सुश्री दीप्ती कुलकर्णी
☆ विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
आरसा ज्याला दर्पण ‘असेही म्हणतात, तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘
सांग दर्पणा दिसे मी कशी? असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!
तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.
तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो. कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो. सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी या आरशाची खूपच मदत होते.
पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो . तो आरसा म्हणजे मनाचा आरसा. ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी,दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण, रागीट, भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो. म्हणूनच म्हंटले जाते.
चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं
चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं।
आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो. पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो. म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे हलके होते.
ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच. याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.
म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. उभा,आडवा,चौकोनी, गोल,षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात. मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवा वस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.
गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत. चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो. चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.
© सुश्री दीप्ती कुलकर्णी
कोल्हापूर
भ्र. 9552448461
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈