श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात…

मागे एका शाळेत गेलो होतो. ती शाळा खूप प्रसिद्ध म्हणून पाहायला. त्या शाळेच्या ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं. ‘ एव्हरी चाईल्ड इज  युनिक. ‘ आणि अगदी खरं आहे. प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापासून वेगळं आहे. बुद्धीनं, रूपानं , विचारानं, भावनेनं. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता वेगवेगळी. जे एकाला खूप चांगलं जमतं , तसं दुसऱ्याला येईलच असे नाही सांगता येत. आपण पालक मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असला तर आपण आपल्या मुलाला त्याचे उदाहरण देतो. तो अमुक अमुक बघ. कसा हुशार आहे. गणितात किती गुण मिळाले त्याला ! नाहीतर तू .. असे म्हणून आपण त्याला हिणवतो. आणि त्याचं फुलू पाहणारं व्यक्तिमत्व कोमेजण्यासाठी हातभार लावतो. अरे, निसर्गातही बघा ना. प्रत्येक फुल वेगवेगळं आहे. गुलाब फुलांचा राजा झाला म्हणून काय इतर फुलांचं सौंदर्य, सुगंध कमी आहे का ? प्रत्येक फुल आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. सगळेच गुलाब झाले तर कसे चालेल ? फुलांच्या हारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात, तेव्हा तो हार शोभून दिसतो.

पण आज मला लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल नाही बोलायचं. पण त्यानिमित्ताने एक विचार मात्र मनात आला. प्रत्येक लहान मूल युनिक असतं तसं आपण मोठी माणसं पण असतो का ? नक्कीच असतो. पण हे आपण समजून नाही घेत. कदाचित समजतं पण उमजत नाही. कळतं पण वळत नाही. अशी आपली अवस्था असते. आणि बऱ्याच वेळा हेच आपल्या दुःखाचं मूळ असतं . मी काय करतो, तर माझी तुलना सतत दुसऱ्याशी करत असतो. एखादा माणूस तब्येतीने चांगला दिसला, दिसायला त्याचे व्यक्तिमत्व छाप पडणारे असले की मी नकळत माझी तुलना त्याच्याशी करतो आणि दुखी होतो. मला वाटतं मी एवढा बारीक आणि अशक्त का ? जे माझ्या बाबतीत तेच एखाद्या लठ्ठ माणसाला सुडौल असणाऱ्या माणसाबद्दल वाटू शकेल. त्या लठ्ठ माणसाला वाटते की मी का नाही असा सडपातळ ? लोक हसतात माझ्याकडे पाहून. एखाद्या बुटक्या माणसाला उंच माणसाबद्दल हेवा वाटू शकतो. एखाद्या आखूड केस असणाऱ्या तरुणीला लांब आणि दाट केस असलेल्या स्त्रीबद्दल असूया वाटू शकते.

अशा अनेक गोष्टींमुळे आपण स्वतःला दु:खी करून घेतो. इथे आपले चुकते ते हे की आपण स्वतःला आहे तसे स्वीकारायला तयार नसतो. पण निसर्ग तुमच्यात जेव्हा तुम्हाला वाटणारी एखादी उणीव ठेवतो, तेव्हा तुम्हाला तो अशी काही गोष्ट देऊन ठेवतो, की जी दुसऱ्याजवळ नसते. एखाद्या धनिकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असून शांत झोप लागत नाही. तेच झोपेचे वरदान देव मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसाला सहज देऊन ठेवतो. तो श्रीमंत माणूस सगळे विकत घेऊ शकतो. पण झोप नाही विकत घेऊ शकत. मनःशांती नाही मिळत पैशाच्या जोरावर. अशा खूप गोष्टी असतात आपल्याजवळ. या अर्थाने आपण गिफ्टेड असतो. पण आपण नेमके आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा विचार न करता आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीचा विचार करतो.

या अर्थाने खरं तर प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. वेगळी आहे. मी मुद्दामच या लेखाचं नाव तुम्ही युनिक आहात असं दिलंय . खरं म्हणजे बरेचदा मी इंग्रजी शब्द वापरायचे टाळतो. पण काही वेळा आपल्याला अपेक्षित असणारा अर्थ एखादा शब्द चटकन स्पष्ट करत असेल तेव्हा मी तो बिनदिक्कतपणे वापरतो. इंग्रजीतला युनिक हा शब्दही असाच. युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय. इतरांपासून एकदम वेगळा. आपण सगळे या अर्थाने युनिक असतो. इतरांपासून वेगळे असतो. मला गाणी आवडतात, प्रवास आवडतो, वाचायला आवडते, लिहायला आवडते. दुसरा माझा एक मित्र उत्तम चित्रं काढतो आणि लिहितोही. तो फिरत मात्र फारसा नाही. कोणी उत्तम गातो. कोणाला उत्तम स्वयंपाक करता येतो. कोणीतरी उत्तम खेळाडू आहे. किती हे वेगळेपण ! किती या प्रत्येकाच्या तऱ्हा ! म्हणून तर प्रत्येक जण युनिक. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ ना, तेव्हा आम्ही स्वतःवर प्रेम करायला लागू. (उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )

आणि जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तोच इतरांवरही प्रेम करू शकतो. पण आपल्याकडे ही गोष्ट लहानपणापासून सांगितलीच जात नाही. उलट सांगितलं जातं . की स्वतःचा विचार करू नका. स्वतःवर प्रेम करू नका. दुसऱ्यावर प्रेम करा. पण स्वतःवर प्रेम नाही करता आलं, स्वतःला आहे तसं नाही स्वीकारता आलं , तर तुम्ही दुसऱ्याला काय स्वीकारणार आणि मग प्रेम करणं तर लांबची गोष्ट !

तेव्हा आजपासून स्वतःला सांगू या की मी इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे, युनिक आहे आणि त्यातच माझे सौंदर्य आहे, सामर्थ्य आहे. इतरांना दिल्या त्यापेक्षा परमेश्वराने मला काही गोष्टी नक्कीच वेगळ्या दिल्या आहेत. त्यांचा मी विचार करीन . त्यांचा वापर करून माझे जीवन आनंदी बनवेन. आणि त्याच बरोबर इतरांचेही. आणि मग बघा. तुमच्याही ओठांवर आनंदाचे गाणे आल्याशिवाय राहणार नाही.

लिये सपने निगाहो में, चला हूँ ‘तेरी राहों मे

जिंदगी, आ रहा हूँ मैं ….

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments