनदेखील असते. भाकरी केवळ खाद्य पदार्थ नसून, जीवनशैलीचे, संस्कृतीचे प्रतीक आहे.
उगाच जिभेचे फाजील चोचले न करणारी, दंतपंक्तीला भक्कम करणारी, पोट भरण्याची विलक्षण संपन्नता असणारी ही भाकरी म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म आहे.
मला जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा तेव्हा मी मावशी- मामांच्या जेवणात घुसखोरी करतोच. त्यांच्या स्वयंपाकामध्ये प्रामाणिक कष्टाची रुचकरता तर असतेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चार घास वाटून खाण्याची उदार भावना, प्रेम, हे खरोखर मनाला स्पर्शून जाते आणि ते दोन घास खरेच स्वर्गीय आनंद देऊन जातात. त्यांच्या डब्यातल्या भाकरीची बातच काही और आहे.
खाऊन झाल्यावर डोळ्याच्या कडा ओलावल्या. तो मेला कांदा कितीही शिजवला, तरी डोळ्यात पाणी आणतोच.
☆
लेखक :डॉ दीपक रानडे
प्रस्तुती : अनंत केळकर