सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ “आचार्य अत्रेंची काव्य सृष्टी ” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
मराठीतील एक बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे श्री. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे. ते नामवंत लेखक, नाटककार, कवी, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्कृष्ट वक्ता होते.
त्यांनी तो मी नव्हेच, घराबाहेर, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार यासारखी अनेक गाजलेली नाटके लिहिली. कथासंग्रह, क-हेचे पाणी हे आत्मचरित्र, कादंबरी, इतर असंख्य पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकाच्या निमित्ताने विपुल लेखन केले. चित्रपटासाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले.त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले ‘सुवर्ण कमळ’ मिळाले.
त्यांनी ‘केशव कुमार’ या नावाने कविता लेखन केले. केशवकुमार म्हटले की आठवतात ती ‘झेंडूची फुले’, ‘गीतगंगा’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. झेंडूची फुले हा विडंबनात्मक कविता संग्रह जगद्विख्यात आहे. या काव्य लेखनाला त्यांनी स्वतंत्र स्थान मिळवून दिले. झेंडूची फुलेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा याबाबत मान्यवरांचे सविस्तर विचार या पुस्तकात दिलेले आहेत. कविवर्य केशवसुतांची “आम्ही कोण ?” ही प्रसिद्ध कविता. या कवितेचे आचार्य अत्र्यांनी केलेले विडंबनही लोकप्रिय झाले.
केशवसुत —
आम्ही आम्ही कोण म्हणूनी काय पुससी ? आम्ही असू लाडके |
देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळायला |
———-
आम्हाला वगळा – गतप्रभ जणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे|
आचार्य अत्रे —
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता?दाताड वेंगाडुनी ?
फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला ? ||
————
आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके ||
यावरून या पुस्तकाची झलक लक्षात येते.
अत्र्यांनी इतर काही चित्रपट गीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. ती आजही लोकप्रिय आहेत. १.छडी लागे छम छम, २.भरजरी ग पितांबर (दोन्ही चित्रपट श्यामची आई), यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया (चित्रपट ब्रह्मचारी), १.प्रेम हे वंचिता| मोह ना मज जीवनाचा ||२. प्रिती सुरी दुधारी ( दोन्ही नाटक पाणिग्रहण), किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार (नाटक प्रितिसंगम) त्यांच्या काही प्रसिद्ध कविता बालभारती या पुस्तकात समाविष्ट आहेत उदा.आजीचे घड्याळ, माझी शाळा. त्यांची ‘प्रेमाचा गुलकंद’ ही एक मस्त वेगळीच मजा प्रेमकविता आहे. दिवस रात्रीच्या वेळा, सूर्याची स्थिती, कोंबड्याचे आरवणे, रात्री वाजणारा चौघडा यावरून आजी वेळ अचूक सांगत असे. पण कुठेही न दिसणारे, न वाजणारे हे आजीचे घड्याळ म्हणूनच मुलांना कुतूहलाचे वाटते.
शाळेची प्रार्थना म्हणून म्हटली जाणारी त्यांची प्रसिद्ध कविता म्हणजे ‘माझी शाळा’.
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही, जसा माऊली बाळा ||
इथे हसत खेळत गोष्टी सांगत गुरुजन शिक्षण देतात. बंधुप्रेमाचे धडे मिळतात, देशकार्याची प्रेरणा मिळते, जी मुलांना देशासाठी तयार करते त्या शाळेचे नाव आपल्या कार्यातून उज्वल करा अशी शिकवण अतिशय सोप्या शब्दात ही कविता देते.
असेच त्यांचे खूप गाजलेले गीत म्हणजे ‘भरजरी गं पितांबर’. ‘श्यामची आई’ या चित्रपटातले हे गीत आजही लोकप्रिय आहे. बहीण भावाचे नाते, त्यातली प्रीती, श्रीमंतीचा बडेजाव, परमेश्वर स्वरूप भावासाठी सर्वस्व देण्याची समर्पण वृत्ती अशा वेगवेगळ्या मानवी स्वभाव छटांवर हे गीत अप्रतिम भाष्य करते. “चिंधीसाठी शालू किंवा पैठणी फाडून देऊ काय ?” असे विचारत सख्ख्या बहिणीने चिंधी दिली नाही. तर मानलेल्या बहिणीला वसने देऊन तिची लाज राखत पाठीराखा झालेल्या भावासाठी मानलेल्या बहिणीने त्रैलोक्य मोलाचे वसन भक्तीभावाने फाडून दिले. यासाठी अंत:करणापासून ओढ वाटली पाहिजे तरच लाभाविण प्रीती करता येते. नात्यांचे महत्त्व, त्यांची जपणूक अतिशय सोप्या, सुंदर शब्दात सांगितलेली आहे. आजच्या काळातील बदलत्या मानसिकतेला तर हे गीत छान मार्गदर्शन करते. अशा प्रकारे कविता, विडंबन काव्य, चित्रपट गीते, नाट्यगीते अशा विविध प्रकारात आपला ठसा उमटविणारी आचार्य अत्रे यांची अतिशय विलोभनीय, समृद्ध आणि लोकप्रिय काव्यसृष्टी आहे.
त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.🙏
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈