? विविधा ?

☆ उत्कट…. भाग – २ ☆ श्री अजित देशमुख ☆

( …बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अॅलर्ट करतो…आता इथून पुढे )

—मुलाची आई रस्त्याकडे हताशपणे पहात आसवं गाळीत असते. वडील आपला मुलगा लहान असला तरी कसा हुशार आहे , पूर्ण नांव , पत्ता सांगू शकतो हे पोलिसांना सांगून हा  प्रकार  काही क्षणात कसा झाला हे समजावत  अशा गर्दीत त्याला कडेवर न घेतल्याबाबत पश्चाताप करत  बसतात.

तेवढ्यात चहावाला पोऱ्या येतो. तो सगळ्यांना ” कटिंग” वाटत असताना  ड्यूटी ऑफिसर  त्या दोघानाही चहा द्यायला खुणावतो. मुलाचे वडील नको नको म्हणत ग्लास उचलतात तरी. आई त्या चहाला होही म्हणत नाही आणि नाहीही. समोर असून चहा तिला दिसत नसतो.  त्याक्षणी तिला  फक्त आणि फक्त तिच्या हरवलेल्या बाळाचा निरागस चेहेरा दिसत असतो.

ड्युटी ऑफिसर , लागून हद्द असलेल्या पोलीस ठाण्यात स्वतः फोन लावून हरवलेल्या मुलाबाबत माहिती कळवून असा कोणी मुलगा आढळून आल्यास ताबडतोब कळवायला सांगतो.

काही पोलिस ठाण्यांच्या हद्दी इतक्या अस्पष्ट असतात की विचारता सोय नाही. रस्ता एका पोलिस स्टेशन कडे तर फुटपाथ दुसऱ्या पोलिस स्टेशन कडे असा प्रकार. त्यामुळे अगदी हद्दीच्या टोकावरील ठराविक ठिकाणाला एखादे पोलिस ठाणे काही पावलावर असले तरी, ते ठिकाण त्या पोलिस ठाणे हद्दीत असेलच असे नाही. अशा ठिकाणी हरवलेले मूल सापडले की नागरिक पोलिस स्टेशनच्या हद्दीचा विचार न करता साहजिकच जवळच्या पोलिस ठाण्यात मुलाला पोहोचवतात.

ड्यूटी ऑफिसर् शेजारच्या पोलिस ठाण्याशी बोलत असताना पलीकडे फोनवर त्याचाच बॅचमेट असला की मग त्यांच्यात कामाव्यतिरिक्त  इतर माफक गप्पाही ओघाने होतात .   एखादी “अरे, कालची गंमत ” वगैरे संभाषण चालू असते.     इथे व्याकूळ आईचा धीर आणखी सुटत असतो. तिच्या चेहेऱ्यावर फक्त तिच्या बाळाचा ध्यास स्पष्ट दिसत असतो. पोलिस स्टेशनचा फोन सतत खणखणत असतो. प्रत्येक वेळा फोनची घंटा वाजली की आपल्या बाळाची खबर असणार या आशेने डोळ्यात आणि कानात प्राण आणून ती फोन कडे पाहाते. 

मधेच इतर कामाबद्दल काही लिहित असलेल्या ड्यूटी ऑफिसरचा , लिहिता हातही आपल्या दोन्ही हातानी धरून हलवत ती आई , ” साहेब बघा ना जरा कुठे गेला असेल तो!” असं शब्दा शब्दाला वाढत जाणाऱ्या रडवेल्या स्वरात विनवते. सगळं काम सोडा आणि आधी माझ्या मुलाला

शोधा ही तिची स्वाभाविक अपेक्षा असते.

असाच काही काळ जातो.

आणि शेजारच्या पोलिस स्टेशन मधून अपेक्षित फोन येतो.  अमुक अमुक बीट चौकीमधे कुणा एकाने ,गर्दीत एकटा रडत फिरणारा , चुकलेला अमुक वर्णनाचा मुलगा आणून पोहोचविला आहे . 

” मिळाला आहे मुलगा तुमचा ” , फोन खाली ठेवत ड्यूटी ऑफिसर त्या दोघांना सहजपणे सांगतो. 

” कुठे आहे हो! कसा आहे? ठीक आहे ना हो ?”

आईला पुन्हा  रडू फुटतं.

चुकलेले मूल पोलिस ठाण्यात कुणी सहृदयी नागरिकाने आणून दिल्यानंतर त्याचे पालक मिळेपर्यंत पोलिस स्टेशन मधे त्या मुलाची काळजी महिला पोलिस घेतात.आईच्या आठवणीने अखंड रडत असलेल्या त्या छोटया जीवाला सांभाळणे सोपे नसते. कडेवर घेऊन  पोलिस स्टेशन भोवती फिरवत  चॉकलेट , बिस्किट्स वगैरे खाऊ देऊन “बच्चू हे बघ , बच्चा ते बघ ” करत त्याचं चित्त जाग्यावर ठेवायची त्यांची कसरत सतत चालू असते.

ड्यूटी ऑफिसर जीप रवाना करतो. थोड्याच वेळात या नाट्याचा बालनायक महिला पोलिसाच्या कडेवर  पोलिस ठाण्यात येतो.

त्या क्षणी त्याच्या आईची अवस्था काय वर्णावी !

रडता रडता ती धावत जाऊन त्याला खेचून घेते. तिचे पिल्लुही  तिला बिलगते. ती त्याला  कवटाळते. अचानक अतिप्रेमाने त्याला बोल लावत  मारतही सुटते. पुनः घट्ट जवळ धरते. रडून रडून कळकट झालेल्या त्याच्या चेहेऱ्याचे सारखे मुके घेते.     ” आता कध्धी कध्धी नाही हं असं तुला सोडणार ” असं त्याला समजावत , स्वतः रडत असताना आपल्या पदराने  त्याचा रडवेला चेहेरा पुसत रहाते.

इकडे ड्युटी ऑफिसर, पोलिस कंट्रोल रूम ला फोन करून आधीच्या फोनचा संदर्भ देऊन हरवलेला मुलगा सापडल्याचे आणि पालकांच्या ताब्यात दिल्याचे कळवून , त्या प्रमाणे पोलिस स्टेशन डायरी  आणि संबंधित रजिस्टर मधे नोंद घेण्यास सुरूवात करतो.

आई आता सावरलेली असते.

एखादा पांडा जसा झाडाला हातांचा आणि पायांचा विळखा घालून असतो , तसच ते मूल गळ्यात हात टाकून आईला धरून असतं.    

पोलिस कर्मचारी मुलाची करमणूक व्हावी म्हणून त्याच्याशी हास्यविनोद करत असतात.

आईवडील आणि मूलही आता हसत असतात.

आयुष्यभर लक्षात राहील अशा घटनेची  आठवण मनाशी बांधून निघताना  आई ड्यूटी ऑफिसरच्या किंवा  या प्रसंगाचे साक्षी असलेल्या एखाद्या वयस्क  हवालदारांच्या पाया पडायचा प्रयत्न करते.

मुलगा चांगला तीन साडेतीन वर्ष वयाचा , धावता येऊ शकणारा असला तरी , पोलिस स्टेशनमधून निघताना त्याचे पाय जमिनीला लावू न देता , आई त्याला कडेवर घेऊनच आनंदाश्रूना मोकळी वाट करून देत , आपल्या घरची वाट धरते .    

एका उत्कट प्रसंगाचा अंक संपतो.

समाप्त

© श्री अजित देशमुख  

9892944007

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments