श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

☆ विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

जन्म: कोल्हापुर ९ ऑगस्ट १९६१.

शिक्षण: पदवीधर: शास्त्रशाखा, पदव्युतर : मनुष्यबळ संसाधन विकास.

वेगवेगळ्या औषधनिर्माण आस्थापनांमधे मनुष्यबळ  संसाधन विकास अधिकारी म्हणून ३४वर्षाचा अनुभव.

सध्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था मधे जाऊन  व्यक्तीमत्व विकास, वेळेचे नियोजन, मुलाखतीचे तंत्र, आयुष्यात  सुरक्षिततेचे महत्व इ.विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शाळा- कॉलेजमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात विशेषतः नाट्याभिनयामधे प्रावीण्य.  सध्या  बदलापूरमधे वास्तव्य. बदलापूर कलासंगम ह्या स्वतःच्या संस्थेमार्फत बालकलाकारांना भारतीय अभिजात कलामधे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मराठी साहित्यात विशेष अभिरूची.

☆ विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

शाळेत कॉलेजमधे असताना वह्या,पुस्तके,प्रयोगवह्या, dissection box…खास डायरी हे सारं एकत्र ठेवणारा कपाटातली एक कप्पा….रोज हव्या त्याच विषयाची वही,पुस्तक  घेऊन शाळेत वा  कॉलेजला नेणे..बाकी सारं त्या कप्प्यात एकदम सुरक्षित…दोन तीन महिन्यातून एकदा तो विस्कळीत कप्पा पुन्हा आवरला जायचा….. एकाच कपाटात खाली-वरती असे एकमेकांचे कप्पे असले तरी खरंतर आपला कप्पा विस्कळीत करण्याचं काम ही आपलंच असायचं.

मोठी बहीण ग्रॅजूएट झाली….एक कप्पा रिकामा झाला. पण ती जागा तिच्या वाचनाच्या इतर पुस्तकांनी घेतली. दुसरी बहीण ही ग्रॅजूएट झाली पण पी.जी.च्या reference books नी ती जागा व्यापली. अस्मादिकांनी पदवी गळ्यात पाडून घेतली नि शिक्षणापासून सुटका करून घेतली नि कप्पा रिकामा करून टाकला आणि त्यात माझ्यासाठी अशा मराठी मधील वेगवेगळ्या नाटकांच्या संहितानी स्थान पटकावलं.

बंधूराजांचा कप्पा नेहमीच ड्रॉईंग पेपर, वेगवेगळ्या शिसपेन्सीली, खडूच्या रंगपेट्या, वॉटर कलर, कॅनवास पेंट,ऑईल पेंट… असल्या काहीच्या काही..मला अनाकलनीय गोष्टींनी खच्च भरलेला….तो काही कधी रिकामा झाला नाही.

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मराठी साहित्याचा संभाळ करण्याची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागली. त्यात केशवसुत, बालकवी, वि.दा.करंदीकर,वसंत बापट,मंगेश पाडगावकर, पु.लं. देशपांडे, प्र.के.अत्रे, वि.स.खांडेकर कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर, दुर्गाबाई भागवत या आणि बर्याच मराठी सारस्वतांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या साहित्याचा सहभाग होता.

मी जरी सायन्स ग्रॅजूएट झालो तरी घरात असलेल्या या  अथांग मराठी साहित्य सागरात आजही  डूंबत राहिलो आहे. मूळातच, जीवशास्त्रात, प्रचंड गोडी असल्याने दूसर्या बहिणीच्या, किटकशास्त्राचेही खूप आकर्षण राहिले.

घरच्या अध्यात्मिक वातावरणामुळे सार्थ दासबोध,अभंग ज्ञानेश्वरी, इतर संतमहात्म्यांचे साहित्य तर वडिलांची वैद्यकीय क्षेत्रातील वाग्भट,चरकसंहिता, धूतपापेश्वर, medical dictionary अशी बरीच साहित्य संपदा होती (आजही जपली आहे.)

माझ्या नोकरीच्या निमित्ताने human resources वरील कित्येक संदर्भपुस्तकांची माझ्या कप्प्यात भर पडली. आज  माझ्या मुलाच्या आवडीनूसार नी व्यवसायानूसार हिंदी, इंग्रजी, मराठीतील नाट्य,चित्रपट, वगैरे संबंधीत,तसेच त्याच्या खास आवडीच्या उर्दू गझला, उमर खय्याम, गालिबसाहब, कैफी आझमी साहब यांच्या सह मराठी गझलकार कवी सुरेश भटांच्या साहित्याचा समावेश आहे.

थोडक्यात काय तर तीन पिढ्यांच्या वेगवेगळ्या साहित्यसंपदेने कपाटातील कप्पे आजही सजलेले आहेत .

कपाटातले कप्पे जसे भिन्न भिन्न पुस्तकांनी  भरलेले … तसेच मनातले,हृदयांतील कप्पेही आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांवर,वळणावर भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लीनी भरलेलंही आहे नि भारलेलं ही आहे..जन्मांला आल्यापासून अगदी बालक मंदीर, प्राथमीक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज , नुकत्याच सरलेल्या क्षणापर्यंत जे जे कोणी मित्र,मैत्रिणी,सगे,सोयरे,हितचिंतक, काही प्रमाणात दुरावलेलेही हे सारे मनाच्या,हृदयाच्या कप्प्यात विसावलेले असतात.

जशी काही पुस्तकं आपल्याला आवडत नाहीत तरीही ती आपण कप्प्यात ठेऊन देतो तशा काही व्यक्ती आवडत नसल्या तरीही मनाच्या कप्प्यात एका कोपर्यातली जागा  पकडून बसतात. कालांतराने अशीच एखादी दुरावलेली  व्यक्ती पुनः आपल्या आयुष्यात येते नि दोघांचंही परिपक्व झालेलं मन एकमेकांना वाचतं नि मग आपण समजतो …

अरे त्यां पुस्तकासारखंच झालं…पूर्वी वाचलं तेव्हा कळलं नाही नि आता नीट कळलं?..म्हणजे फरक वाचण्यात होता  कि  समजण्यात??

कपाटातली कप्प्यातली विस्कळीत झालेली पुस्तकं व्यवस्थित करता येतात पण विस्कळीत झालेली नाती व्यवस्थित करणं मात्र खूप अवघडच!!!!

काही पुस्तकातील चांगल्या ओळी,विचार आपण आवडल्या नंतर लिहूनही ठेवतो नि स्मरणातही…तसंच चांगल्या व्यक्ती बद्दल आपण आपल्या मनात कोरून ठेवतो.

पुस्तकं खूप झाली.. तर एक कप्पा भरला कि दूसरा….एक कपाट भरलं कि दुसरं…..

आपले खूप मित्र,सवंगडी झाले अगदी…..अगणित झाले तरी मनाचा,हृदयाचा कप्पा तेवढाच असतो. तरीही सारे जण त्यात सामावतात. तिथं कधीच दाटीवाटीनी सारे बसत नाहीत मुंबईच्या लोकलच्या गर्दीसारखे…….

सगळीच पुस्तक सतत आपल्या बरोबर नसतात………

मिळवलेला पैसा तो ही कायमच आपल्या सोबत असतो असं नाही….थोडा घरी…थोडा बॅंकेत….थोडा खिशात…..पण मनात नि हृदयांतील सखे पावलोपावली आपल्या सोबत असतात…..म्हणूनच….कपाट किती मोठं असावं,खिसा किंवा बॅंक किती मोठी असावी याला मर्यादा आहेत, पण मन आणि  हृदय किती मोठं असावं याला मात्र मर्यादा नाही.

 

© राजीव पुरुषोत्तम दिवाण

बदलापूर(ठाणे)

फोन:९६१९४२५१५१

वॉट्स ऍप :८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments