विविधा
☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆
एकवीस जून च्या निमित्ताने
21 जून—-वर्षातील सर्वात मोठा दिवस…जवळपास 14 तासांचा दिवस आज…आज सूर्यास्त जरा उशिराच होतो…आजच्या दिवसाला सोल्सटाइस (Solstice)असहि म्हणतात.
सर्वानाच माहीत आहे कि, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे दिवस मोठा असतो.पृथ्वीच्या अक्षाच्या सूर्याशी असलेल्या कोनानुसार , संपूर्ण उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील मोठा नी दक्षिण गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो.
उत्तरायणात,सूर्याचा हळूहळू उत्तरेकडे प्रवास सुरु होतो…तो उत्तरेकडे सरकत असता,दिवसाचा कालावधी वाढतो. उत्तरेकडच्या सूर्याचा हा प्रवास 21 जून पर्यंत चालतो. सूर्य या दिवशी विश्वववृत्ताच्या जास्त उत्तरेकडे असतो म्हणून ह्या दिवसाचा कालावधी अधिक असतो.
आता योग:-
योग माझ्या गुरूंनी सांगितलेला…माझ्या वाचनातला,आचरणातला आणि जाणिवेतला!!!
योग हि साधना आहे…हे शास्त्र आहे…हा अभ्यास आहे! भगवान श्रीकृष्णांनी शिकवलेला मूळ योग आहे. हा श्रद्धेचा सर्वोच्च दिव्य मार्ग आहे.शास्त्रीय,नियमित आणि भावनापूर्ण परमेश्वर ध्यानाचा मार्ग आहे.
मानवाला अज्ञानातून मुक्त करून, शारीरिक,मानसिक नी अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण असा हा योग!!!💐
योग साधनेत, त्यातील अभ्यासाच्या प्रकारांमध्ये योग किंवा योगा प्रकार करणेअसाच विचार माणसाना येतो. किंवा तसाच विचार लोक करतातही.
पण नुसत्याच व्यायाम प्रकारांनी आपल्या शरीरात ऊर्जा हवी तेवढी निर्माण होत नाही. ते प्रकार शास्त्र शुद्ध हवेत.शरीराला प्राण शक्तीची गरज असते.
शरीराच्या पेशींना,अधिकाधिक क्रियाशील बनवण्यासाठी सुर्यप्रकाश,शुद्ध हवा, सात्विक व शुद्ध तरल पदार्थ,पाणी आणि फळाची आवश्यकता असते.
शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. हि ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते,पण अशीच आणि अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने व्यायामाच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून साधनेतून निर्माण जर शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो.
हा योग म्हणजे आपल्याला वाटणारा नुसताच शरीराचा व्यायाम नसून, त्याद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .
यातील विशिष्ट व्यायाम, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे शारीरिक,मानसिक संतुलन!!!
यात ध्यान साधना खूप महत्वाची आहे.ध्यानाने मन शांत होते. चंचल मन एकाग्र होते. ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला – इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!
ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!!!💐
आजचा 21 जून सर्वात मोठा दिवस, हा भौगोलिक दृष्ट्या आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी 21 जून 2015 मध्ये जाहीर केलेला व तेव्हा पासून सुरु असलेला, योग दिवस याचा तसा काही सबंध नाही…
पण आजच्या योग दिवसाचा व सर्वात मोठ्या दिवसाचा योगायोग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावयास हरकत नाही. आणि हे लक्षात घेता मला आलेले विचार….
नेहमीच सूर्योदयाच्या नव्या किरणांना आकर्षित होणारी मी… नव्या दिवसाचे नवे स्वप्न उराशी बाळगणारी मी…नव्या अरुणोदयला साक्ष ठेऊन इच्छा आकांक्षा नी आव्हानांना सामोरी जाणारी मी…आज खूप आनंदाने आपण सर्वाना ह्या मोठ्या दिवसाच्या शुभेच्छा देते!💐
नेहमीपेक्षा आज मोठा दिवस, म्हणचे जास्त वेळ प्रकाश,तेज,सूर्याच्या किरणांचा तेजाचा जास्त वेळ संपर्क!
वेळ तीच, घड्याळहि तेज,रोजचे दैनंदिन कामकाजहि तेच! पण तो सूर्य संपूर्ण त्रिलोक्याला तेजाळणारा… आज सूर्योदय नवी कांती देणारा… नुसते आपल्यालाच नव्हे, तर पर्वताना, नद्यांना,झाडांना,पक्षांना,प्राण्यांना,साऱ्या चराचराला एका दिव्या प्रमाणे मिळालेले तेज… दिवसभरात अगदी सूर्यास्तापर्यंत विविध रंगांनी, ढंगानी मिळेल… सकाळ, दुपार व संध्याकाळच्या विविधरंगी छटा सर्वाना सुखी करोत… दिवसभरातील विविध रंगी छटांनी केलेले नृत्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट करून, नव दिशा दाखवू देत…
सूर्याचा हा प्रकाश…हे तेज…नी तेजाळणे सर्वांचे रक्षण करो!💐👍
आज धकाधकीच्या , धावपळीच्या योगात आपल्याला आपल्या मनाकडे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नसते…पण आजच्या दिवशी मनाकडे आवर्जून लक्ष द्यावं… आणि ते सुदृढ व्हावं यासाठी करावा योग!!💐
योग दिवसाच्या व सर्वात मोठ्या दिवसाच्या सानिध्यात ध्यानस्थ होऊन सूर्याच्या सोनेरी किरणांच्या स्नानाने, आपल्या मनातील राग, लोभ, मोह, मत्सर, असूया, घृणा, भेदभाव, जातीयवाद यांचा नाश होवो. तन मन निरामय होऊन अंतःकरण व चित्त शुद्धी होवो ….सायंकाळच्या ध्यानाच्या तेजाने म्हणजेच संधिप्रकाशाची लाली जणू गुलाल उधळलाय असे वाटावे…
आजच्या दिवशी सुर्याचे तेज जास्त असणार! त्यामुळे दिवसभरात त्या तेजाचे , कुटस्थाकडे (दोन भुवयांमधील स्थान) न पाहताही ‘अद्वितीय चक्षु’ म्हणून सतत दर्शन होणार… त्याचे दर्शन किती घ्यायचे हे आपली हाती आहे!👍💐
आजचा योग दिवस नी मोठा दिवस म्हणून हि योग साधना! हि रोजचीच का होऊ नये?? हा योग दिवस सर्वांचाच रोजचा असावा… कारण रोजच्या नियमित योगाने, रोजच्या ध्यानाने आपल्या अंतरातील तेज वाढून, आपल्याला एक अनामिक आत्मिक आनंद मिळणार आहे, मग तो दिवस मोठा असो किंवा लहान…आपल्याच कुटस्थातील तेज, शांती, आणि ब्रह्मानंद 🙏🏻 … काय वर्णावा!!!!👍💐
© सौ अश्विनी संजीव कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈