सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ आनंदाचे डोही आनंद तरंग… ☆ सौ ज्योती विलास जोशी

आनंदाचे डोही आनंद तरंग…..

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो

क्या गम है जिस को छुपा रहे हो

ही गझल ऐकता ऐकता विचारांचा भुंगा मनाभोवती पिंगा घालू लागला. दुःखाचा विसर होण्यासाठी हास्याचा धबधबा हवा. इतकं साधं आणि सोपं  दुःखावर सोल्युशन आहे

असाच अर्थ लावला माझ्या मनानं …. हा धबधबा अर्थातच नैसर्गिक हवा ना?…. त्याचा उगम कसा? त्याची व्याप्ती किती? तो किती वेगाने आणि किती उंचावरून पडणारा आणि किती मोहक असावा? या सर्व प्रश्नांचं उत्तरं एका वाक्यातंच….तो आनंदाचा स्त्रोत असावा.

होय! हास्यातून आनंद आणि आनंदातून हास्य निर्माण होतं, जे नैसर्गिक आनंद देतं.आनंदाची बेरीज म्हणजे दुःखाची वजाबाकी.आनंदाला दुःखाची झालर आणि दुःखाला आनंदाची किनार असतेच म्हणून तर आनंदा मागून दुःख आले तरी ते पचवायची क्षमता येते आणि त्यानंतर येणाऱ्या आनंदाची ग्वाही आपल्याला मिळते.

जीवनाच्या आनंदयात्रेवर दुःखाचे स्पीड ब्रेकर असणारच!आपल्या प्रत्येकाला निसर्गदत्त अशा परीसाच वरदान आहे.त्या परीसास सुखाचे आनंदाचे क्षण चिकटत असतात. परिसस्पर्श होताच या क्षणांचं सोनं होत असतं आपला हेतू साध्य होत असतो परंतु याकडे आपलं लक्ष नसतं. आपण नुसतं धावत असतो. ते सुवर्णक्षण वेचायचा आनंद आपण उपभोगत नाही. प्रत्येक क्षणात ओतप्रोत भरलेला असतो आनंद… परंतु आपल्याला तो कणाकणानं क्षणाक्षणानं वेचायची सवय नाही आपल्याला तो तात्काळ भरभरून हवा…. या आपल्या अट्टाहासापायी आपण आनंदाला मुकतो.

लहानपणी  ‘आई माझं पत्र हरवलं’ह्या खेळात ‘ते मला सापडलं’ असं म्हणून पत्र लगेच सापडायचं….. कारण ते कुठंच हरवलेलंच नसायचं… तसंच सुखही आपल्या अवतीभवतीच आहे. फक्त शोधण्याची कला हवी.नाही का? लपाछपीचा खेळ ही तसाच! एका ठराविक कक्षेत सगळेच गडी असायचे. ते कुठेच हरवलेले नसायचे. शोधले की सापडायचे आणि मग कोण आनंद मिळायचा. आनंदाचं ही तसंच आहे. तो इतस्ततः विखुरला आहे.तो गोळा करायची ताकद हवी, संयम हवा एवढंच!

आपलं घर हेच आपलं आनंद निधान आहे, हेच आपण विसरतो आहोत.आपलं काम सुकर व्हावं म्हणून आपण यंत्र विकत घेतली आहेत .थोडक्यात आनंद विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे. या यंत्रांच्या हप्त्यासाठी पैसे गोळा करण्याचा छंद आपल्याला लागलेला आहे आणि ती तडफड आपले सुखाचे क्षण हिरावून घेतेय.

चिमण्यांचा किलबिलाट हा सत्य आणि शाश्वत आनंद आहे पण आपण त्याकडे कानाडोळा करतो आहोत. ट्विटरवरील नैसर्गिक असं चिमणीचं आपल्याला आनंद देते आणि आपण नैसर्गिक आनंदाला मुकतो आहोत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे हे ठाऊक असूनही इकडे तिकडे चोहिकडे बघण्यास आपणाला वेळ नाही.

आनंद कुठे कुठे आहे तो कुठे शोधायचा हे एकदा सापडले की  मग…..आनंदाचे डोही आनंद तरंग…….आनंदलहान मुलाच्या निरागसतेत आहे. आनंद आपल्या मनात आहे .अंतरंगात आहे. आपल्या अस्तित्वात आहे.आपल्या श्वासात आहे. आनंद निसर्गात आहे. धुंद हवेत, गुलाबी थंडीत ,रिमझिम श्रावणात, चांदण्या रात्रीत, हिरव्या रंगात ,इंद्रधनुष्यात ,संगीताच्या सात सुरात,लताच्या आवाजात, छंदाच्या वेडात वाचनाच्या धुंदीत……

परमेश्वराला देखील सच्चिदानंद म्हटलं आहे. समर्थ रामदासांनी ‘आनंदवनभुवन’ असं परमेश्वराला संबोधलं आहे. अहो माणसाचा जन्मच आनंदातून झाला आहे हे आपण कसे विसरतो? ‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक’ ही अमृतवाणी आहे. ‘तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे’ म्हणून आनंदाचा साठा वाटत संत फिरतायेत. तो भरभरून घ्यावा असे आपल्याला का बरे वाटत नाही?

जीवन हे आनंदाचं  वरदान आहे. तो एक आनंदोत्सव आहे,हे विसरता कामा नये.आनंद भरून घ्यायचा असेल तर मनाची कवाडं उघडी हवीत .एकदा का तो रोमारोमात संचारला की मग अगदी हलकंफुलकं पिसासारखं वाटायला लागेल. आणि मग आनंद पोटात माझ्या माईना म्हणून उंच उडावसंही वाटेल. ….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments