श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ आँखों से जो उतरी हैं दिल में… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
माझ्यासाठी वाचन हा दिव्यानंदाची अनुभूती देणारा अनुभव आहे. एखादी छान पौर्णिमेची रात्र असावी आणि खिडकीतून चांदणं आत झिरपत यावं तसा शांत, दिव्य आणि प्रसन्न अनुभव वाचन आपल्याला देतं. या प्रसन्न अनुभवाचं माध्यम असतं एखादं आवडतं पुस्तक, कथा किंवा कविता. डोळ्यांच्या मार्गानं हे चांदणं थेट आतपर्यंत झिरपतं आणि आत्मानंदाचा प्रसन्न अनुभव देतं . एखाद्या पट्टीच्या गायकाला जसा मैफलीत सूर गवसावा आणि मैफल उत्तरोत्तर रंगत जावी तसाच हा अनुभव असतो. या मैफलीत श्रोते जसे सुरांच्या वर्षावाने सचैल न्हाऊन निघतात, तसाच आनंद चांगल्या पुस्तकाचं वाचन आपल्याला देतं.
बरं हे वाचन आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे. मार्ग वेगवेगळे आणि माध्यमही वेगवेगळे. पण परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आनंदाची अनुभूती. जेव्हा मी माझ्यासाठी वाचतो, तेव्हा पुस्तकातील ती अक्षरे अमूर्त रूप धारण करून डोळ्यांच्या खिडकीवाटे थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. येताना ती अक्षरे एकेकटी येत नाहीत. ते आपल्यासोबत आनंद, प्रसन्नता कणाकणाने घेऊन आत शिरतात. काळोख्या रात्रीत जसे एखाद्या काचेच्या बरणीत काजवे एकत्र गोळा करावेत आणि ती काचेची बरणी प्रकाशमान व्हावी, तिचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडावा आणि आपला चेहरा काळोखातही उजळून निघावा तसेच वाचन माझ्या अंतरंग प्रकाशाने भरून टाकते. मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघतो. उन्हाळ्यात तहानलेल्या धरणीवर जसे पावसाचे थेंब पडावेत आणि थोड्याच वेळात आपल्या शीतलतेने त्यांनी धरित्रीला शांत करावे तसे उत्तम वाङ्मय मनाच्या तहानलेल्या धरणीवर अमृताचे सिंचन करते. मग उन्हाने कोमेजलेले, करपलेले अंकुर टवटवीत होऊन वर येतात आणि ते ‘हिरवे हिरवे गार गालिचे ‘ मनाला प्रसन्नता आणि शांतता देतात.
जेव्हा एखादे बुवा, पुराणिक, कथाकार, कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीद्वारे रामायण, भागवत, हरिविजय, पांडवप्रताप यासारखा एखादा ग्रंथ श्रोत्यांसमोर वाचतात, तेव्हा ते स्वतःबरोबर इतरांनाही आनंदाची अनुभूती देतात. मुळातच हे ग्रंथ भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले आहेत, त्यात सांगणाऱ्या बुवांची वाणी रसाळ आणि प्रासादिक असेल तर मग विचारायलाच नको. श्रोते त्या वर्षावात चिंब न्हाऊन निघतात. आताही माध्यम तेच असते. म्हणजे बुवांच्या समोर असलेला प्रासादिक ग्रंथ. पण त्या ग्रंथातील अक्षरे आता बुवांच्या हृदयातील ओलावा, आनंद, प्रसन्नता घेऊन ध्वनीचे रूप धारण करतात. आता त्यांचा हृदयात उतरण्याचा मार्ग बदलतो. डोळ्यांच्या ऐवजी ती कानावाटे प्रवेश करती होतात. कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. पण परिणाम मात्र तोच असतो. आणि तो परिणाम म्हणजे दिव्यानंदाची अनुभूती.
ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आणि तेव्हा जे श्रोते हजर असतील, ते किती भाग्यवान म्हणावेत ! ते दृश्य जेव्हा मी कल्पनेने डोळ्यासमोर आणतो, तेव्हा मला दिसते ते मंदिर. माऊली खांबाला ( पैस ) टेकून बसल्या आहेत. समोर त्यांचे बोल आपल्या कानात साठवून घेण्यासाठी चातकाप्रमाणे आतुर झालेला श्रोतृवर्ग बसलेला आहे. बाजूला निवृत्तीनाथ आहेत. माऊलींच्या दोन्ही बाजूला दोन समया प्रकाशमान आहेत. त्या समयांच्या प्रकाश माऊलींच्या मुखमंडलावर पडला आहे. मुळातच तेजस्वी असलेली माऊलींची मुद्रा त्या प्रकाशात आणखीनच दिव्य प्रकाशाने उजळून निघाली आहे. माऊलींच्या मुखातून आता अमृतासमान अशा एकेक ओव्या बाहेर पडताहेत. ओम नमोजी आद्याने सुरुवात झाली आहे. एकामागून एक निरनिराळी रूपके, उपमा घेऊन त्या ओव्या श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहेत. इथे श्रोत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. हा आनंद किती आणि कुठे कसा साठवावा हे त्यांना उमजत नाही. जणू त्यांच्या सर्वांगाचे कान झाले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे अमृतमयी बोल ते आपल्या हृदयात साठवून घेत आहेत. हृदयीचे हृदयी घातले अशी ही अवस्था !
‘तरी आता अवधान दिजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे‘ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते उगीच नाही.
महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण लव कुश यांनी जेव्हा श्रीरामांच्या दरबारात श्रीराम आणि श्रोत्यांसमोर गायिले तेव्हा सर्वांची काय अवस्था झाली ते आपण रामायणात वाचतोच. ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो ते ग दि माडगूळकर गीतरामायणाच्या लेखनामुळे अजरामर झाले. हेच गीतरामायण बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी गाऊन अजरामर केले. यातील ते गीत सहजच ओठांवर येते
स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती.
मग ही गाणारी मुले कशी आहेत याचे चित्रमय वर्णन गदिमा करतात. ते म्हणतात
राजस मुद्रा वेष मुनींचे, गंधर्वच ते तपोवनींचे
अशा एकेक ओळी आठवत जातात. या सगळ्यांचा श्रोतृवृंदावर काय परिणाम होतो, तो पण गदिमा जणू सचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. ते म्हणतात
सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुनी सर्ग चालती
सचिव मुनिजन प्रिया डोलती, आसवे गाली ओघळती.
प्रत्यक्ष श्रीरामांवर काय परिणाम झाला तर…
सोडून आसन उठले राघव, उठुनि कवळती अपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती.
अशी जादू जणू हे शब्द करतात ! मग ते शब्द वाल्मिकींचे असोत वा गदिमांचे. ती अमूर्त अक्षरे ध्वनीचे रूप घेऊन कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. आनंदाच्या चांदण्याची बरसात होते. कर्तव्यकठोर असलेल्या श्रीरामांचे देखील डोळे पाणावतात. माया, ममता, प्रेम, करुणा सगळे सगळे भाव हे शब्द उभे करतात.
असं म्हटलं जातं की प्रख्यात जर्मन कवी गटे यांनी कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचं जर्मन भाषेत केलेलं भाषांतर जेव्हा वाचलं, तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की हा जर्मन कवी आपलं देहभान विसरून शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला. कुठून आला हा आनंद ? पुस्तकाच्या वाचनातूनच ना ? या आनंदाला उपमा नाही आणि त्याची तुलना इतर कुठल्या आनंदाशी होऊ शकत नाही. त्या काळात पाश्चात्य साहित्यात सौंदर्यवाद ( romanticism ) मूळ धरू लागला होता. अशा काळात कालिदासाने लिहिलेलं शकुंतलेचं आणि निसर्गाचं वर्णन वाचून हा कवी अक्षरशः वेडा झाला. त्याने त्यावेळी शाकुंतल या ग्रंथाबद्दल काढलेले उद्गार असे आहेत. ‘ वसंतऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाचवेळी ( युगपद्) ज्यात आहे, जे ( एकाच वेळी) मनाला शांत करणारे ( संतर्पणम्) आणि मोहितही करणारे आहे. किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रियमित्रा, तू शाकुंतलाचा आस्वाद घे. ‘ मला वाटतं हेच उद्गार सर्व ग्रंथांना लागू होतात .
ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून त्यांच्या भाषेत मला असे सांगावेसे वाटते
ग्रंथ सर्व रसांचा आगरु, ग्रंथ सर्व सुखांचा सागरु
तरी ग्रंथ हाती घेईजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे.
जशी प्रेशर कुकरमध्ये कोंडलेली वाफ बाहेर पडणे आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या मनात साठलेल्या भावनांचे सुद्धा मुक्त होणे, निचरा होणे किंवा ज्याला आपण विरेचन असे म्हणू तेही आवश्यकच असते. पुस्तके आणि त्यांचे वाचन अशा प्रकारचे भावनांचे विरेचन ज्याला इंग्रजीत कॅथर्सिस म्हटले जाते ते घडवून आणतात. मी वाचकही आहे आणि लेखकही. माझा तर श्वास म्हणजे वाचन ! मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा एखादे आवडते पुस्तक हातात घेतो आणि माझा आनंद दुणावतो. मी जेव्हा दुःखात असतो तेव्हाही एखादे पुस्तक हातात घेतो आणि माझे दुःख उणावते. थोडक्यात म्हणजे गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे चांगल्या पुस्तकांचे वाचन हे ‘ सुखकर्ता दुःखहर्ता’ अशा प्रकारचे आहे. स्वानंदासाठी वाचन करावे, विचार, अनुभव आणि भावना समृद्ध होण्यासाठी वाचन करावे. ‘मेरा पढने में नही लागे दिल…‘ असे न म्हणता ‘मेरा पढने मे हीं लागे दिल ‘ असे म्हणू या.
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Atishaya Sunder lekh. Ya rhudayatun that rhdayat.⁹