सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “देवीची ओटी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆
☆
आज एक मुलगी रेल्वे स्टेशनला ५ रु. मीटरने ताजेतवाने तोरण विकत होती.
बाजूचे सगळे २०/३०रु. ला विकत होते.
मी तिला विचारलं, “सगळे २०/३० रुपयांनी विकत आहेत. तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे, म्हणून पाच रुपयांनी विकतेस का?”
ती थोडं थांबली व मला म्हणाली,
“दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुलं. बाप नाही. आई निघून गेली. आजी सांभाळते मला.
सकाळी १००/- रुपये दिले आजीने. डाळ तांदूळ आणायला. विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं.
म्हणून ट्रेन पकडून इकडे आले दुपारी ३ वाजता. फुलं, दोरा, सुई विकत घेतली. ८०/- रुपये खर्च झाले.
पहिले मी पण वीस रुपयांना विकले.
आजीने दिलेल्या १००/- रुपयांचे ३००/- रुपये केले. आता उरलेली पाच तोरणं विकली गेली, तर ठीक! नाहीतर, घराला बांधीन! पहिली कमाई म्हणून. “
मी शांतपणे खिशात हात घातला. १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हटलं, ” पोरी हे पैसे ठेव, मला तोरण नको. माझ्याकडून तुला तुझ्या मेहनतीचं गिफ्ट. घरी जा. ह्यातील एक तोरण तू दरवाजाला लाव. आणि हो. हे घे अजून ५० रुपये. जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा. “
कालच बायको म्हणत होती,
“देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू. “
आज तिची इच्छा पूर्ण झाली.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर