सौ. सुचित्रा पवार
विविधा
☆ अंगणातले ऋतू (श्रावण) ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
आषाढाच्या रिपरिपीने आताशा कुठं उघडीप दिलीय. सूर्य नेहमी सारखा केशरी गोळा दिसत नाही तो सुद्धा पिवळसर दिसतोय. पूर्वेकडे पिवळा रंग सांडला आहे. सकाळी सकाळी झाडांवर पक्ष्यांची मधूर किलबिल सुरू आहे. पाणकोंबडा त्याच्या धीरगंभीर आवाजात खोलवर घुमत आहे. सातभाई क्षणात कुंपणावर तर क्षणात भुईवर येत कलकलाट करत आहेत. चिकूच्या झाडावर बुलबुल गोड आवाजात गाणे गात आहे. गच्च भरलेले पाण्याचे रांजण रिते होऊन खडबडाट व्हावा, तसे काळे मिट्ट ढग आता पांढरट दिसत आहेत. क्षणात काळा ढग येतो न एक सर पाझरून जातो.
…. ‘क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे’
विटांवर, कठीण भुईवर हिरव्यागार शेवाळाचे मऊ मऊ गालिचे पसरलेत. हिरवे हिरवे घनदाट जंगलच जणू! लहानपणी मुंग्यांची शेते म्हणायचो आम्ही. तगरीचे शेंडे पांढऱ्याशुभ्र फुलांनी डवरले आहेत. जणू आकाशातून कुणी चांदण्या अलगद झाडावर उधळून दिल्या आहेत. झाडाखाली अलगद झेपावणारा पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा बघितला की चांदण्या सांडल्याचा भास होतो. तगरीची ही एकेरी पाकळीची फुले देवाला प्रिय असतात म्हणे. दुसरी एक तगर असते टपोऱ्या पांढऱ्या फुलांची. या फुलांचा मात्र मंद गंध असतो.
सागाच्या उंच शेंड्यावर फुलांचे गुच्छ उमलले आहेत. त्याची इवली इवली पांढरी शुभ्र फुले लाह्या सांडल्यासारखी जमिनीवर पडली आहेत. किती नाजूक इवल्याशा पाकळ्या. वाऱ्याने इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. शिव शम्भोला प्रिय असणाऱ्या बेलाच्या हिरव्यागार पानांनी झाकोळलेल्या झाडावर कवठासारखी गोल गोल हिरवीगार फळे लटकत आहेत.
तगरीची हिरवीगार पाने खाऊन फुलपाखरांच्या अळ्या सुस्त झाल्यात. आता निवांत कोषात पडून राहण्याचे मनसुभे आखत त्या पानांचे भोजन मिटक्या मारत खात आहेत. पण हे काय?कोषात जाण्याचे मनसुभे त्या पाणकोंबड्याने आणि बुलबुलानी उद्धवस्त केलेत. त्यांच्या सूक्ष्म नजरेने त्यांना कधीच हेरून ठेवले होते फक्त संधी हवी होती. एकाच झपाट्यात दोघांनीही सगळ्या जाडजूड अळ्या फस्त करून टाकल्या. पुन्हा फुलपाखरे तिथंच पानावर चिकटून बसलीत. इवल्याशा जीवानी पुन्हा या सृष्टीत बागडण्यासाठी.
ती पहा गोगलगाईची चमचमणारी वाट. कुठं गेलीय बरं?तिचे चमचमणारे शंख हळदीच्या पानावर चमकत आहेत. आपल्या इवल्याश्या दातांनी पाने कुरतडत आहेत. निसर्ग सगळ्यांनाच हवे ते खायला प्यायला देतो, सगळ्यांनाच सारखे पोसतो नाही का?
तांबड्या वाणी किड्यांचे पुंजके इथं तिथं वळवळत आहेत. ओल्या जमिनीतून गांडूळ वर येऊन इकडे तिकडे वळवळत आहेत. ही केसाळ सुरवंटे आपल्या पाठीला कुबड काढून इकडे तिकडे खुशाल फिरताहेत. पण दुरूनच बघा, चुकून जरी स्पर्श झाला तर आग आग ठरलेली. पण घाबरू नका, ती झेंडू किंवा मखमलीची पाने तोडा आणि चुरून तो रस सुरवंट फिरलेल्या जागेवर लावा, त्वरित आराम मिळेल.
ही कर्दळीची फुले एखाद्या सुस्नात तरुणीच्या ताज्या तवान्या मुखड्यासारखी तजेलदार दिसत आहेत. पानेही अंगाखांद्यावर दहिवराचे काचमणी मिरवत आहेत. आणि राम प्रहरी हा मंद धुंद हवाहवासा सुगंध कुणाचा?प्राजक्त फुलला की रातराणी?नाही हं, हा आहे केशरी पिवळ्या सोनचाफ्याचा हवाहवासा धुंद करणारा गंध. शेंड्याशेंड्यावर फुललेली ही आकर्षक फुलं उमलताना जणू सुगंधाचे घडे हवेत सांडत आहेत. सगळे अंगण दरवळून गेले आहे. छाती भरभरून कितीही गंध हुंगला तरीही एक नाक आणि एक फुप्पुस अपुरेच वाटते. झाडाखाली नका निरखू. चाफा, प्राजक्त, तगरीप्रमाणे या फुलांचा सडा नाही तुम्हाला दिसणार. ही फुलं खाली गळलेली दिसत नाहीतच. पाकळ्या पाकळ्यानी हवेच्या झुळुकिसरशी ही जमिनीकडे झेपावतात अन मातीत मिसळून जातात. तसेही इथं जन्माला येणारा प्रत्येकजण शेवटी मातीतच मिसळतो नाही का?फुले तर कशी अपवाद असतील?फुलामागे गोलगोल खरखरीत फळांचे गुच्छ येतात त्यात छोट्या छोट्या बिया असतात. त्या किंचित झुकलेल्या बोरीकडे पाहिलेत?असंख्य कळ्या फुलांनी कशी डवरलीय!
हा पहा टपटपणारा केशरी नाजूक देठांचा इवल्या फुलांचा प्राजक्त सडा!खरखरीत खोड न पाने पाहून हे सुंदर सुगंधी फुलांचे झाड असेल असे कुणालाच वाटणार नाही. इतक्या छान फुलांना कोण्या इंग्रजी लेखकाने शॉवर ऑफ टिअर्स का म्हणावे बरे?त्या वेड्याला मुळात त्याचे समर्पण कळलेच नाही. भल्या पहाटे अवकाशात फिरणाऱ्या देवाच्या भ्रमणासाठी ही सुगंधी कुपी तो उघडून स्वतःस प्रभू चरणी आनंदाने विलीन करतो.
त्या भिंतीच्या फटीतून ते बघा कोण डोकावतेय?तो आहे शंकरोबा. गौराईच्या फुलोऱ्यातील एक महत्वाचा फुलोरा, याची पांढरीशुभ्र इवली इवली तेरड्यासारखी फुले किती खुलून दिसतात ना?
सर्वच पक्ष्यांना आपला मनाजोगता खाऊ अगदी मनसोक्त मिळत आहे. बेडकांची पिले डबक्यात सुळक्या मारत आहेत. खारुताई आपली शेपटी फुलवून झाडावरून खालीवर सरसर तुरुतुरु धावत आहे आणि मांजर सावज सहज घावते का ?याचा अंदाज घेण्यासाठी फिस्करून दात विचकत तिला घाबरवत आहे. पण ती जणू त्याला वाकुल्या दाखवत अजून उंच उंच जात आहे.
मोकळ्या मैदानावर अमाप हिरवे गवत दाटीवाटीने उगवले आहे आणि कितीतरी गवतफुले त्यांच्या शेंड्यावर दिमाखात झुलत आहेत. विंचवीच्या झुडुपांनी जांभळट गुलाबी फुले धारण केली आहेत. जाता येता नाना रंगांची फुलपाखरे त्यांना चुंबीत आहेत. कुणी कुणाचा रंग घेतला?फुलांनी फुलपाखरांचा की फुलपाखरांनी फुलांचा?काही समजेना झालेय. मधूनच एखादी पावसाची सर सुकल्या पंखांना ओलावत आहे. सकाळपासून उन्हात शेकत बसलेले झाडांचे शेंडे पुन्हा भिजून चिंब होताहेत. पानांवर थांबलेल्या जलबिंदूवर सूर्यकिरणे पडून पाने चांदणं सांडल्यासारखी चमचम करताहेत.
या दोन झाडांमध्ये पहा काय गम्मत आहे!भल्या मोठ्या कोळ्याच्या जाळ्यात भक्ष्य अडकायचे सोडून हे काय अडकलेय बरं?राम प्रहरीच्या दहिवराचे असंख्य छोटे छोटे थेंब की जणू काचमणी?आणि ते कसे अलवार झुलतेय! काचमण्यांनी विणलेला पडदाच जणू. किती विलोभनीय आणि मनोहारी दृश्य आहे हे! आणि ही पहा टाचणी. लांबट शरीर, बटबटीत डोळे आणि चार पायांचा तांबूस चतुरासारखा दिसणारा कीटक. पाने कुरतडतोय.
झाडांचा पर्णसंभार वाढला आहे आणि पानात लपून एक कारुण्य कोकीळ किती आर्ततेने प्यावप्याव करत आहे. चिरकाची जोडी आणि होल्यांची जोडी छोटे छोटे कीटक आणि धान्याचे कण वेचत आहेत;इतक्यातच पावसाची जोरदार सर आली अन त्यांची अश्शी त्रेधातिरपीट उडाली की काही बोलू नका. पटकन त्यानी झाडाच्या फांदीचा आसरा घेतला.
रात्री कधी बाहेर अंगणात गेलात तर एखाद दुसरा काजवा चमचम करत तुमचे लक्ष वेधून घेईल, मात्र त्यासाठी बाहेर काळोख हवा, विजेच्या लख्ख प्रकाशात काजवे चमकत नाहीत;आणि हो, दंगा, हॉर्नचा कोलाहल पण चालत नाही. एकदम शांत निरव रात्र काजव्यांना आवडते.
…. या श्रावणाचा किती वर्णावा महिमा
सुगंधी हिरव्या रंगांचा जणू हा महिना
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈