विविधा
☆ इंजिन ऑइल बदला… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
“ओ ताई, तुम्ही त्याला काही देऊ नका. ह्यांची सवयच आहे दिवसभर भीक मागत फिरण्याची.. वर्षानुवर्षे भीक मागत फिरतात, पण काम करत नाहीत, कष्ट करत नाहीत. काम करायचा आळस असतो. आयते पैसे मिळत असतील तर कोण कशाला कष्ट करेल?” तो दुकानदार माझ्या बायकोला सांगत होता. आणि तिच्या सोबत असलेला माझा साडेतीन वर्षांचा मुलगा मात्र “आपण त्या बाळाला बिस्कीट देऊया” असा आग्रह करत होता.
असे प्रसंग खरंच खूप कठीण असतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा मतलबीपणाशिवाय आपली मुलं आपल्याकडं दुसऱ्याच कुणासाठी तरी काही मागतात तेव्हा फार कौतुक वाटतं आणि भरूनही येतं.
पूर्वानं त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ती त्यांना म्हणाली, “दादा, तुम्हीच त्यांना काही काम का देत नाही?”
त्यावर तो लगेच म्हणाला, “असल्या भिकरड्याला कोण काम देणार हो?”
“हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे असं तुम्ही जोरात म्हणणार आणि त्यांना काम द्या म्हटलं की मागे फिरणार. या माणसांना कुणीच काम दिलं नाही तर ही माणसं भीक मागण्याशिवाय दुसरं करणार तरी काय?” ती म्हणाली.
“पण हे सरकारचं काम आहे. माझं नाही.”
“जर ते सरकारचं काम असेल तर मग तुम्ही या माणसांना वाटेल तसं बोलणं बंद केलं पाहिजे, कारण ते तरी तुमचं काम कुठं आहे? तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही इतर कुणालाही काहीही उलट सुलट बोलू शकत नाही. कुणाला काही बोलायचं असेल तर ते सरकार बोलेल.” ती शांतपणे आणि तितक्याच ठामपणे म्हणाली. समोरच्या दुकानदाराचे डोळे टोमॅटोसारखे लाल झाले.
“तुम्ही मला शिकवू नका. हे माझं दुकान आहे, मी कुणालाही काहीही बोलेन. तुम्ही ते सांगू नका.” तो रागाने म्हणाला.
“हा आपला देश आहे. या देशातल्या कुणाही माणसाला तुम्ही विनाकारण काहिही बोलू शकत नाही.” ती म्हणाली.
हा माझा पण देश आहे. मग काय मी भिकाऱ्याला काम देत बसू काय?” दुकानदार.
“हा तुमचा पण देश आहे ना? मग जसा मला सल्ला दिलात, तसा लोकांना सल्ला का देत नाही तुम्ही? ‘ मॅगी खाऊ नका, मैद्याचे पदार्थ खाऊ नका, चायनीज गोष्टी वापरू नका’ वगैरे वगैरे..?” ती.
“असं सांगत बसलो तर धंदा बुडेल माझा. लोक या गोष्टी घेतात म्हणून तर धंदा चालतो आमचा. हे खाऊ नका असं मी लोकांना कसं म्हणू?” दुकानदार.
“म्हणजे तुमच्या फायद्यासाठी लोकांच्या प्रकृतीला हानिकारक असलेल्या गोष्टी तुम्ही विकणार आणि नफा मिळवणार. बरोबर ना?” ती.
“मग तसे सगळेच वागतात. मी एकटाच नाहीये.” तो म्हणाला. एव्हाना काऊंटर वर आठ- दहा आणि रस्त्यावर आठ – दहा माणसं गोळा झाली होती.
“हे बघा दादा, त्या माणसाचा प्रश्न सुटावा यासाठी तुम्ही काय केलंत? तुम्ही काहीच केलं नाहीत आणि वर तो माणूस गुन्हेगार असल्यासारखं बोलताय.” ती.
“हो मग.. ही माणसं अशीच असतात. त्यांच्या बद्दल चांगलं बोलावं अशी त्यांची लायकी तरी आहे का?” दुकानदार.
“अहो, भिकारी म्हणजे चोर – दरोडेखोर नव्हे. त्याचं पोट भरण्यासाठी तो तुमच्याकडे पैसे मागतो. तुमची इस्टेट मागत नाही. तुम्ही दिलेल्या पैशातून तो सोनं-चांदी घेत नाही, मॉलमध्ये जात नाही, फॉरेन टूरला जात नाही. पण तुम्ही त्याची पार लायकीच काढलीत. हे चुकीचं आहे. माझी तुमच्या दुकानातली ही शेवटची खरेदी.” असं म्हणून ती बाहेर निघून आली. तिनं त्या बाहेरच्या माणसाला दोन फरसाणचे पुडे दिले आणि घरी आली.
घरी आल्यावर मुलानं मला “आईचं दुकानात भांडण झालं बघा” अशी बातमी लगेच सांगितली. त्याला आम्ही अजून भीक आणि भिकारी या दोन्ही संकल्पना शिकवलेल्या नाहीत. ज्या लोकांकडे काम नसतं, पैसे नसतात, राहायला घर नसतं, अशी माणसं रस्त्यावर वगैरे राहतात आणि भूक लागली की लोकांकडे पैसे मागतात किंवा खायला अन्न मागतात, एवढंच त्याला शिकवलं आहे. त्यामुळं, भिकारी हे प्रकरण “खूप भूक लागलेला आणि खिशात पैसे नसलेला माणूस” एवढंच त्याच्या लेखी आहे. म्हणूनच, तो बावरून गेला होता. एखाद्या माणसाला आईनं खायला दिलं तर त्यात भांडण करण्यासारखं काय आहे, हेच त्याला समजत नव्हतं. पुष्कळ समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला.
पण या निमित्तानं एक जाणीव मात्र आणखी घट्ट झाली की, काळ वाऱ्याच्या वेगानं बदलत असला आणि दिवसेंदिवस जग अधिकाधिक व्यावहारिक होत असलं तरीही लहान मुलांच्या मनांमध्ये माणसांविषयीचं प्रेम, आस्था, आपुलकी उपजत असते आणि ती जाणवते. आपण जितके रुक्ष, आणि व्यावहारिक कोरडेपणाने वागू त्याचंच अनुकरण मुलं करतात आणि आपसूकच तिही तशीच होतात.
यंदा दिवाळीच्या खरेदी दरम्यान असं जाणवलं की, लहान मुलांना सामाजिक भान फार उत्तम असतं आणि ते बऱ्यापैकी नैसर्गिक असतं. मुलं काही समोरच्या मुलाला पैसे द्या असं म्हणत नाहीत. आपण त्याला खाऊ देऊ, खेळणी देऊ असं म्हणतात. पैसा हा मुद्दा त्यांच्या लेखी नसतोच.
“स्वतःच फुगे विकणारे काका- काकू त्यांच्या मुलाला फुगा का देत नाहीत?” या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण असतं. डी मार्ट मध्ये पॉपकॉर्न काऊंटर वरच्या काकांना त्यानं प्रश्न विचारला होता की, “तुमच्या बाळाला तुम्ही पॉपकॉर्न नेता का?” त्यावेळी त्या समोरच्या माणसाचा निरुत्तर झालेला चेहरा मी वाचला आहे. अशावेळी अंगावर काटा येतो. पण माझ्या मुलानं आईला दोन पुडे घ्यायला लावले आणि एक त्या माणसाच्या हातात दिला, त्यांच्या बाळासाठी…! अनेकदा लहान मुलं अशी काही व्यक्त होतात की, ती लहान आहेत यावर विश्वासच बसत नाही.
रस्त्यावरून जाताना कुठं एखादा अपघात झालेला दिसला की, मोठी माणसं नुसतंच पाहून निघून जातात किंवा कित्येकजण तर बघतही नाहीत. पण लहान मुलं “आपण त्या काकांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया” म्हणून मागं लागतात. आणि आपण मात्र ‘कुठं ही नसती उठाठेव करा आणि ब्याद मागं लावून घ्या’ असं स्वतःशीच म्हणत पुढं निघून जातो.
मुलांना नुसतं “सॉरी, थँक यू किंवा एक्सक्यूज मी” एवढं म्हणायला शिकवणं म्हणजे सामाजिक शिष्टाचार शिकवणं नसतं. माणूस म्हणून जगावं कसं, हे त्यांना प्रत्यक्ष आचरणातून शिकवावं लागतं. मुलांची भावनिक बुद्धिमत्ता लहान वयात फार उत्तम असते. त्यामुळं, आपल्या आचरणातला फोलपणा, दुटप्पीपणा, ढोंगीपणा मुलं लगेच व्यवस्थित ओळखतात. आपले आईवडील आपल्याला शिकवताना वेगळं शिकवतात आणि स्वतः वागताना मात्र वेगळंच वागतात, हे मुलांना पटकन समजतं.
ज्या मुलाला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला भूक लागली आहे हे समजतं, त्याला काहीतरी खाऊ घालावं असं त्याला वाटतं, त्या पिल्लाला आपण घरी घेऊन यावं असं वाटतं, त्या मुलाला ‘काहीच समजत नाही’ असं कसं म्हणावं? उलट त्यांनाच खरं तर जे समजायला हवं ते नेमकं समजत असतं.
कितीतरी गोष्टी मुलांना आवडत नाहीत. त्यांना सिगारेट ओढणारी माणसं आवडत नाहीत, रस्त्यांवर पचापच थुंकणारी माणसं किंवा घाणेरड्या शिव्या देणारी माणसं आवडत नाहीत. शू किंवा शी लागली की रस्त्यातच भिंतीशी जाणं तर त्यांना अजिबातच आवडत नाही. पण तरीही हे सगळं आपण एक समाज म्हणून त्यांना स्विकारायला लावतो. हे आपलं चुकत नाही का?
मुलांचे डोळे आणि कान अत्यंत तीक्ष्ण असतात आणि सदैव तत्पर असतात हे सगळ्या समाजानंच कायमचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समाजातल्या एकाही मुलावर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडता कामा नये, उलटपक्षी त्यांच्या जडणघडणीसाठी सर्वार्थाने उत्तम सामाजिक वातावरण आपण राखलंच पाहिजे, ह्या जाणिवेची आवश्यकता आहे. आणि आपण आपल्या मुलांना योग्य ते सामाजिक वातावरण देण्यात अपयशी ठरत आहोत हीच वस्तुस्थिती आहे.
काही दिवसांपूर्वीच माझ्या शेजारच्या मुलानं त्याच्या शिक्षिका असणाऱ्या बाईंचे बिकिनी मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला दाखवले होते. त्यात एका फोटोत तर त्या बाईंच्या हातात भरलेला ग्लास देखील होता. स्वतःचे बिकिनी घातलेले आणि दारू पितानाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करण्याची इतकी हौस असणाऱ्या बाईंनी प्राथमिक शिक्षिका होऊच नये असं मला प्रामाणिकपणे वाटलं. त्यांनी मॉडेलिंगच करायला हवं.
इतकंच काय, मी स्वतःसुद्धा अनेक शिक्षकांना समाजात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना, मद्यपान करताना पाहिलेलं आहे. कित्येक शिक्षकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विचित्र पोस्ट पाहिल्या आहेत. विविध ऐतिहासिक ठिकाणी, गडकोटांवर मुलांच्या सहली घेऊन आलेल्या कितीतरी महिला शिक्षिकांना तोकड्या कपड्यात पाहण्याची वेळ आली आहे. हे सगळं मुलांवर कोणते प्रभाव पाडणार आहे, याची जाणीव माणसांना नसते का? असा प्रश्न पडतो.
ऐन वसुबारसेच्या संध्याकाळी आम्ही सवत्स धेनू पूजा करून येत असताना, माझे दोन-तीन वर्गमित्र सहकुटुंब – सहपरिवार (मुलाबाळांसकट) कारमध्ये होते. तिघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. उच्च पदस्थ आहेत, यशस्वी आहेत. त्यांच्यातला एक जण तर नामांकित विधिज्ञ आहे.
माझ्या गाडीपुढेच त्यांची गाडी होती. एका वाईन शॉप बाहेर त्यांनी गाडी थांबवली, दोघे जण गाडीतून उतरले आणि दारूच्या बाटल्या घेऊन आले, गाडी निघून गेली. बायका मुलांसह एकत्र असताना दारू कशाला हवी? मला खेदाचा धक्का बसला. एक क्षणभर मी मनातून हादरून गेलो. ऐन दिवाळीच्या दिवशी दारू का हवी? कुटुंबं बदलतायत आणि खरोखरच चुकीच्या पद्धतीने बदलतायत, हे फार प्रकर्षानं जाणवलं.
पालकमित्रांनो, आपल्या देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला राष्ट्रपती कशा राहतात, कशा वागतात, कशा बोलतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, हे तरी पहा. त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं आहे, हे लक्षात घ्या. एकूण काय, आपल्याला खूप बदलावं लागेल. निदान पुढच्या पिढ्यांच्या उत्तम जडणघडणीसाठी तरी आपल्याला बदलावंच लागेल..
आपला समाज ज्या इंजिनावर चालतो ना, त्यातलं इंजिन ऑईल म्हणजे आपली मनं आहेत. ती जितकी स्वच्छ असतील तितकं इंजिन व्यवस्थित चालेल. ती जितकी उत्तम असतील, तितकं इंजिनाचं स्वास्थ्य उत्तम राहील आणि ती जितकी सकारात्मक प्रभावी असतील तितकी त्या इंजिनाला सकारात्मक गती येईल..
म्हणून, समाजाच्या इंजिनातलं इंजिन ऑईल बदला मित्रहो.. नाहीतर एके दिवशी ते इंजिन कायमचं बिघडून बसेल…
(आवडल्यास लेखात कुठलाही बदल न करता मूळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके
मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈