सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
(शिक्षक दिन विशेष)
शिक्षक आणि समाज, गाव याचे खूपच निकटचे संबंध असतात. पुर्वी खेड्या-पाड्यातून गावातील शिक्षकांना लोक खुप मानत असत. गावात होणाऱ्या अनेक घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचा आवर्जून सहभाग होत असे. अनेक बर्या-वाईट प्रसंगात शिक्षकांचा सल्ला घेतला जायचा. इतकेच काय फार पुर्वी गावात एखांद्याचे पत्र आले तरी लोक ते पत्र गावातील शिक्षकांकडून वाचून घेत असत. घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचे आदरातिथ्य पण मोठ्या कौतुकाने होत असे. इतके समाजात शिक्षकांचे महत्त्व होते.
आज बदलत्या काळानुसार लोक बदलले. आणि समाज बदलत चालला आहे. आज समाजात पुर्वी असणारे शिक्षकांचे स्थान कुठेतरी मावळताना दिसत आहे. तरी सुध्दा मला एका गावाची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगावी वाटते. सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालूक्यात उत्तरेकडे पणुंब्रे-घागरेवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव आहे. खरोखर या गावाला ‘ आदर्श शिक्षकांचा ‘ गाव असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही. तुम्ही या गावाला भेट द्याल तर प्रत्येक गल्लीत एक तरी आजी -माजी शिक्षक तुम्हास भेटतीलच. आणि या सर्वच शिक्षकांचे गावच्या शैक्षणिक विकासात खूपच मोलाचे सहकार्य आहे.
या गावात जुन्या काळातील शिक्षक बी. एम. पाटील गुरूजी, एम. जी. पाटील गुरूजी, तसेच पांडुरंग घागरे गुरूजी, रंगराव भोसले गुरुजी, तानाजी परीट गुरुजी, आणि आदर्शतेचा वारसा जपणारे, अत्यंत शिस्तप्रिय असे तुकाराम बळवंत पाटील (तात्या गुरुजी) आजही त्यांचा आदर्श आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये आहे, तसेच प्रसिद्ध कीर्तनकार मा. पी. सी. पाटील सर ( मराठीचे प्राध्यापक ), एम. टी. घागरे सर, कै शामराव पाटील गुरूजी, इत्यादी अनेक शिक्षकांचा वारसा या पणुब्रे-घागरेवाडी गावास लाभला. या सर्व गुरुजनांनी घडविलेले अनेक विद्यार्थी व याच गावचे सुपुत्र देशात व देशाबाहेर देखिल चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. गावातील मुले-मुली आज संपुर्ण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, देशसेवेत, क्रिडा, कला, वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रात या गावातील अनेक युवक-युवती कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. हे सर्व श्रेय या गावच्या शिक्षकांचे आहे या सर्व शिक्षकांनी फक्त चार भित्तीच्या आत शाळेतच विद्यार्थी घडविले नाहीत तर ते सदैव गावचा विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, पंचक्रोशीत गावाचे चांगले नाव असावे म्हणून ही सर्व शिक्षक मंडळी सदैव झटत राहिले. आज या सर्व माजी शिक्षकांचे कितीतरी विद्यार्थी सेवानिवृत्त आहेत. पण गावात वावरताना समोरून त्यांचे हे सर्व माजी शिक्षक भेटले तर त्यांच्याबद्दलाचा तोच आदर, आणि आपले गुरूजी म्हणून त्यांच्याबद्दल तोच सन्मान नजरेत असतो. हेच या गावातील सर्व माजी शिक्षकांच्या ज्ञानाचे फळ आहे. पणुंब्रे-घागरेवाडी येथील दोन्ही मराठी शाळांना ‘ स्वच्छ सुंदर शाळा ‘ आणि ‘आदर्श शाळा ‘ असे पुरस्कार प्राप्त आहेत.
आज याच माजी शिक्षकांच्या आदर्शतेचा वारसा पुढे नेणारे याच गावचे अनेक आजी शिक्षक आहेत. या गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. बाजीराव पाटील सर, पणुंब्रे मराठी शाळेत असणारे शिराळा तालूक्यात आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा सन्मान आहे ते मा. विलास घागरे सर, तसेच अशोक तातोबा घागरे सर, गावातीलच मा. यटम सर, इ. कितीतरी माजी शिक्षकांचे विद्यार्थी असणारे हे सर्व आजी शिक्षक गावच्या शैक्षणिक, , सामाजिक, तसेच सांस्कृतिक विकासासाठी झटत आहेत. हे सर्व आजी शिक्षक या माजी शिक्षकांचेच विद्यार्थी आहेत.
तसेच पणुंब्रे गावच्या पहिल्या महिला शिक्षिका कै. सावित्री भोसले पाटील मॅडम (पाचुंब्री), घागरेवाडीच्या पहिल्या शिक्षिका सध्या शिराळ्यात कार्यरत असणार्या आदर्श शिक्षका सौ. अनुराधा पाटील -घागरे मॅडम(बिऊर), सौ. जयश्री पाटील मॅडम, मुंबई येथे प्रिन्सिपल असणाऱ्या सौ. कविता पवार – भोसले मॅडम(ऐतवडे), प्रा. सौ. गीतांजली पाटील मॅडम या सर्व शिक्षिका याच गावच्या माहेरवाशीण आहेत त्या सुध्दा आपल्या सासरी जाऊन आदर्श शिक्षकेचा वारसा जपत आहेत तो याच गावचा आदर्श ठेवून.
खरोखर या पणुंब्रे-घागरेवाडी गावचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात या सर्व आजी-माजी शिक्षकांचे ज्ञानदानाचे योगदान खुपच अमुल्य आहे. हे सर्वजण शिक्षक म्हणून गावाला लाभले हे या गावचे श्री भैरवनाथ कृपेने मोठे भाग्य आहे. म्हणून म्हणावे वाटते ” ज्या गावाला, समाजाला चांगले शिक्षक लाभले तो गाव विकासापासून कधीच दूर रहात नाही. “
मोठ्या अभिमानाने शेवटी लिहावे वाटते, असे शिक्षकांचे गाव मला माहेर म्हणून लाभले हे मी माझे थोर भाग्य मानते. येथील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचीच ही माझी शब्दपुष्पे शुभेच्छा म्हणून या सर्व शिक्षकांना देत आहे.
“शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा”
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈