मराठी साहित्य – विविधा ☆ इथे साहित्याचे साचे मिळतील ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ इथे साहित्याचे साचे मिळतील ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

पत्ता: माझी टवाळखोरी  मॉल, हास्यदा रोड, टवाळपूर, ४२०४२०

‘हॅलो, नमस्कार, बोला ….

‘टवाळखोरी मॉल’ आहे ना हा?’

‘हो, हो. बोला की’

‘आम्हाला  मॉल  बघायला यायचे होते आज. प्रसिध्द्व ’फॉरवर्डकार’ खेळकर यांनी त्यांचा  रेफरन्स देऊन तुम्हाला  फोन करायला सांगितलय. आम्ही  त्यांचे जवळचे स्नेही.  अपॉईनमेंट  घेऊन यावे लागते ना तुमच्या मॉलला  म्हणून फोन केला.’

‘बरं बरं. पण शनिवार/रविवार बुकींग फुल्ल आहे हो. सोमवार नंतर नाही का जमणार?’

‘बघा ना  प्लिज.’

‘खेळकरांनीच  सांगितले, माझे नाव सांगा, देतील अपॉईमेंट.’

‘आता तुम्ही एवढं मोठं नाव घेतलय. नाही कसं म्हणणार?  या दुपारपर्यत!’

………………………………………..

‘नमस्कार!  आम्ही तुम्हाला  सकाळी फोन केला होता.’

‘हो हो, या या.’

बोला, काय पाहिजे तुम्हाला ?

आम्हाला पूर्ण मॉल  कसा आहे,  म्हणजे कुठे काय आहे, कुठे कोणत्या प्रकारचे साचे आहेत, हे  सांगाल का, मग आम्ही ठरवू.’

‘ठीक आहे.  हे  बघा  आमच्या कडे  सर्व प्रकारचे, सर्व विषयावरील  लेखन – साचे मिळतील.  तुम्हाला ते  कुठल्या सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहेत, त्यानुसार ते ठरवावे लागतील.’

‘म्हणजे?

म्हणजे असं बघा, तुम्हाला  व्हाट्सअप/सिग्नल/टेलिग्राम साठी पाहिजे असेल तर पहिला मजला. फेसबुक/ब्लॉग या मंचासाठी दुसरा मजला.  या दोन्ही मजल्यावर जाण्यासाठी  काही फी नाही म्हणजे ’विंडो शॉपिंग’ सारखं नुसतं फेरफटकाही मारू शकता.  तिथे  प्रत्येक मजल्यावर परत  वेगवेगळे विभाग आहेत.  वाढदिवस शुभेच्छा/ आभार/व्हिडीओ, दिन विशेषानुसार लेखन ( स्मृती दिन/जन्म दिन ), गुड मोर्नीग  ते शुभ  रात्री  – गुलाबाची फुले/निसर्गचित्र सोबत एखादा  मराठी/हिंदी/इंग्रजी सुविचार, धार्मिक दिन विशेष,सण, परंपरा, प्रासंगिक  घटनेवर मिम्स, तसेच इतिहासातील  कोण कुणास, केव्हा काय म्हणाले/लाव रे तो व्हिडीओ, लघुकथा, रहस्य  कथा, बालगीते, विडंबन,  असे हटके विभाग  आहेत. सध्या दोन्ही मजल्यावरचे ’राजकारण’विभाग मात्र एकदम  फुल्ल आहेत. तिथे मात्र तुम्हाला किमान १० दिवस आधीच  नाव नोंदवून यावे लागेल.’

‘एक मिनिट हं….  हा  बोला  राम भाऊ.’

‘काय म्हणता  कंप्लेंट करायची आहे ?   अहो मग  ग्राहक सेवा विभागाला  फोन करून तक्रार  नोंदवा.  हा घ्या  नंबर ४२०४२०४२०….  काय? मी ऐकून तरी  घेऊ?  बर  सांगा…..  काय म्हणता? या विनोदाने  अपमान होतोय ?  कुठला विनोद?   रामभाऊ  तुम्ही आमचे नियम वाचलेत का?  ? एकदा विकत घेतलेल्या साहित्यावर काही आक्षेप असल्यास २-३ तासात बदल करून घ्यावेत, नंतर तक्रार चालणार नाही ? असं स्पष्ट  लिहिलंय आम्ही.  आता हा विनोद एव्हढा व्हायरल झाला, कुण्या ज्ञानवंताने तुम्हाला जाब विचारला मग जागे झालात तुम्ही?  तरी देखील तुम्ही तक्रार नोंदवा आम्ही योग्य तो बदल करून देऊ’

‘हा! सॉरी हं… मधेच फोन आल,  हे  रामभाऊ आमचं नेहमीचं गि-हाईक.’

‘असू दे असू दे, पण तिसर्‍या मजल्यावर काय आहे?

‘हा तिथे जाण्यासाठी मात्र तुम्हाला आमचे ’प्राईम कस्टमर’ असणे आवश्यक आहे. तो खास लोकांचा ’ट्विटर’ विभाग आहे.  ट्विट बद्दलची सर्व माहिती’अ’पासून’’ज्ञ’ पर्यत, ट्विट्स वगैरे आम्ही सर्व शिकवतो. कमी शब्दातील अनेक’ट्विट’तिथे तुम्हाला सहज मिळतील.  ते कसे पोस्ट करायचे त्यावर  रिट्विट कसे करायचे,  ते व्हायरल कसे करायचे,  इतरांना फाँलो कसे करायचे, फाईल अपलोड करून डिलीट कशी करायची इ इ इ…. तिथे मेंबरशीप घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल.’

‘आणखी एक प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक विभागात  भाऊ, अण्णा, आक्का, तोडकर, काटकर  असे अनेक  मार्गदर्शक आहेत, ते तुम्हाला हवे तसे साहित्य, हव्या त्या शब्दात/प्रकारात लगेच करून देतील. आणि हो  १००० रु च्या खरेदीवर  एक’ऑनलाईन स्पर्धेसाठी  तुमचा एक व्हिडीओ’आम्ही  फ्री मध्ये बनवून देऊ,  ही स्पेशल ऑफर फक्त काही दिवसासाठी बर का… बरं मग येताय मॉल पाहून?’

‘हो हो…’

………………………………………

मंडळी, एक चिमटा काढा स्वतःला.  अहो हळू हळू  किती जोरात काढलात? दुखलं ना?

अहो, स्वप्नात नाही आहात हे  सांगण्यासाठी सांगितलं चिमटा काढायला.  होय स्वप्न नाहीय हे येत्या  गुढीपाडव्याला हा ‘टवाळखोरी मॉल’ सुरु होतोय तेव्हा अवश्य भेट द्या

(टवाळखोर मालक) अमोल टवाळपूरकर 

*आमची ’टवाळपूर’ सोडून कुठेही शाखा नाही 

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈