सुश्री सुलु साबणेजोशी 

? वाचताना वेचलेले ?

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग-१ – लेखक : माहिती संग्राहक :  श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी

… म्हणून दिवाळीत बनवले जातात करंजी, चकली, चिवडा अन् लाडू….

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते.

कस्तुरीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते.. आई, मामा, आत्या सर्वाना प्रश्न विचारून विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा? करंज्या अशा कशा दिसतात? लाडू गोलच का करतात? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का? तिच्या या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते.

आज कस्तुरीच्या आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.

असो. तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:।.. महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असतान जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.

आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन

योग प्रशिक्षक, अमरावती.

प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments