विविधा
☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆
एकदाची सुट्टी लागली. सत्र १ चे पेपर संपले. दीपावलीच्या सुट्टीला सुरूवात झाली.
आणि मग किल्ला करायची लगबग सुरू झाली असणार. दगडे गोळा करणे, माती आणणे, ती चाळणे, दगडे कल्पकतेनं रचणे, त्यावर चिखलाचा काला लावणे, चिखल ओला असतानाच त्यावर हळीव टाकणे आणि मग काही दिवसांनी किल्ल्यावर त्या हळिवाचं छान घनदाट जंगल तयार होतं. मस्तच.
नंतर जुने आणि नवीन आणलेले छ.शिवाजी महाराज व सैनिक त्यावर ठेवणं… नवनिर्मितीचा आनंद. आनंदीआनंद. सृजनशिलतेचा सोहळाच जणु.
त्यापूर्वीच घरातल्या फराळात मदत करणं, “अरे करंज्यात एवढच सारण घालायचं, अशा व्यवस्थित चिटकवून कोरणीनं व्यवस्थित कोरायचं.” ” कसलं डिझाईन केलयस हे चकलीचं.” “लाडू दोन्ही हातांनी वळायचे, म्हणजे छान गोलाकार होतात.” “शंकरपाळ्या व्यवस्थित कट करायच्या.” (मदत करताकरता फराळाचा आस्वाद घेणं हे तर ओघानच आलं.😄) हे संवाद घरोघरी ऐकायला येत असतील. हाही एक आनंददायी सोहळाच असतो.😄
पाहुण्यांना भेटणं, विविध माध्यमांतून दीपावली च्या शुभेच्छा सदिच्छा देणं-घेणं. हे सगळं काही मनाला आनंद देणारं असतं. त्यानंतर हळुहळू दिवाळी संपते. सुट्टी संपण्याच्या दिशेनं काळाचा प्रवास सुरू होतो. मग, कुठे फँमिली ट्रीपचे नियोजन होते. तर, कुठे वनडे ट्रेकचे नियोजन. घरातून बाहेर निसर्गात भटकंती केली की, एकदम फ्रेश होतो आपण.
दिवाळीत जसे दिव्यांनी- फुलांनी घर सजवतो, प्रकाशित करतो. त्याप्रमाणे आपल्या अंतरीचे दीप ही प्रज्वलित करायला हवेत.
म्हणजेच आपलं स्वत्व हे जपता यायला हवं आपणाला. आपल्या मध्ये असणा-या बेस्ट क्वालिटीज ओळखायला, जपायला आणि वाढवता यायला हव्यात. आपल्यामधील नको असणारा भाग (वाईट गोष्टी) हळूहळू काढून टाकता यायला हव्यात. मग, ती एखादी वाईट सवय असेल.
एखादा छान छंद जोपासता येईल. अवांतर पुस्तक वाचन, छानसं चित्र काढणे, चित्र काढायला शिकणे, डिझाईन काढणे, सुंदर रांगोळी- मेहंदी काढायला शिकणे, एखादी कला आत्मसात करणे, कथा-कविता लेखन करणे. यातलं जे जमेल ते आणि जे अंगभूत(In built) असेल ते करणं-करायला शिकणं. आपल्यातील वेगळेपणामुळे आपल्याला समाजात आदराचं स्थान निश्चितच मिळते.
यातून सृजनशिलतेची, नवनिर्मितीची एक अलौकिक आनंदानुभुती प्राप्त होते. ज्या आनंदाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. जो आनंद दीर्घकाळ टिकतो.
हा अलौकिक आनंद मिळवणं म्हणजेच आपल्या अंतरिचा दीप प्रज्वलित करणं होय. नाही का?
मग करूयात ना प्रज्वलीत आपण आपल्या अंतरीचे दीप या दीपावली निमित्त?
🍁 दीपावलीच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 🍁
© ओंकार कुंभार
9921108879
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈