वाचताना वेचलेले
☆ स्ट्रगलच संपला राव !!! ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
सेल्फ स्टार्टर बाईक आल्यापासून..
हमारा बजाज तिरकी करून स्टार्ट करण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!
एलईडी टीव्ही आल्यापासून
वुडन बॉक्स टीव्हीचे प्रक्षेपण बंद झाल्यावर “हमें खेद है ! “ वाचत प्रक्षेपण पुन्हा सुरू होण्याची वाट बघायचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव…!!!
डीटीएच आल्यापासून..
कौलावर चढून अँटेना फिरवत ‘ टीव्ही वरले चित्र दिसते का रे भो ? ‘ असे ओरडून विचारण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!!!
मोबाईल फोन आल्यापासून
रात्री दहानंतर एसटीडी बूथसमोर रांगेत उभे राहून आपल्या मुला- मुलींची खुशाली– काय ..काय –करत विचारण्यात पल्सवर लक्ष ठेवत बिलाची चिंता करण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!!!
पेटीएम आल्यापासून..
हॉस्टेल रूमवर मनीऑर्डरची वाट बघत महिनाअखेरचे दोन दिवस भेळ भत्ता खाऊन काढायचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव !!!
इमेल आल्यापासून..
गावाकडून येणाऱ्या पत्राची वाट बघत आख्खी दुपार लोळून काढण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव ..!!
गुगल आल्यापासून..
एखाद्या संदर्भावर लावलेली पैज जिंकण्यासाठी रात्र रात्र लायब्ररीतले दिवे जाळून पुस्तके चाळून काढण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव !!!
गुगल मॅप आल्यापासून..
जिल्ह्याच्या रस्त्यावर हजार वेळा विचारूनही पत्ता हमखास चुकण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव!!!
व्हाट्सअप आल्यापासून..
कामावरून सुटल्यावर मित्रांच्या कट्टयावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव!!!
खरं सांगू ??
हे ग्लोबलायझेशन आल्यापासून….
माणसं सोडून यंत्राशी जमवून घेण्याचा आयुष्यातील मोठाच स्ट्रगल मात्र सुरू झाला ना राव !!!!
संग्राहक : माधव केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈