श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक

 भाजीवाली रोजच्यासारखी दुपारी दारात आली आणि तिने ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमीसारखी ओरडली, “काय आहे भाजी?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,…. ” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले. “

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी, ” – भाजीवाली.

“पन्नास पैशाला दे, चार घेते, ” – आई.

“नाय जमणार, मावशी, ” – भाजीवाली.

“मग राहू दे, ” – आई.

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन, “- भाजीवाली.

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते, ” – आई.

“नाय जमणार, ” – भाजीवाली म्हणाली

आणि पुन्हा गेली.

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून पारखून चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले.

भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवलीस का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन, मग सैपाक, मग जेवण, “- भाजीवाली.

“थांब जरा. बस इथं. मी आणते. ” म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळे दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केलीस, पण नंतर, जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिलेस. “

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

“व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये. “

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments