सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ ओंकार स्वरूप... ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
ओंकार स्वरूप गणेशाचे रूप.. श्री गणेशाची पूजा अर्चा झाली, आरती झाली, छोट्याशा देव्हार्यात विराजमान झालेली गणेश मूर्ती.. भरजरी शेला गळ्यात मोत्यांची माळ प्रसन्न चेहरा, हार दूर्वा फुलांनी सजलेला असा श्री गणेश फारच सुरेख मंगलमय वाटत होता मला तर कधी तो बालरूपात वाटतो तर कधी प्रौढ तर कधी चक्क, भरभरून आशीर्वाद देणारे आजोबा.. !
माझं मलाच हसू आल. अन् पूजेचे साहित्य आवरताना सहजपणे… “ओंकार स्वरूप गणेशाचे रूप.. “
या ओळी मी गुणगुणात होते.
ते बघून माझ्य नातू आणि नात दोघेही म्हणाले..
आजी या श्री गणपतीची कितीतरी नाव आहेत नाही..
गणनायक, गणपती, गजमुख.
अरे गणांचा नायक म्हणून गणनायक गणपती सर्व गुणांचे अधिष्ठान असलेला गुणपती रिद्धी-सिद्धींचाअधिपती
विद्येची देवता आहे म्हणून! श्री गणेशाय नमः असे प्रथम पाटीवर गिरवूनच आपण विद्येचे धडे घेतो विद्येला प्रारंभ करतो. षड्रिपूंवर विजय मिळवण्यासाठी विघ्न विनाशक. आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी न डगमगता समतोल बुद्धीने वागण्याची क्षमता प्राप्त व्हावी यासाठी आपण शरण जातो ते विघ्नविनाशक विघ्नेश्वराला! याचं रूप गुण यावरून ही सगळी याची वेगवेगळी नावं आहेत. अशा या श्री गणेशाचं आगमन झालंय. आता याची पूजा अर्चना, आरती रोजचा प्रसाद, मोदक सगळंच कसं मनापासून करावसं वाटतं. दहा दिवस त्याचा पाहुणा म्हणून पाहुणचार केला तरी तो आपल्यातच मनात घरात त्यानं कायम स्वरूपी वास्तव्य करावं अशी मनापासून प्रार्थना करावी. “
“हो तर सोसायटीच्या गणपतीची आम्ही मुले मस्त पूजा आरती करतो हं. तू पण ये एकदा आणि बघ आम्ही कसं करतो ते.. ! गणपतीची आरास तर प्रत्येकाने घरातल्या काही कुंड्या फुलझाडांसहित आणून ठेवलेत. मुलींनी मस्त रांगोळ्या काढल्या. वर्गणी वगैरे काही नाही हं.. सोसायटीच्या सभासदांनीच तसं ठरवलंय फळांचा नैवेद्य करायचा म्हणजे वायाही जाणार नाही आणि कमी पडणार नाही. खव्याचे मोदक मात्र कुणीतरी आणत असतात. संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि बायकांसाठी, पुरुषांसाठी
उखाणे स्पर्धा सुद्धा ठेवलीय. हॉलमध्ये अगदी शांत संगीत याची टेप लावून ठेवली. खूप धमाल येईल नाही? “
हे आपल्या सोसायटी पुरतं झालं पण आता चौका चौकातल्या गणपतीची आरास खरंच अगदी पाहण्यासारखी असते. पण मोठमोठ्या कर्कश्य आवाजात
गाणी लावून ठेवतात ना त्याचा फार त्रास होतो.
श्री गणेश खरंतर निसर्ग संरक्षण, ज्ञानमय, विज्ञानमय स्वरूपाचं आगळच दर्शन घडवतो पण आपण मात्र सगळी हिरवाई नष्ट करतो. पान फुलं, हार तुरे, अन सगळ्या सजावटी पाण्यामध्ये विसर्जन करून ध्वनीवर्धक लावून देवाला, सगळ्या समाजाला उलट त्रास देतो. प्रदूषण वाढवतो. बहुतेक जण आता मातीचा गणपती आणतात आणि घरीच विसर्जित करतात ही खरंच चांगली गोष्ट आहे. सुधारणा करायची म्हटलं की दुसऱ्याकडे बोट दाखवतो. आपण सुसंस्कृत लोक आपली मुल्ये जपूनही संस्कृती सांभाळत उत्सवाचे स्वरूप निखळ आनंदाचे, मनोरंजनाचे चांगल्या उपक्रमाचे करू शकतो. पूर्वीपासून काही मंडळे असे उपक्रम राबवत आहेत. आता बहुतेक मंडळे, असा गणेशोत्सव करू लागले आहेत. ही जमेची बाजू आहे.
तुम्हा मुलांना आम्ही ‘आमच्या वेळी.. ‘असं म्हटलं की गंमतीचा विषय होतो. पण खरं सांगू.. नुसती पूजा -अर्चा करून, भोवताली, ध्वनी प्रदूषण असेल तर हा बुद्धी दाता प्रसन्न होणार नाही. या उत्सवात कसं प्रसन्न वातावरण त्याच्याभोवती हवं आणि त्याला मनापासून साद घालायला हवी. श्रद्धेन नतमस्तक व्हायला हवं तोच एक सत्य आहे हे प्रमाण मानलं तर आपलं जीवन सुखकर होईल. चला तर आपल्यापासूनच सुरुवात करूयात. “मी हसतच म्हटलं.
… सगळं पटल्याने नातू म्हणाला. “खरं आहे अन् योग्यही.. ! आपणही दूर्वा फुले पत्री वाहूयात श्री गणेशाला. आणि आपल्या कुटुंबियांवर, आपल्या देशावर येणारी विघ्न दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करूया. “. त्याला पुस्ती जोडत मी म्हणाले.. “कहाणी सारखं म्हणूयांत ‘ऐका परमेश्वरा श्री गणेशा तुमची कहाणी… निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाच्या वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देऊळे राऊळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा आपण आज घेऊया. व उतणार नाही मातणार नाही म्हणूयात. “
हात जोडून घरातील सगळ्यांनीच गणपतीची प्रार्थना केली. मनंही प्रसन्न झाली.
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈