सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
योगिनी सकाळी लवकरच उठली. आज वर्षश्राध्द होतं ना तिचं…! चोच घासली, पंख फडफडवले आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी…
वर्षभरापुर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिनं सगळ्यांचा. तसा कारभार लवकरच आटपला होता तिचा. क्षुल्लक आजाराचं निमित्त झालं. मग एकात एक दुखणी. वर्ष-दीड वर्ष अंथरुणात… आणि एक दिवस सकाळी खेळ संपला!
अगदी भरल्या संसारातून उठावं तसं झालं. मोठी २० वर्षांची आणि धाकटी १७ वर्षांची. म्हटलं तर दोघी सज्ञानच… पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा.
मोठी जगन्मित्र… सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा. बहुधा घराबाहेरच बराचसा वेळ. अभ्यासात तशी हुशार… पण फारसं लक्ष नसायचं तिचं अभ्यास करण्यात. ‘hi mom… bye mom…’ केलं की पायात सॅन्डल्स सरकावून स्कूटीला कीक मारून पोरगी पसार!
कधी घरात सापडलीच, तर चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोय नाही… ‘मॉम्, प्लिज लेक्चर नको!’ मित्रपरिवार चांगला असला तिचा, तरी या वयात नको ती आकर्षणं काय कमी असतात का? मग योगिनी चिंता करत बसायची.
धाकटीचं तंत्र वेगळंच… ती अगदीच घुमी होती. सगळ्यात अलिप्त. तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितलं, ना कधी दु:ख… तिच्या मनात काय चालू आहे, याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही.
कधी कधी योगिनीला वाटायचं, ही आपलीच मुलगी का…? कसलाच संवाद नाही तिच्याशी! योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुधा… कारण तोही असाच अलिप्त, कोरडा. ऑफिसात पाटी टाकून घरी आला की, बराचसा वेळ टिव्ही बघण्यात, सोफ्यावर लोळण्यात जायचा त्याचा.
डोंबिवली–चर्चगेट प्रवास करून, दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची, तरी हा सोफ्यावरच…! तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही. योगिनी होती म्हणून चार माणसं जोडून होती. नातेवाईकांचं येणं-जाणं, रीतीप्रमाणं देणं-घेणं, कार्याला हजेरी, कुणाचं हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसे, मुंज, लग्न… सगळे हिनंच बघायचं.
योगिनी आता घराकडे झेपावली… मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली होती ती. जरा कानोसा घेतला किचनच्या खिडकीत बसून, पण काही हालचाल दिसेना.
‘काव… काव…’ करत, पंख सावरत, कठड्यावरून चालत योगिनी हॉलच्या खिडकीपाशी आली. फोटो दिसला तिचा भिंतीवर… हार घातलेला.
नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर… ‘अंगानं भरली ही…’ धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली. घर तसं टापटीप दिसत होतं. ती जाताना जसं होतं तसंच… तिनं लावलेल्या तुळशीनं पण चांगलाच जोम धरला होता.
खिडकीबाहेर कपडे वाळत घातले होते. अगदी एका रेषेत… सुरकुतीसुद्धा नाही! योगीनीला जरा नवलच वाटलं. इतका टापटीपपणा ना कधी नवऱ्यानं दाखवला, ना कधी मुलींनी…! श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना. योगिनी हिरमुसली.
जरासंच पुढं माहेर होतं तिचं… आई थकली असेल, वाट बघत असेल… योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली. तिची आवडती जागा होती ती. तिथं बुचाचं गच्च भरलेलं झाड होतं. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा.
आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला… हातात ताट घेवून थबकत आई कठड्यापाशी आली. नजरेनंच खूण पटली…
“घे बाई, भरपेट खा… तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेयत. केळ्याची कोशिंबीर आणि साय-भात… तुला आवडतो तस्साच. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेनं काळजी घेते. मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी… मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमानं होतायत… आणि जावईबापूसुद्धा जातीनं कुकर लावतात. अगदी बेसिक, पण थोडा स्वयंपाकही करतात…
“श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज होऊ नकोस. तुझी मोठी… तुला आवडणारा शिरा घेऊन सकाळीच गेलीये अनाथाश्रमात मुलांना वाटायला… धाकटीनं तुला आवडणारं बटमोगर्याचं रोप लावलंय आज अंगणात…
“घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची… तू होतीस म्हणून सगळे लाडावलेले होते. मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस, त्या वळणानं हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा…
“आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”
लेखिका : स्वाती नितीन ठोंबरे
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈