वाचताना वेचलेले
☆ याला म्हणतात कृतज्ञता!… लेखक : डॉ. मिलिंद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
आज एक डोळे ओलावणारा आणि कोकणी माणसाला सलाम करावासा वाटणारा प्रसंग घडला…
त्याचे झाले असे…
दुपारी 3 वाजता खारेपाटणहून डॉ. बालन उमेश यांचा मला मेसेज आला ..की तुमचा gpay नंबर बदलला आहे का?
मी या आधुनिक जगाला घाबरून असल्याने पहिला संशय आला की झाली काही तरी गडबड..
आधी balance चेक केला..तो तर ओके होता…मग उमेशजी ना फोन केला…ते म्हणाले अहो 1400 रुपये पाठवायचे होते…
आणि नंतर मी, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून उडालोच…
आयला! या कलियुगात असले काहीतरी ऐकायला ..पाहायला..अनुभवायला मिळणे म्हणजे सॉलिड धक्काच होता..
मिथिला मनोहर राऊत. गाव बेरले…ही मुलगी डॉ. नितीन शेट्ये सरांकडे 2006 साली टायफॉइडसाठी ऍडमिट होती…ती बरी झाली आणि तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती काही बरी नव्हती…सरांनी, जे काही 3 हजाराच्या जवळपास बिल होते, त्यात त्यांनी जे काही पैसे दिले ते शांतपणे स्वीकारले आणि त्यांच्या दृष्टीने तो विषय संपला…त्यानंतर आज 2024…..18 वर्षांनी ती मुलगी कमावती झाली….तिचा पहिला पगार झाला आणि तिला तिचे वडील नेहमी जे हळहळून सांगायचे की बायो त्या डॉक्टरांचे 1400 देऊचे हत…त्याची आठवण आली…बेरले खारेपाटण जवळ आहे..
ती मुलगी 1400 रुपये घेऊन तिच्या फॅमिली डॉक्टर म्हणजे बालन सरांकडे गेली आणि तुम्ही हे पैसे सरांना पोचवा म्हणाली…
18 वर्षे….एक कोकणी माणूस राहिलेले देणे, डॉक्टरांचे देणे आठवणीत ठेवतो…पहिल्या पगारातून आठवणीने पोच करतो….हा कोकणी माणूस आहे. प्रामाणिक, सच्चा,मनाचा श्रीमंत आणि जाण ठेवणारा..डॉक्टरने पोरगी बरी केली हा उपकार मानणारा कोकणी माणूस…कृतज्ञ असणारा कोकणी माणूस…
डॉक्टर म्हणजे देव असे आतून मानणारा कोकणी माणूस..आणि ती मुलगी ….खरेतर पुढच्या पिढीतील…पण तीही अस्सल कोकणी निघाली…बापाची रुखरुख लक्षात ठेवणारी..पहिल्या पगारातून 1400 रुपये बाजूला काढणारी…अस्सल कोकणी कन्या..
ती जेव्हा बालन सरांकडे गेली तेव्हा तिने तिचे आजारपण…राहून गेलेले देणे…डॉक्टरांचा मोठेपणा ..बापाची रुखरुख हे सगळे सांगितलेच…पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला…..सर..त्यावेळचे 1400 म्हणजे आत्ताचे किती होतील हो?…उमेश बालन सरांना याचे उत्तर देणे जड गेले…ते म्हणाले आजचे खूप होतील पण तुझी भावना ही त्याचे व्याज भरूनसुद्धा वरती उरेल…
मी शेट्ये सरांना हा किस्सा सांगायला फोन केला तेव्हा तेही अवाक झाले…..त्यांना आठवत नव्हते की असे कोणाचे येणे आहे..असे कोणी नंतर देतो, सांगून गेले आहे…
पण ते आतून हलले…त्यांच्यासाठी
डॉक्टर होण्याचा…पेशंट बरे करण्याचा …पैसे नसतील तर राहू देत किंवा नंतर द्या म्हणण्याच्या प्रवासाचा हा एक कृतार्थ क्षण होता….
आम्ही तिघेही अवाक होतो…..
या लाल मातीत हा प्रामाणिकपणा, कृतज्ञता,जाण,आठवण…..भाव असा रुजलेला आहे…हा खरा सुगंध या मातीला आहे…
इतक्या वर्षांनी पहिला पगार हाती आल्यावर आज ती ज्या भावनेने देणे परत द्यायला गेली…ती भावना खूप मोठी आहे…शेट्ये सर तर म्हणाले, पैसे नकोच पण तिला सलाम करणारे काहीतरी करूया…
हे लिखाण हा त्या मुलीला…तिच्या वडिलांना…त्यांच्या अस्सल कोकणी संस्कारांना….कोकणी वृत्तीला…इथल्या मातीला आणि अजून जिवंत असणाऱ्या माणुसकीला सलाम करण्यासाठी आहे….
लेखक: डॉ.मिलिंद कुलकर्णी
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈