श्री श्रीनिवास गोडसे
विविधा
☆ “अधिक” देखणे ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆
(२९ फेब्रुवारी विशेष)
1974-75 चा काळ असावा… मी सात वर्षांचा होतो. संक्रांतीचा दिवस… सगळ्या गल्लीतली मुलं मिळून तिळगुळ वाटायला बाहेर पडली होती… प्रत्येकाच्या घरात तिळगुळ द्यायचा… राम मंदिर, महादेव मंदिर, विठोबा मंदिर, अंबाबाई चे मंदिर… सगळी देवळं… सगळीकडे तिळगुळ वाटला.. ठेवला.. आता शेवट ‘ऐतवडे डॉक्टर!’… मग झेंडा चौकाकडे मोर्चा वळला… चौकात एका गल्लीत डॉक्टरांचा दवाखाना…
दवाखाना माडीवर…
एका लायनीत उभं राहून डॉक्टरांना तिळगूळ दिला… डॉक्टरांनी पण आम्हाला तिळगूळ दिला अन वर एक चॉकलेट…
कित्ती मज्जाss!…
रावळगाव चॉकलेट…
त्यानंतर मात्र दरवर्षी संक्रांतीला ऐतवडे डॉक्टरांचा दवाखाना ठरलेला… डॉक्टरही नेमाने प्रत्येक वर्षी मुलांना चॉकलेट वाटत राहिले… आणि प्रत्येक मुलांच्या लक्षात राहिले… कायमचे…
आजही कधी कधी झेंडा चौकातल्या त्यांच्या गल्ली जवळून गेलो तरी डॉक्टरांची आठवण नक्की होते… खरंतर ते काही आमचे फॅमिली डॉक्टर न्हवते… मी कधीच त्यांच्याकडे कुठल्याही उपचाराला गेलो नाही… तरीही ऐतवडे डॉक्टर हा शब्द जरी ऐकला तरी तीळगूळ आणि त्यांचे ते चॉकलेट यांची आठवण नक्कीच होते…
डिसेंबर चे दिवस..
लुधियाना ला गेलो होतो… अमृतसर कडे निघालो तेव्हा लुधियाना मध्ये पहाटे एका गुरुद्वारात गेलो होतो… रात्रभर गुरुवाणी चा कार्यक्रम चालू होता… पहाटेची वेळ… डिसेंबरची थंडी… भव्य गुरुद्वारा सजला होता … रोषणाई केली होती… त्या दिवशी काहीतरी विशेष कार्यक्रम असावा… भजन ऐकत भक्तगण बसलेले… चकचकीत वातावरण… ग्रंथसाहेब…
पंजाबी भजनातील बरेच शब्द ओळखीचे… खिशातील मोबाईल काढून समोर ठेवून एका कडेला बसलो… दहा मिनिटे होती पुढे जाण्यासाठी… एक वयस्क पंजाबी स्त्री , पांढरी सलवार-कमीज पंजाबी परिधान,. चेहऱ्यावरती हास्य… झाडू काढत होती… झाडू काढताना लोक उठत आणि दुसरीकडे बसत… तीही आनंदाने सेवेत मग्न होती… तिची स्वच्छता आमच्यापर्यंत आली आणि मी उठलो… गुरु ग्रंथ साहेबांना प्रणाम करून आमच्या गाडीकडे निघालो… गुरुद्वाराच्या दारात येताच
” भैय्या ss!”
अशी हाक ऐकू आली, पाहिले तर ती मगासची स्त्री.. हसत सामोरे आली ,
हातात मोबाईल..! मला देऊन म्हणाली
“आपका मोबाईल..! भूल गये थे !”
माझ्या आता लक्षात आले मी माझा मोबाइल बसल्या जागीच विसरलो होतो..
मी वाकून नमस्कार केला… त्या हसल्या… स्वेटरच्या खिशात हात घालून त्यांनी काहीतरी काढले … माझ्या हातात ठेवले…
मी पाहिलं तर दोन चॉकलेट !..
मी पण हसलो…
पुन्हा पुन्हा धन्यवाद मानत बाहेर पडलो…
कोण कुठची ती स्त्री, पण आठवणीत कायमची जागा करून गेली…! पुढचा सर्व दिवस असाच मजेत गेला … अमृतसरला पोहोचलो.. सर्व अमृतसर फिरलो … सायंकाळी वाघा बॉर्डर पण पाहिली… सांगण्यासारख आणि लिहिण्यासारखे भरपूर घडले त्या दिवशी … पण सकाळी झालेला तो प्रसंग.. झालेली ती छोटी घटना मात्र आज तेजस्वी झाली आहे…
मागच्या महिन्यातली गोष्ट आम्ही दोघ गाडीवरून मुलीच्या पालक मिटींगच्या निमित्ताने कोल्हापूरला गेलो होतो… सगळा कार्यक्रम आणि कोल्हापुरातले काम व्हायला दुपारी दोन वाजून गेले होते…वाटेत काही तरी खाऊ आणि मग पुढे घरी पोहोचू असा विचार करून निघालो… शिरोली ओलांडले अन एका राजस्थानी ढाब्यावर गाडी थांबवली …
छान स्वच्छ परिसर …
आम्ही बसताच वेटरने पंखा चालू केला.. पाणी आणून दिले… स्वतः मालक उठून आला… आमच्यासमोर मेनू कार्ड ठेवले… त्याला थाळीची ऑर्डर दिली… छान हसून तो आमची खातरदारी करत राहिला… गरमागरम जेवण वाढत राहिला… चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवून… व्यापारी हिशोब, रितरीवाज बाजूला ठेवून… जेवण झाले, पैसे दिले..
“वापस आना जी ss ! “
म्हणून त्याने हसूनच निरोप दिला
ह्या घटना लक्षात राहिल्यात, त्याचे आश्चर्य वाटते.
थोडा शोध घेतला तेव्हा या तिन्ही घटनांमधील प्रत्येकाने काही जी कृती केली होती त्याचा बोध लक्षात आला… या घटनांमध्ये प्रत्येकाने स्वतःहून आनंदाने काहीतरी जास्तीचे दिले होते… जगनियम हा असा आहे
“जेवढ्यास तेवढे”
पण इथे मात्र सर्वजण स्वतःहून जास्तीचे जगाला देत होते.. अपेक्षे पेक्षा थोड जास्तच.. या गोष्टी करता त्यांनी जास्त मेहनत सुद्धा घेतली नाही…
कुठे चॉकलेट मिळाली…
कुठे आपुलकीचे दोन शब्द…
कुठं चेहऱ्यावरचे निर्मळ हास्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांनी सुखासमाधानाने दिले होते.. अपेक्षा नसताना मिळाले होते..
माझी मुंबईची आत्या… अशीच प्रेमळ… मुंबईत एका चाळीत तीच घर… तीनच खोल्या … घरची आठ-दहा माणसे…आणि आला-गेला असायचा. सगळ्यांचे करत राहायची. माणूस निघताना घरातील जे काही असेल ते देत राहायची. तिला सगळे माई म्हणायचे …किती गोड बोलणे !… तिने गोड बोलणं कधीच सोडलं नाही …
आज ती नाही.. पण तिचा सुहास्य चेहरा जसाच्या तसा फोटो काढल्या सारखा मनासमोर दिसत राहतो …एक प्रसन्न शांतता… एक प्रसन्न सोज्वळपणा याशिवाय काहीही आठवत नाही…
प्रत्येक वाक्यानंतर बऱ्याच वेळा ती होss लावायची
जेव होss!
जाऊन ये होss!
पुन्हा ये हो ss!
असे होss! बोलणे पण मी आजकाल कुठेही बघितले नाही.
प्रत्येकजण अशा गोड शब्दांना भूकावला आहे…
शरीरासाठी आपण बरेच काही करतो… पण मनासाठी काय ? गोड शब्द ही मनाची गरज आहे…
सकारात्मक शब्दांना लोक आसुसले आहेत.
ते मिळाले तर.?..
कुसुमाग्रजांची जन्मतिथी आपण नुकतीच साजरी केली… गेल्या पावसाळ्यात आपण सर्वांनीच महापुराचा कहर अनुभवलाय… लोकांना पैशाची , वस्तूची मदत तर सर्वांनी दिली असेल पण उभारी चे दोन शब्द… ते कुठे मिळतात ?
कुसुमाग्रजांकडे असाच एक जण जातो. आपली कहाणी सांगतो. त्यानंतर जे काही घडले ते त्यांच्या कवितेतच वाचा…!
कणा –
‘ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
…
माणूस आपुलकी पासून पारखा झाला आहे, शब्दांना महाग आहे…
सर्व जगच “Extra” चे वेडे आहे. डिस्काउंट, सेल, अमुक % एक्स्ट्रा, असं म्हटलं की डोळे Extra मोठे होतात. दिल्यापेक्षा आले जास्त तर सगळ्यांनाच पाहिजे असते. आपण जर असे Extra दिले तर सगळे तुमचे नक्की ‘फॅन’ होतील.
मदत असे म्हटले…
दान असे म्हटले की आपल्याला फक्त पैसा आठवतो.. . आपण याच्या पुढचा विचारच करत नाही.
तेजगुरु सरश्रींच्या पुस्तकात वाचले त्याप्रमाणे आपणाकडे देण्यासारखे बरेच काही आहे. ते आपण देत नाही…
बाकी सगळे जाऊदे पण आपल्या आसपासचे लोकच असे आहेत…
कदाचित तुम्ही स्वतः आहात… ज्याला सकारात्मक शब्द हवे आहेत…
ज्याला कोणाचा तरी प्रेमाचा स्पर्श पाहिजे आहे…
त्याला कोणीतरी फक्त जवळ बसायला पाहिजे आहे…
ज्याला कुणाला तरी आपल्या मनातील सगळं सांगायचं आहे… त्याला श्रमाची मदत पाहिजे आहे… हात पाहिजे आहेत…
पाठीवर थाप पाहिजे आहे…
आपण शोध घेऊया..
मला स्वतः ला कशाची गरज आहे ?
आणि माझ्या आसपासच्या लोकांनाही कशाची गरज आहे?
कुणाला कान पाहिजे आहेत तर कानदान करा
कुणाला पाठीवरती थाप पाहिजे आहे त्यांना शब्ददान करा
कुणाला थोडी श्रमदानाची गरज आहे त्यांना थोडी श्रमाची मदत करा… कुणाला तुमचा वेळ पाहिजे आहे त्यांना तुमच्यातील थोडासा वेळ द्या
कुणाला फक्त तुमचे जवळ असणे पाहिजे आहे फक्त त्यांच्याजवळ फक्त बसून राहा
आपल्याकडे या सर्वात काय जास्त शिल्लक आहे ?
हे थोडेसे “एक्स्ट्रा” आपण देऊ शकतो का?
यशस्वी होण्याचा मंत्र सांगताना असे म्हणतात कि यशाकडे जाण्यासाठी पहिला तर तुमचे नियोजन करा या नियोजनाचे व्यवस्थित तुकडे करा. आपल्याला रोज थोडे थोडे काम करायचे आहे असे ठरवा. काय करायला पाहिजे आहे त्याप्रमाणे करत जा.
जमलं तर ठरवल्या्पेक्षा थोडं जास्तच करा…
‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही अशीच सकारात्मक म्हण … मोठे काम करायचे असेल तर या म्हणीचा वापर करणे हाच खरा गुरुमंत्र…
आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा फक्त एक पाऊल जास्त पुढे असणे महत्त्वाचे …
रोज आपण आपल्याशी स्पर्धा केली तर?
आपणच आपले प्रतिस्पर्धी झालो तर?…
भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या साधनेच्या काळात अनेक गुरूंचा शोध घेतला. त्यांनी सत्याचा शोध घेण्याच्या मार्गात जे जे काही सांगितले त्याप्रमाणे केलेच, पण त्याच्यापेक्षाही थोडं जास्तच केले… थोडी जास्तच साधना केली … तरीही मनाची तळमळ शांत झाली नाही अखेर स्वतः मार्ग चालू लागले आणि एक दिवस अंतिम लक्ष्या पर्यंत पोहोचले…
थोडा विचार केला अन् प्रामाणिकपणाने स्वतःकडे पाहिले तर हे सर्व जण मान्य करतील की ईश्वराने आपल्याला आपल्या लायकी पेक्षाही अनेक पटीने जास्त आपणास दिले आहे… शिवाय तो देत आहे… त्याला आपण एक बीज दिले तर तो अनेकपटीने वाढवून परत देतो… भरपूर देतो… एक्स्ट्रा देतो…
तो फळ देणारा आहे …
बहुफल देणारा आहे.
माणसाने हाव सोडली तर सर्वच भरपूर आहे प्रेम ,पैसा,आनंद…
अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने?
जेव्हा तो नेईल दो कराने सांभाळीशी किती मग दो कराने?
गदिमांच्या शब्दात आपण मिसळून जाऊया अन् देवाला मागूया… आपल्या मागण्यापेक्षा
अधिकच मिळेल!
देखणे मिळेल!
याची खात्री ठेवूनच मागूया …
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी !
हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा मायमाउली काळी
एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी !
महालमाड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी !
सोसे तितके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा
अपुरेपणही नलगे, नलगे पस्तावाची पाळी !
29 फेब्रुवारी हा असाच “एक्स्ट्रा” दिवस…
आता हा दिवस चार वर्षातून एकदा येतो, सूर्याच्या भोवती पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 365.25 (365•242181) दिवस लागतात तर आपले वर्षाचे 365 दिवस असतात राहिलेला पाव दिवस म्हणजे सहा तास
हे चार वर्षे ×प्रत्येकी सहा तास याप्रमाणे आपण एका दिवसाने वर्ष वाढवतो… त्रुटी पूर्ण करतो या सर्वच गोष्टी आपणास माहिती आहेत पण या 29 फेब्रुवारी च्या निमित्ताने मनन झाले म्हणूनच हा लेखन प्रपंच …
हे मनन आपणास आवडले असेल तर ‘पुढाळायला’ हरकत नाही आणि आपला “एक्स्ट्रा” वेळ खर्च करून प्रतिक्रिया कळवायलाही हरकत नाही… आपल्या प्रतिक्रिया ही ‘लेखकाची’ प्रेरणा आहे.
© श्री श्रीनिवास गोडसे
इचलकरंजी, मो – 9850434741
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈