? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तटस्थता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का ? मग घडलं तर का घडलं ? आपलं काय चुकलं ? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची, ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे ? ती महत्त्वाची आहे का ? आपल्या मताची गरज आहे का ? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.

आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण? परके कोण ? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का ? किंवा मग जी होती ती आपली होती का ? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं, ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला हवी तशी माणसे वागतच नाहीत, हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते. त्यामुळे तटस्थता येते.

आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं. हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच, पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलेही ओझं नसतं. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही. पण अलिप्त राहून ती करू शकतो, हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो, त्या गोष्टी किती फोल होत्या, हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण केले जाते.

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.

तर काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतोय !

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो, नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो, नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो, नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली, नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो, मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला, नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम, नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते, तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !

दोन्हीच कॉकटेल बनवून आयुष्य सुखी करीत आहे.

आयुष्य सुंदर आहे !

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments