सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ एका ‘ जोकर ‘ च्या जन्मशताब्दी निमित्त… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
चित्रपट बघायला वेळ,पैसा ह्यापेक्षाही जास्त त्याची आवड असावी लागते. आणि काही विशिष्ट चित्रपटप्रेमी चोखंदळ प्रेक्षक वर्ग हा तर अतिशय बारकाईने, आवडीने दर्जेदार चित्रपट हे हुडकून काढून बघतो. दर्जेदार चित्रपट हुडकतांना त्या चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शन, काम करणारे कलाकार ह्यांचा प्रामुख्याने ह्या निवडीत विचार केला जातो.
अशाच एका ह्या क्षेत्रात सर्वगुणसंपन्न असलेल्या अवलियाचा १४ डिसेंबर हा जन्मदिवस . निळ्या डोळ्यांचा,भावूक,निरागस चेहऱ्याचा, सहजसुंदर अभिनय करणाऱ्या कलावंताचा, व ह्या सर्वांवर कडी करणाऱ्या दिग्दर्शकाचा ठसा हा एकाच व्यक्ती बघायला मिळणं म्हणजे खरोखरच दुर्गम्य बाब. परंतु ह्या सगळ्या बाबी “राजकपूर” ह्यांच्यात सामावलेल्या होत्या.
चित्रपटनगरी म्हणजे एक अफलातून वेगळीच दुनिया. उगाचच नाही तिला मायानगरी म्हणतं. चित्रपट म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.
ह्या नगरीने आपल्याला खूप वेगवेगळे दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते दिलेत .पण ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीत आढळतील. अगदी आपल्या भाषेत बोलायचं तर ह्या क्षेत्रातील आँलराउंडर असलेली व्यक्ती म्हंटलं की चटकन प्रतिभावंत राजकपूर ह्यांच नाव नजरेसमोर येतं. १४ डिसेंबर, राजकपूर ह्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने….
हाडाचा कलाकार, दर्जेदार, पट्टीचा अभिनेता असलेल्या पृथ्वीराज कपूर ह्यांचे राजकपूर हे सुपुत्र. जणू जन्माला येतांनाच ह्या चित्रपट क्षेत्रातील बाळकडू घेऊनच आले होते. त्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच निरागसतेची झालर होती. ते एक उत्कृष्ट, यशस्वी, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता होते.
त्यांनी अनेक उत्कृष्ट, तिकीटबारीवर धूम करणारे,लोकप्रिय चित्रपट दिलेतं.त्यापैकी संगम,श्री 420,मेरा नाम जोकर, बाँबी,आवारा, हे सुपरडुपर हीट सिनेमे. संगम हा त्यांचा खूप गाजलेला, दिग्गज कलाकारांच प्रेमाचं त्रिकुट असलेला एक लोकप्रिय चित्रपट म्हणून गाजला “मेरा नाम जोकर हा एक कारुण्यमय छान दर्जेदार चित्रपट.हा चित्रपट बघून माणसाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम मिळणं,आपलं माणूस मिळणं हे किती आवश्यक असतं ह्याची प्रकर्षाने जाणीव होते. प्रेमात अयशस्वी झालेल्या व्यक्तीच्या स्वभावाला आपोआपच एक कारुण्याची झालर असते, हे ह्यातून ठळकपणे जाणवतं.ती व्यक्ती वरकरणी कितीही हसतं असली तरी आत किती दुःख, वेदना खोलवर दाबून ठेवलेली असते हे लक्षात येतं. राजकपूर ह्यांच्या बहुतेक सगळ्या चित्रपटांचा आत्मा म्हणजे उत्कृष्ट संगीत, गाणी,कसलेले कलाकार, आणि आशयपूर्ण पटकथा.
संगम चित्रपट लक्षात राहतो तो एक से एक अफलातून मस्त गाण्यांमुळे. राजकपूर ह्यांच्या निरागस,भाबड्या उत्कट प्रेमाच्या अभिनयामुळे अतिशय प्रेमरसानं ओथंबलेलं, भावपूर्ण गाणं “ये मेरा प्रेमपत्र पढकर”आणि अतिशय मिस्कील पणे गायलेलं”क्या करुँ राम मुझे बुढ्ढा मिल गया” ही गाणी म्हणजे ‘संगम’ च्या जमेच्या बाजू. संगम चित्रपटात वैजयंतीमाला,राजेंद्रकुमार आणि राजकपूर ह्या तिघांचही प्रेम अतिशय उत्कट. पण ते प्रेम दर्शविण्याच्या त-हा,पद्धती मात्र निरनिराळ्या. राजकपूर चे अतिशय मनापासून केलेले जगजाहीर उत्कट प्रेम, राजेंद्रकुमार चे अलवार, नाजूक, मनातल्या मनात केलेले प्रेम, आणि वैजयंतीमालाचे त्यागमय प्रेम खरचं अगदी लक्षात राहण्या सारखे. राजकपूर ह्यांच्या चित्रपटाबद्दल लिहायचं तर खरं पुस्तकही कमी पडेल.
राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते. राज कपूर ह्यांच्या चित्रपटाच्या मनोरंजना आड काहीतरी संदेश असायचा. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज यांच्या चित्रपटातील नायक हा सामान्य माणूस असायचा. फुटपाथ वर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळायचे.
राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.
फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार प्रेम रोग, मेरा नाम जोकर ,संगम, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जिस देश मे गंगा बहती है,अनाडी ह्या चित्रपटांसाठी मिळाला.
राजकपूर ह्यांच्या अभिनयात डोळ्यांची भाषा बोलली जायची. तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा.
राज कपूर यांनी 1948 मध्ये आग या सिनेमातून त्यांचं दिग्दर्शीय पदार्पण केलं. तर त्याआधी 1947 ला आलेला नील कमल हा नायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता. ते हयात असेपर्यंत हिंदी सिनेसृष्टीचं बॉलिवूड असं नामकरण झालेलं नव्हतं. त्या काळात नंबर वन, नंबर टू अशा स्पर्धाही नव्हत्या. दिलीप कुमार, देवआनंद, राज कपूर ही त्रयी 50, 60 आणि 70 चं दशक गाजवणारी ठरली. बाकी त्यांच्यावेळी जॉय मुखर्जी, प्रेमनाथ, राजेंद्र कुमार असे हिरोही होतेच. पण सगळ्यांना भुरळ पडली होती ती या त्रयीची. राज कपूर यांनी अभिनय करत असतानाच दिग्दर्शक म्हणूनही ते काम करत होते.1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी राज कपूर यांनी देशाच्या सिनेसृष्टीत योगदान देण्यास सुरूवात केली होती. सामाजिक आशय जपणारे अनेक सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केले त्यात कामही केलं. आवारा, आह, बूट पॉलिश, श्री 420, जागते रहो या सगळ्या सिनेमांची जादू आजही कायम आहे.
राज कपूर यांच्या अभिनयावर काही प्रमाणात चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. त्यांचा पेहराव, त्यांची टोपी, त्यांची हसण्याची पद्धत. निरागस चेहरा, फास्ट फॉर्वर्डमध्ये सिनेमातले काही सीन चित्रित करण्याची पद्धत हे सगळं काही चार्ली चॅप्लिनच्या शैलीशी मिळतंजुळतं होतं. मात्र ते सगळं आपण हसत हसत स्वीकारलं. कारण अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेमा हे सगळं हा माणूस जगतो आहे हे आपल्याला ठाऊक होतं.
त्यांच्या काळातले ते सर्वात तरूण दिग्दर्शक होते. संगम या सिनेमात राजेंद्र कुमार, वैजयंती माला आणि राज कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रूंजी घालणारं संगीत, मोहून टाकणारी गाणी आणि लोकेशन्स हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, बोल राधा बोल संगम होगा के नहीं, मै क्या करूँ राम मुझे बुढ्ढा मिल गया, ये मेरा प्रेम पत्र पढकर, दोस्त दोस्त ना रहा अशी सगळी गाणी हिट ठरली. दोन मध्यंतर असलेला हा सिनेमा होता. 1964 मध्ये आलेल्या या सिनेमाने रेकॉर्ड मोडले होतं असं म्हणतात.
त्यांच्या यशस्वी सिनेमामध्ये बाँबी ह्याचा उल्लेख प्रामुख्याने होतो.बॉबीच्या यशानंतर राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली हो गयी हे एका पाठ़ोपाठचे यशस्वी चित्रपट. बोल्डनेस हा त्यांच्या चित्रपटां मधला महत्त्वाचा भाग होता.
..
एकापेक्षा एक सरस चित्रपट, एकाहून एक सुमधुर गाणी आणि मनोरंजनाचा अखंड तेवत राहणारा वारसा ठेवून हा शोमन अनंताच्या प्रवासाला केव्हाच निघून गेला आहे. मात्र तो आपल्या मनात अजूनही जिवंत आहे त्याच्या नटखट, अवखळ डोळ्यांनी आपल्याला आपलंसं करत, मुकेशचा आवाज आपल्या हृदयात स्वतःचा म्हणून भिनवत..किमया करणारा… एखाद्या परीकथेतल्या राजकुमारासारखा! त्यामुळेच त्याच्या गाण्याच्या ओळी आठवतात.. त्याच्या मनात असण्याची साक्ष पटवतात…
कल खेल में हम हों न हों
गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम,
भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा!
राजकपूर ह्यांच्या यशस्वी चित्रपटांची, सुमधुर गाण्यांची प्रकर्षाने आठवण होते हे खरे.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈