वाचताना वेचलेले
☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
आमच्या नवरा बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..
ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालेल? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ” तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.
आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो?” त्यावर घरातले सगळे हसायचे.
आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..
आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंत:करणाला देऊन गेली. अधूनमधून होतात आमची भांडणे, पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं, म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..
तुम्हाला एक खरं सांगू.. ?
हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी- आजोबा मुके झालेत.
परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.
आणखी एक, घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं; पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.
नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा, असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…
“जरी या वर्तमानाला
कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या
पिढ्यांशी बोलतो आम्ही”
मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.
बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈