वाचताना वेचलेले
☆ हरलेल्या देवीची कहाणी… लेखिका : नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
ऐका.. अष्टभुजा दुर्गादेवी तुमची कहाणी… आटपाट नगर होतं. तिथं एक मुलगी जन्माला आली..
“लक्ष्मी घरात आली, “म्हणून जल्लोश झाला..
तिच्यापाठी पोरगं जन्मलं, तेव्हा कोणी “राम, कृष्ण किंवा गणपती आला” असं नाही बोललं..
त्या पोरीची कुमारिका म्हणून घरोघरी पूजा होऊ लागली. तिला वाटलं, आपण देवीच आहोत..
“तुला सरस्वतीसारखं बुद्धिमान व्हायचंय बरं का ! ” पोरगी दिवसरात्र अभ्यास करू लागली. पोराला मात्रं “तुला गणपतीसारखं व्हायचंय, ” असं नाही कोणी बोललं..
लेकीला “देवी अन्नपूर्णा” बनवण्याचा आईनं चंगच बांधला होता..
सासरी सून “लक्ष्मीच्या” पावलांनी येणारी हवी होती.. मग ती नोकरीही करू लागली…
झालं… लक्ष्मीबाई नारायणाचा हात धरून सासरी गेल्या..
वटपौर्णिमेला “सावित्री ” बनून नव-याच्या दीर्घायुष्याचा वसा घेतला.. व श्रावणात “मंगळागौर” बनून नाच नाच नाचली… पुढच्याच श्रावणात “जिवती” होऊन जिवावर उदार झाली नि बाळाच्या जन्माची, संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी तिने आनंदाने घेतली.
भाद्रपदात तिनं “गौरीचं” रूप घेतलं नि दिवसरात्र राबली..
नवरात्रीत तर तिला सा-यांनी “अष्टभुजा”च बनवलं..
ती जाम खूश झाली..
आता देवी म्हटलं की दैवी ऊर्जा दाखवण्याची जबाबदारी तिचीच नाही का ? मग काय आठ हातांनी तिने स्वयंपाक, घरकाम, नोकरी, बालसंगोपन, पतीसेवा, आदरातिथ्य, सणवार, शुश्रूषा सारं सारं केलं..
अगदी
करणेषु मंत्री, कार्येषु दासी
भोज्येषु माता, शयनेषु रंभा
झाली…
ती स्वत:ला देवीच समजायला लागली.. सगळीकडे नुसतं गुणगान होऊ लागलं तिचं.. “अन्नपूर्णा”, “लक्ष्मी”, “सरस्वती”, “मातृदेवी”, “अष्टभुजा” या विशेषणांचा तिला कैफ चढला..
आणि हो, बाईनं कसं सालस असावं, सगळ्यांशी मार्दवानं बोलावं, थोरांचा मान राखावा, नव-याशी आदरानं बोलावं, चेहरा नेहमी आनंदी ठेवावा, दुखलं-खुपलं तर कुणाला सांगू नये.
दुर्गामाता, कालिकेचं रूप मूर्तीपुरतंच बरं दिसतं… तिनं हेही सांभाळलं सगळं…
स्वत: शिळं खाल्लं, कितीतरी इच्छा मारल्या… कारण तिला देवी बनायचं होतं…
तसं शिकवलंच होतं मुळी…
मुलं शिकून मोठी झाली.. भुर्रकन उडून गेली. आईची गरज वाटेनाशी झाली… तिचं रूप ओसरलं नि नव-याचं प्रेम विरलं..
दुर्लक्ष झालेल्या शरीरानं असहकार पुकारला.. चार दिवस घरात कौतुक झालं…
ती हुरळली..
पाचव्या दिवशी सासूसास-यांच्या कपाळावर आठी आली.. आईवडील कधीचे सोडून गेलेले.. मुलं दिसेनाशी झालेली.. नव-याला आता तिचं ओझं होऊ लागलेलं..
“रोज मरे त्याला कोण रडे”. त्याचं तिच्याकडं साफ दुर्लक्ष.
आणि खरंच एके दिवशी ती मरून गेली… तिचं नामोनिशाण राहिलं नाही…
“ही निघून गेली, तिनं स्वत:ची काळजी घ्यायला नको होती का ? आता त्याने बिचा-याने कसं जगायचं ?”
हिच्या मरणाचं काहीच नाही; सा-यांना त्याचाच कळवळा आला..
“शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी”
अशी तिची गत झाली..
वर्षभरात नव-यानं तिच्या जागी दुसरी “अष्टभुजा” आणली…
स्वर्गात बसलेल्या तिला खरोखरची “अष्टभुजा” बोलली…
“अशी कशी गं तू वेडी ? तुला सा-यांनी देवी म्हटलं नि तुला ते खरंच वाटलं… राब राब राबलीस… स्वत:कडं दुर्लक्ष केलंस नि इथं येऊन बसलीस… “
तिला ते पटलं… देवीच्या कुशीत शिरून खूप रडली…
तिला देवीनं शपथ दिली..
“उतणार नाही मातणार नाही…
स्वत:कडे दुर्लक्ष करणार नाही..
गोड गोड बोलण्याला भुलून
देवी बनायला जाणार नाही..
मी साधी माणूस आहे
माणसासारखं वागणार
रागवणार चिडणार
भांडणंसुद्धा करणार
मी व्यायाम करणार
विश्रांतीही घेणार
तब्येतीला माझ्या
खरंच मी जपणार
संसार दोघांचा आहे तर
दोघांनी सारखं काम करावं
मी लक्ष्मी व्हायला हवी तर
त्याने नारायण व्हावं… “
हे ऐकून दुर्गादेवी तिच्यावर प्रसन्न झाली..
तशी ती तुम्हा-आम्हावरही होवो !
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !
☆
लेखिका: श्रीमती नीला महाबळ गोडबोले
प्रस्तुती: श्रीमती दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈