श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये ☆

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षणात विरुनही जातो. सर्वसामान्य माणसं येईल, होईल ते स्विकारत जगत असतात. कालपटलावर अशा सर्वसामान्यांची नावे पुसटशीही उमटलेली नसतात. एखादे स्वप्न, एखादं ध्येय उराशी बाळगून, त्यासाठी सर्वस्वाची आहुती देत झपाटल्यासारखी जगणारी माणसे मात्र त्यांच्या पश्चातही कधीच न पुसणारा अमीट ठसा कालपटलावर उमटवून जातात आणि म्हणूनच दीर्घकाळानंतरही जनमानसावर अधिराज्य गाजवत स्मृतिरुपात अमर रहातात. प्रत्येक क्षेत्राचा आढावा घेतला, तर त्या त्या क्षेत्रातल्या किर्तीरुपाने उरलेल्या अशा अनेक महान व्यक्तिंचा महिमा आदर्शरुपात पुढील पिढ्यांना जगण्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ बनलेला

आपल्याला दिसून येईल. इथे प्रत्येक क्षेत्रातल्या वानगीदाखल कांही नावांचा  उल्लेख करायचा ठरवलं, तरी त्या त्या क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींची असंख्य नावे मनात गर्दी करु लागतील आणि यातली कांही मोजकी नावे निवडणे म्हणजे इतरांवर अन्याय केल्याची रुखरुख मनाला लागून राहील. चित्रपटक्षेत्र, नाट्यक्षेत्र,  गायन, वादन, नृत्यादी कला, लेखन, वक्तृत्त्व, शिक्षण, क्रिडा समाजसेवा… कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. झोकून देऊन काम केलेल्या आणि दर्जाच्या बाबतीत कधीच कसली तडजोड न करता आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिंचा महिमा कालातीत आहे हीच त्यांची महानता..!

राजकारण हे क्षेत्र तसं दलदलीचं. भल्याभल्यानाही लोकानुनयासाठी तडजोडी करीतच इथे श्वास घेता येतो यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारं हे क्षेत्र..! पण याही क्षेत्रात वीर सावरकर, म.गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, लालबहादूर शास्त्री अशी मोजकी का होईना चटकन् आठवणारी नावे आहेतच. क्षेत्र कोणतेही असो महानतेच्या निकषावर खरी उतरतात ती तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, ध्येयाने पछाडलेली चांगल्या अर्थाने ‘वेडी’ माणसे..! आणि त्यांचाच महिमा निर्विवाद महान ठरतो.

अर्थात हा सगळा व्यक्तिगत महिमा लौकिकार्थाने, रुढार्थाने दखल घ्यावी असाच आहे.  पण माझ्यामते खरा ‘अपार’ महिमा काळाचाच..! अल्पकाळ, प्रदीर्घकाळ या अनेक काळरुपांच्या पलिकडचा हा ‘काळ’..! ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ म्हणतात त्यातला ‘काळ’नव्हे, तर ‘काळासारखं दुसरं औषध नाही’ म्हणतात ना, तो ‘काळ’..!

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षण क्षणात विरुन जातो. या विरुन गेलेल्या अविरत क्षणांचा बनतो तो हाच ‘काळ’..! दु:ख वियोगाचं असो, कांहीतरी निसटल्याचं, हरवून गेल्याचं असो, असह्य असो वा न विसरता येणारं असो, सगळ्या दु:खांवरचं काळ हेच एकमेव रामबाण औषध..! क्लेशकारक, दु:खदायी आठवणींची तिव्रता जसा हा काळ कमी करतो, तसंच सुखद, समृध्द आठवणी आपल्या कूपीत अलगद जपून ठेवत त्या आठवणींचा सुगंध वृध्दींगत करत असतो तोही हाच काळ..! एरवी महान वाटणार्या व्यक्तिंच्या कार्यकर्तृत्वाचा कस घासून पहातो

तो हा काळच आणि त्याच्या निकषावरच खरा महिमा, खरी महानता टिकून तरी रहाते किंवा विरुन तरी जाते. कोण चूक कोण बरोबर याचं उत्तर काळाच्याच उदरात दडलेलं असतं. काळाचा महिमा अपार, अपरंपार म्हणतात ते यासाठीच..!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments