श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागा. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. भागात आपण पहिले – . दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. )

या घटनेचा किंवा  पुराणकथेचा, मिथकाचा, लौकिक व्यवहाराशी अनुबंध कसा जोडला जातो,  तेही पहाणे योग्य होईल. नवरात्रात अनेक घरातून कुलाचार असा आहे, की नवरात्राच्या आदल्या दिवशी देवांची पूजा करून ते पेटीत,  डब्यात घालून ठेवतात. पुढे नऊ दिवस देवांची पूजा केली जात नाही. त्याचे कारण एकीला विचारले असता कळले, की देव या काळात तपश्चर्येला बसलेले असतात, म्हणून त्यांना हलवायचे नाही. त्यासाठी त्यांची पूजा करायची नाही. म्हणजे ते हलवले, तर त्यांच्या तपश्चर्येत विघ्न येईल. ‘आता देव बसणार’, वा ‘देव बसले’ असा शब्दप्रयोग व्यवहारात अनेकदा ऐकला होता, पण त्याचा खरा अर्थ तेव्हा कळला.

महिषासुरमर्दिनीने अहोरात्र नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून, त्याला आणि धूम्रवर्ण,  शंभु-निशुंभ इ. अनेक दैत्यांचा वध करून स्वर्ग आणि पृथ्वी भयमुक्त केली, पण लोकाचार बघितला, तर लक्षात येतं,  की नवरात्रोत्सव हा देवीच्या केवळ शक्तिरुपाचा उत्सव नाही. तो तिच्या मातृरुपाचा,  तिच्या सृजन शक्तीचाही उत्सव आहे.   नवरात्रात अनेक घरातून देव बसतात,  म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे तपश्चर्येलाबसतात. त्या काळात त्यांची पूजा होत नाही. पण त्याचवेळी अनेक घरातून विशेषत: कृषीसंस्कृतीशी संबंधित घरातून घटस्थापना केली जाते. म्हणजे पत्रावळीवर माती पसरून त्यात नवविधा बियाणे रुजत घातले जाते. वर मातीचा घट ठेवून त्यात पाणी घातले जाते. शेजारी दिवा ठेवला जातो. त्यावर रोज एक फुलांची माळ चढवून घटाची पूजा केली जाते. हे म्हणजे भूदेवीची पूजा,  उपासना असते. इथे घरात प्रतिकात्मक शेतच तयार केले जाते. घट हा पाण्याच्या स्त्रोताचे प्रतिक आहे, तर दिवा सूर्याचे. पीक उगवून येण्यासाठी माती,  पाणी,  सूर्यप्रकाशाची गरज असते. ते इथे प्रतिकात्मक स्वरुपात आणले जाते. मातीच्या घटातील पाणी पाझरते. बियाणे रुजतात. अंकुरतात. हळूहळू वाढू लागतात. दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून ते अंकूर कापून सोने म्हणून देण्याची प्रथा अनेक घरातून आहे. कृषी संस्कृतीचे धान्य हेच धन,  हेच सोने नाही का? या प्रथेप्रमाणे लक्षात येते,  नवरात्रातील देवीचा उत्सव हा तिच्या मातृरुपाचा उत्सव असतो.

आई जन्मदात्री असते. पालनकर्ती,  रक्षणकर्तीही असते. घटस्थापनेच्या रुपाने तिच्या सृजन शक्तीची उपासना केली जाते. ती पालनकर्तीही असते. नवरात्रात विविध पक्वान्ने केली जातात,  आणि शरिराचे पोषण अधीक अस्वाद्य रुपात होते. पण पोषण केवळ शरिराचेच होऊन भागणार नाही. मनाचेही व्हावयास हवे. नवरात्रीच्या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन,  व्याख्याने,  गीत-नृत्य,  तसेच अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सार्‍यातून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आई रक्षणकर्ती असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात,  असे नाही. आपले स्वभाव दोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे,  अहंकार,  द्वेष,  मत्सर असे किती तरी स्वभावदोष आपले व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष रुजू, वाढू नयेत,  म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा प्रयत्न करते.  नवरात्रातील भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, इत्यादीं मधून देखील त्याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार करण्याचा प्रयत्न होतो.

अशा तर्‍हेने जन्मदात्री,  पालनकर्ती,  रक्षणकर्ती या तिन्ही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरुपाचीही उपासना असते. नवरात्रात अनेक घरातूनपिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी एक अतिशय सुंदर रुपकात्मक ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वर सांगतलेले स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. त्यांनी लिहिले आहे,

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासुरमर्दनालागुनी।

त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी।

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र ।  धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र । दंभ सासरा सांडेन कुपात्र ।।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग।

केला मोकळा मारग सुरंग । आईचा जोगवा जोगवा मागेन ।।

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments