श्री अरविंद लिमये
विविधा
☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆
एखाद्या शब्दाचं वर्णन करायला त्याच शब्दापासून तयार झालेले विशेषणच चपखल ठरावे असं क्वचितच पहायला मिळते. अर्थ हा असाच एक दुर्मिळ शब्द म्हणावा लागेल. ‘अर्थ या शब्दाचे सार्थ वर्णन करायला ‘अर्थपूर्ण’ हेच विशेषण यथार्थ ठरते’ या एकाच वाक्यात आलेले अर्थपूर्ण, सार्थ, यथार्थ, हे विविधरंगी शब्द ‘अर्थ ‘ या शब्दाच्या संयोगानेच जन्माला आलेले असणे हा योगायोग नव्हे तर आपल्या मराठी भाषेच्या सौंदर्याची सुंदर झलकच म्हणता येईल.!
‘अर्थ’ या शब्दाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अर्थ या शब्दात परस्परभिन्न असे दोन अर्थ सामावलेले आहेत आणि त्या दोन्ही अर्थांनाही अंगभूत अशा खास त्यांच्याच विविध रंगछटाही आहेत.
अर्थ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे धनसंपत्ती.आणि दुसरा अर्थ आशय.
या दोन्ही अर्थांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे इतर असंख्य शब्दही आकाराला आलेले आहेत आणि त्या शब्दांतही ‘अर्थ’ आहेच. अर्थपूर्ण शब्दांचं हे फुलणं पाहिलं की एक सुंदर दृश्य माझ्या मनात अलगद तरळू लागतं. एखादं बी जमिनीत पेरावं तसा समजा एखादा शब्द पेरता आला असता तर तो अंकुरल्यानंतर त्याला कोवळी पालवी फुटावी आणि त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्यांवर असंख्य शब्दफुले उमलावीत तसंच काहीसं ते दृश्य अर्थ शब्दाला सर्वार्थाने सामावून घेतेय असे जाणवत रहाते.’अर्थ’ शब्दाच्या संयोगाने आकार घेतलेले असंख्य शब्द पाहिले की त्यांना दिलेली ही शब्दफुलांची उपमा कशी समर्पक आहे हे लक्षात येईल.
अर्थ या शब्दाच्या संयोगातून जन्माला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द अर्थ या शब्दाचे सौंदर्य अधिकच खुलवत रहातात.अर्थ शब्दाच्या ‘धन’ ‘संपत्ती’ या अर्थाशी इमान राखत अर्थशास्त्र, अर्थसंकल्प,अर्थभान,अर्थसंचय सारखे असंख्य शब्द आपापल्या वेगवेगळ्या अर्थ आणि रंगांच्या छटांनी अर्थपूर्ण झालेले आहेत. या शब्दाचे आशय, अभिप्राय, कस हे अर्थरंग सांभाळत असतानाच स्वतःच्या वेगळ्या छटाही कौतुकाने मिरवणाऱ्या सार्थ,परमार्थ,स्वार्थ,कृतार्थ, निरर्थक,सार्थक, यासारख्या असंख्य शब्दांची खास त्यांची अशी वैशिष्ट्येही आहेतच. उदाहरणार्थ ‘निरर्थक’ हा शब्द.या शब्दाचा अर्थ उलगडून दाखवण्यासाठी अर्थशून्य, अर्थहीन,अनर्थक, व्यर्थ, पोकळ, वायफळ, भाकड, अकारण, अनावश्यक असे अनेक शब्द दिमतीला हजर होतात.सार्थ या शब्दाचा अर्थ अर्थासह,अर्थयुक्त यासारखे शब्द सोपा करुन सांगतात.स्वार्थ या शब्दाचे स्पष्टीकरण देणारेही मतलब, स्वहित,आत्महित,स्वसुख, आपमतलबीपणा असे अनेक शब्द आहेत.
एखाद्या शब्दाचे असंख्य पैलू उलगडून दाखवण्यासाठीच अगणित म्हणी रुढ झालेल्या असणं ऐकतानाही अविश्वसनीय वाटेल पण ‘स्वार्थ’ या शब्दाला हे भाग्य लाभलेलं आहे.याचं प्रत्यंतर देणाऱ्या…’आवळा देऊन कोहळा काढणे’, ‘आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणे’, ‘तुंबडी भरणे’,’आधी स्वार्थ मग परमार्थ’, ‘तळे राखी तो पाणी चाखी’, ‘आप मेले जग बुडाले’, ‘कामापुरता मामा’,’गरज सरो न् वैद्य मरो’ या आणि अशाच कितीतरी..!
हे पाहिले की भाषेचे नेमके सौंदर्य अशा अनेक शब्दफुलांच्या सौंदर्यातच सामावलेले आहे याची प्रचिती येते.मराठी भाषेचे अनेक प्रकारचे भाषालंकार,अर्थालंकार आहेत.यातील अनेक भाषालंकारांमधील ‘अर्थांतरन्यास’ या अलंकाराच्या रुपाने ‘अर्थ’ या शब्दाच्या सौंदर्यालाही खास सन्मान मिळालेला आहे..!
‘अर्थ’ या शब्दाला हिंदू तत्वज्ञानातही विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मतत्वज्ञान मानवी जीवनाचा अर्थ म्हणजेच पुरुषार्थ प्रदान करते. अशा पुरुषार्थाचे चार घटक धर्म,अर्थ, काम न् मोक्ष असे आहेत. म्हणजेच अनुक्रमे कर्तव्य, साफल्य, आनंद आणि मुक्ती ! यातील साफल्य या अर्थाने अर्थ हा शब्द माणसाच्या आयुष्याचे मर्मच अधोरेखित करतो.
मराठी भाषेचे सौंदर्य खुलवलेय ते अशाच असंख्य शब्दांनी ! त्यातही त्याच्या वर उल्लेखित सर्व विशेष आणि विविध कारणांमुळे मला सर्वार्थाने ‘अर्थपूर्ण’ भासतो तो ‘अर्थ’ हाच शब्द..!!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈