सुश्री सुलु साबणेजोशी
वाचताना वेचलेले
☆ दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग- २ – लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆
(या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.) – इथून पुढे —
लाडू…
उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.
लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडिशेप, बाळंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.
करंजी
आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.
चकली
वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.
चिवडा
तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.
अनारसे
अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.
… अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचन शक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांच भौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
– समाप्त–
लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन
योग प्रशिक्षक, अमरावती.
प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈